रविवार, २४ मे, २०१५

कोलांटउडी

प्रिय मैत्रणी,

अरेच्या सकाळी सकाळीच तुझा फोन..नाही नेहमी मीच फोन करतो ना...थांब हं... सूर्य उत्तरेला मावळणार का ते जरा पाहून येतो. नाही गं, तुझा फोन आल्यामुळे तुझ्या बापाचा विरोध मावळला असंच वाटलं अगदी जैतापूरप्रकरणी शिवसेनेचा विरोध मावळला ना तसंच. काय...काय म्हणतेस..हं तसं  नाही गं...तुझा राजकारणाशी काही संबंध नसला ना तरी कोकणवासीयांचा जैतापूरशी अगदी जिव्हाळ्याचा संबंध आहे बरं का! आता त्याचं काय आहे, ताजं ताजं उदाहरण म्हणून शिवसेनेचं दिलं. असे विरोध कालांतराने बोथट होतात यात काय नवीन नाही गं...पण काहीही म्हण हा, तुझ्या बापाने आपल्या प्रेमाला यलो सिग्नल दिला हेही नसे थोडके हं.. म्हणजेच काय त्यांनी थोडीतरी कोलांटउडी मारलीच की आस्ते'कदम'. मला काय वाटतं, फुकुशिमा व चेर्नोबिलला जाण्याचा सल्ला देणाऱ्यांच्या विरोधाचा भाजपने फुंकून  फुंकून फुकुशिमा केला तसा तू तुझ्या बापाचा नाही ना केलास? अगं तू नाही केलंस तर मी तरी नक्की फुंकून टाकला असता विरोध फक्त तुझ्यासाठी..काय काय...वरणभाताचं काय म्हणतेस ?  छे गं, वरणभात खायची ही काय वेळ आहे का? कोकणी लोकांना सकाळी चटणी-भाकर दिली ना तरी लय भारी न्याहरी होते. पण आता म्हणे जैतापूरप्रकरणी पर्यावरणमंत्र्यांनी केलेल्या विधानाची फारच चर्चा रंगलीय. शेतकऱ्यांनी म्हणे विरोध केला. सत्येत आल्यानंतर असं सांगणे म्हणे सोपं असतं. आता पर्यावरणमंत्र्यांना दुसरे 'वरण' नसल्यामुळे 'पर्याय' काय असा प्रश्न तुला पडला असेल तर तो डोक्यातून आताच डिलीट कर. शेवटी जे काय भाजायचं असतं, शेकवायचं असतं, खापर फोडायचं असतं त्यासाठी सर्वसामान्यांच्या नावाच्या ढालीवर फोडता येतं, नाही का माय डिअर मैत्रणी? मला माहीत आहे तुला राजकारणात काही इंटरेस्ट नाही. आपला दोघांचा इंटरेस्ट मात्र आपल्या प्रेमात आहे. आपण आपलं प्रेमजीवन अगदी यशस्वी करायचं. कितीही अडचणी आल्या तरी दुसऱ्यावर जबाबदारी टाकायची नाही शिवसेनेने जशी शेतकऱ्यांवर टाकली. पण काहीही म्हण, तुझा बाप म्हणजे जरा भारीच आहे. तुझ्यासाठी इतके दिवस मी त्यांच्या मागे मागे लागलो होतो तर त्यांनी मला झुळत ठेवलं अगदी मोदींनी शिवसेनेच्या खासदारांना जैतापूरप्रकरणी निवेदन देताना ठेवलं तसं...तुझ्या बापाचा अस्सा राग आला होता ना, पण करणार काय, सत्तेखाली हात आखडले स्वारी स्वारी तुझ्यावर प्रेम होतं ना म्हणून मी ते सर्व सहन केलं.  आणि तुला मी आजच सांगून ठेवतो हं, आपलं हे प्रेम हे अतुट आहे हे लक्षात ठेव. ते काय काही वर्षांच्या 'युती'सारखं नाही.
  तुझाच वचनबद्ध,
  प्रेयस  

शुक्रवार, २२ मे, २०१५

प्रिय मैत्रणी,
सुरक्षेचे 'दान' द्या
अरेच्या, आज पहिल्याच रिंगला फोन उचललास. नाही म्हणजे जास्त वेळ फोन सुरू राहिला असता आणि तुझ्या त्या बापाने पाहिला असता तर तू घाबरली असतीस ना प्रिये...बरोबर ना.. हे बघ, आता तू अजितबात घाबरू नकोस. तुझ्या सुरक्षेसाठी मी छातीचा कोट करून उभा राहीन...अगं एवढंच नव्हे, तर तुला सुरक्षा पुरवण्याची मागणी करायला मी सवडच देणार नाही. तू तर माझ्यासाठी जीव की प्राण आहेस. त्यामुळे तू समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची नसलीस ना तरी माझ्यासाठी मात्र खूपच जीवलग आहेस, हे विसरू नकोस. काय आहे, आजकाल कमी महत्त्वाच्या पदवाल्यांना पण सुरक्षेची जरा हावच सुटलेली असते. मग ती हाव किंवा हौस भागवण्यासाठी रुसवे-फुगेव्याचे नाटक करावं लागतं. हे बघ, तुझे रुसवे, तुझे फुगवे मी झेलायला तयार आहे गं. पण तू सुरक्षेचा दानवे (दानाचा मार्ग) पदरात पाडून घ्यायला एवढा आटापिटा करू नकोस. त्याचं काय माहीत आहे, तू अजून सामान्यच आहेस गं. अतिसामान्य झालीस ना की मग मीच तुझा बॉडीगार्ड बनून फिरेन हं. अगदी झेड प्लस सुरक्षाच पुरवेन. पण लग्नाअगोदर तू असला हट्ट धरू नको. त्याचं काय आहे ना प्रिये, मला ना स्वत:चं अकारण महत्त्व वाढवणारी माणसं खूप काही ‌आवडत नाहीत. आणि मला माहीत आहे, तू स्वत:चं असं महत्त्व वाढ‌वणार नाहीस ते...कारण काय माहीत आहे, आपली जी काय जनताजनार्दन आहे ना ती काय करेल ते सांगता येत नाही. त्यामुळे तू सुरक्षा पुरवण्याचं दान बडवण्यापेक्षा शांत राहणं चांगलं नाही का? एवढंच जर तुला तुझ्या परिवारात असुरक्षित वाटत असेल तर तू खुशाल माझ्याकडे ये...मी वाटच पाहत आहे.
तुझाच झेड प्लसवाला,

प्रेयस 

बुधवार, २० मे, २०१५

प्रिय मैत्रणी
मन की बात की...?
अगं, प्रिये उठलीस की नाही...अजून काय आळोखेपिळोखे देत आहेस. चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झालाय आणि ट्विटरवाल्यांचा टिवटिवाट. हे बघ तू आता अॅण्ड्रॉइड मोबाइल वापरायला सुरुवात कर. पाहिजे तर मी पाठवून देतो. आयला काय जांभया देतेस फोनवर. अगं, मोदी म्हणे भारतमातेबद्दल बोलले आणि ट्विटरवाल्यांनी टीकेचा ट्विटिवाट केला. तुला अजून माहीत नाही. हे बघ तू आता फोन ठेवून माझा इन्सल्ट नको करूस. आदीच सर्वांनी मोदींच्या नावाने मोदी इन्सल्ट इंडियाचा असा घोष लावलाय. आता मोदींनी असं का बरं बोलावं, हे तू मला विचारू नकोस. कसाही असला तरी देश आपला आहे. देशावर आपलं प्रेम आहे... काय काय म्हणालीस, मी विदेशात गेल्यावर असाच बोलेन म्हणून..हे शक्यच नाही..तुझ्यापेक्षाही सुंदरी आल्या तरी तुला विसरलो का मी? मग विदेशात जायची बातच सोड. मेरे मन की बात आपही तो हैं.....अगं आपलं ज्याच्यावर नितांत, नि:सिम प्रेम असतं ना ते असे काही बोलत नाहीत. ''पूर्वी अनिवासी भारतीयांना आपण भारतीय असल्याची लाज वाटायची, मात्र आता त्यांना भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. देशातील सत्तेत परिवर्तन व्हायला पाहिजे, असे अनिवारी भारतीयांना वर्षभरापूर्वीच वाटत होते.'' अशी मोदीवाणी ट्विटिवली. अगं, तुला त्याचं काहीच वाटत नाही का? म्हणजे तुझा देशाभिमान असा अनिवासी झाला की काय? असं काय करू नकोस. माझ्या प्रेमाचं काय? हा सत्तेचा माज म्हण की अनेक वर्षांपासून सत्ता हातात आल्यामुळे पुन्हा भविष्यात सत्ता येईल की नाही याचा पत्ता नसल्यामुळे असं झालं असं समज, पण काही तरी घडलय-बिघडलंय एवढं मात्र नक्की! मला काय म्हणायचं, आपण कितीही भारावून गेलो आणि कितीही मोठे असलो तरी देश तो देशच ना...तू हूं काय करतेयस अद्याप झोप उडाली नाही का? उडाली ना..अजून उडेल. तू आताच जागली आहेस ना..अनिवारी बघ वर्षापूर्वीच जागले आहेत. त्यापूर्वी ते काय झोपा काढत होते याबाबत तू काय बोलू नकोस आणि मीही बोलत नाही..कारण अकारण वादाला कशाला तोंड फोडायचं....कारण काय आपण काही राजकारणी नाही, पत्रकार नाही की लेखक नाही...त्यामुळे वादाला तोंड फोडून घेण्यापेक्षा तू आदी तोंड धुवून ये मग मी तुझ्या फोन येईल या आशेने तोंड लावून बसतो माझ्या मोबाईलला... पण ऐक, तू फोनवर बोलशील ना ती फक्त मन की बातच बोल हा...नाहीत मनात एक आणि दिलात दुसरंच काहीतरी असायचं म्हणेज निदान मला अभिमान वाटेल असे बोल....तेव्हा तू माझा इन्सल्ट न करताच इन्संट ये वाट पाहोत.
तुझाच मन की बातवाला,

प्रेयस

सोमवार, १८ मे, २०१५



प्रिय मैत्रणी
गेले वर्षभर वाट पाहतोय... कसली काय विचारतेस. म्हणजे तुला अद्याप माहिती नाही का? मैत्रिणी, मी जेवढी तुझी आतुरतेने वाट पाहतोय ना तितक्याच आतुरतेने वर्षभरापासून अच्छे दिनांची वाट पाहतोय. आज येतील अच्छे दिन, उद्या येतील अच्छे दिन असे मनाला सांगत आणि तुझ्या त्या खडूस बापाला कसं तरी तोंड देत कधी वर्ष सरलं ते कळलंच नाही बघ? काय माहीत आहे की, अच्छे दिन आले ना मग आपल्यासाठीसद्धा चांगेल दिन येतील. हे बघ असं तू भांडत वैगरे बसू नकोस. म्हणजे मला काय म्हणायचं, तुझ्यातलं आणि माझ्यातलं जे नातं आहे ना ते अगदी पक्कच असायला हवं. युतीसारख आज तुटेल उद्या तुटेल असं नको. काय मजा नाही अशा मैत्रीत. संसार दोघांनी करायचा आणि पुन्हा त्याच्यात वाद घालायचे. यातून भविष्य बिघडतं असं नाही का वाटत तुला. तू तिथं आणि मी इथं असल्यामुळे आजकाल आपल्यात त्या युती सरकारमधील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून चाललेल्या वादासारखं झालं आहे. एकाने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करायाचा आणि दुसऱ्याने प्रकल्प होणारच असा विश्वास व्यक्त करायचा...तुझ्यात आणि माझ्यात नेमके हेच चालले आहे. आता मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत तर जरा जपानला यावं जाऊन, असं तुला नाही का वाटत? तेवढेच फुकुशिमा बघून आले असते. असो. आता सरकारने ड्रॅगन समजल्या जाणाऱ्या चीनबरोबर करार केले आहेत, तेव्हा अच्छे दिन 'करा'त येतील अशी माझी भाबडी आशा आहे.
आपल्या प्रेमाला कुणाचं ग्रहण लागू नये यासाठी मी धडपडतोय. तर तुझा बाप अच्छे दिन के पिचे लगा है. गेल्या वर्षभरात अनेक निर्णय घेतले सरकारने, त्याचे फळ केव्हा मिळेल तेव्हा मि‌‌ळेल, पण आपण आशावादी असलं पाहिजे. सरकारचा पाच वर्षांचा संसार केव्हा मोडेल ते सांगता येत नाही, पण आपला संसार, आपलं प्रेम असं न मोडता राहायचं असेल तर सकारात्मक विचार करून स्वत:चं काहीतरी करायला हवं. निदान त्यामुळे तरी तुझे नि माझे अच्छे दिन नक्कीच येतील.
आपला आशावादी प्रेयस





मंगळवार, १२ मे, २०१५

दाऊद तुला शोधू कुठे...?
कैफ...मग तो मद्याचा असो, सत्तेचा असो वी नैतिकतेचा असो, तो केव्हाही वाईटच असतो. हा विचार सत्ताधारी, राजकीय नेते, श्रीमंत आणि अतिश्रीमंत (काही सन्माननीय अपवाद) यांना बऱ्याच अंशी लागू होतो. भाजप जाणतेपणा करीत सत्तारुढ झाला मात्र त्या पक्षाच्या नेत्यांनी जाणते-अजाणतेपणी वक्तव्यांची जी काही मुक्ताफळे उधळली यावरून सत्तेचा कैफ काय असतो, याचा अर्थ कळायचा मार्ग मोकळा होतो. हाच कैफ अर्थात माज मग आपण काय बोलतो, कुणासमोर बोलतो, आपलं काय स्थान आहे, आपण किती जबाबदार आहोत, याचे भान विसरवतो. भाजप नेत्यांमध्ये एकाने वक्तव्य केले की दुसऱ्यानेही लगेच दुसरे वक्तव्य केले पाहिजे, असा काही अलिखित नियम घालून घेतला आहे की काय , अशी शंका घ्यायला काहीच हरकत नाही. दाऊदवरून भाजपच्या नेत्यांनी जो वक्तव्यवाद घातला तो सत्ताधाऱ्यांना शोभणारा नाही. दाऊदच्या शोधाचा जो काही ऊहापोह केला जातोय त्यावरून दाऊदही स्वत:चा उदोउदो करून घेत असेल. जीभ आहे आणि तिला ३२ दातांची संरक्षक भिंत आहे म्हणून विचार न करता टाळ्याला लावता कामा नये. पण करणार काय? सत्तेपुढे शहाणपण घालीन लोटांगण करत असल्यामुळे यांच्या तोंडावर हात कोण धरणार, हा यक्ष प्रश्न आहे. राजकीय नेते असे काही अतार्किक वक्तव्य करतात आणि नंतर तोंडघशी पडतात, हा प्रश्न यक्षालाही सतावत असेल. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने दाऊदला भारतात आणू असे सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरल्याने भाजपपुढे अडचणी वाढल्या. त्यातच दाऊद कुठे आहे हे माहीत नसल्याचे वक्तव्य गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी केले आणि ते भाजपच्या चांगलंट अंगलट आले. त्यामुळे चौधरींच्या वक्तव्यावर सारवासारव करण्याची पाळी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर आली. त्यामुळे टीम भाजप आता दाऊदला शोधायला बाहेर पडणार की नाही, हे काँग्रेसला पाहावे लागेल.