बुधवार, १४ डिसेंबर, २०११

पालकपर्व - एक अभियान

प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग, कसं काय चाललंय? अरे वा, तू तर आज खूपच खुशीत दिसतेस. म्हणजे अभिज्ञान अकादमीला भेट दिल्यानंतर नवचैतन्य संचारलं वाटतं. बरं, त्या दिवशी अकादमीबाबत सांगता सांगता मी एवढा भारावून गेलो म्हणून सांगू... त्या भारावलेपणात एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. तुझी उत्कंठा वाढली ना! सांगतो. अभिज्ञान अकादमी सर्वांसाठी सर्वांगसुंदर असं 'पालकपर्व' नियतकालिक प्रकाशित करणार आहे. हे ऐकून आनंदाच्या उकळ्या फुटल्या ना...ऐकू येतायत मला. आता पालकपर्वमध्ये काय काय असेल ते विचारू नकोस. जे जे पालकांना हवं ते ते सर्व काही.
आपल्या या पालकपर्वमध्ये अथपासून इथपर्यंत सर्वच असणार आहे. शिक्षणव्यवस्था, परीक्षापद्धती, स्पर्धा, करिअर, विवाहबंध, मातृत्व आणि पितृत्व, नातेसंबंध, सामाजिक भान, स्नेहबंध, सेवाभाव, कार्य, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकसंस्था, साहित्य, संस्कृती, कलाविष्कार, नवता, ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान, अभिज्ञान, आचार-विचार, उच्चार, विहार, वेळ, नियोजन कौशल्य, व्यवस्थापन, घर, शाळा, परिसर, समाज अशा वैविध्यपूर्ण विषयांनी पालकपर्व सजलेला, नटलेला, आकर्षक, देखणा आणि वैशिष्ट्यपूर्ण असेल.
एवढंच नव्हे तर पालकपर्वमधून मूलभूत रचनावादी शिक्षणासाठी विधायक भूमिकाही मांडली जाणार आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शास्त्रीय मांडणी केली जाणार आहे. पाल्याचा अभ्यास, वर्तन आणि करिअरच्या तंत्राचाही समावेश असणार आहे. सुजाण पालकत्वासाठी नवा विचार आणि योग्य दृष्टिकोन मांडला जाणार आहे.
चोखंदळ, चिकित्सक आणि चौकस वाचनासाठी साक्षेपी, सर्जनशील आणि सरस लेखनासाठी, विचार, भूमिका आणि सैद्धांतिक संपादनासाठी, अर्थपूर्ण, कल्पक आणि आशयगर्भ कलानिर्देशनासाठी दर्जेदार आणि संग्राह्य असा पालकपर्व असेल. ललित-वैचारिक जीवनाविषयीचा 'मूलमंत्र' देणारं नियतकालिक म्हणजे 'पालकपर्व.' अगं, म्हणूनच तर अशा लाडक्या, देखण्या, दर्जेदार, चोखंदळ नियतकालिकाचं नाव ठेवलंय 'पालकपर्व.'
मैत्रणी ऐकलंस ना हे सारं... मग आता तू तुझ्या मित्र-मैत्रिणींना पालकपर्वविषयी प्रेमानं सांग आणि त्यांना सभासद बनविण्याचा सपाटा लाव.

तुझाच सभासदांसाठी झपाटलेला,
प्रेयस

रविवार, ४ डिसेंबर, २०११

मित्र असावा तर असा

प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग. अरेच्या आज लवकर जाग आली वाटतं. फारच छान. म्हणजे मी रोज तुला मित्रत्वाच्या नात्याने फोन करतो याचा चांगला परिणाम झाला तर. अगं, मित्र असावा तर असा आणि मित्रत्व असावं तर आपल्यासारखं. मैत्रीवरून आठवलं बघ. काय आठवलं अस तू विचारणारच. शोलेमधलं ते सुंदर गीत तुला माहीत आहे का? कोणतं काय विचारतेस? चल तर सांगूनच टाकतो तुला. यह दोस्ती हम नही छोडेंगे... किती गहिरं नातं असत ना मित्रत्वाला. अगदी तुझं नि माझं आहे तसं. तुला तर मित्र म्हणजे आरसाच वाटतो. बरोबर ना. आपण कसे आहोत, हे मित्रच चांगलं सांगू शकतात. धडाकेबाज सिनेमा पाहिलास का तू... चक्क पाहिलास.. मग गाणं एकलं असशील. तसं नाही, काही जणांना सवय असते ना गाणं लागल्यावर डुलकी काढायची. अगदी अधिवेशनावेळी नेतेमंडळी काढतात तशी. जाऊ दे. आपण मैत्रीबद्दल बोलत होतो. हा, तर काय ही दोस्ती तुटायची नाय.. मला मैत्री सांगायचीय ती त्या साहेब आणि राव यांच्यातील. आता हे साहेब आणि राव कोण म्हणून विचारलंस ना तर महाराष्ट्राचा अधिवासी दाखला रद्द करून टाकायला सांगेन. अगं, मैत्री असावी तर बाळासाहेब आणि पवारांसारखी. निरागस, निखल आणि दूरदृष्टी असणारी बरं का. महाराष्ट्राचे हे दोन दिग्गज. काय मित्रत्व जपतात म्हणून सांगू. शिकलं पाहिजे आपण. राजकीय पटलावर एकमेकांचे घोडे मारलेत पण मैत्रीच्या पटलावर मात्र राजाप्रमाणे मित्रत्व जपलंय. सो ग्रेट. साहेबांकडून काही प्रसंग निर्माण झाला किंवा साहेबांवर काही प्रसंग पडला की रावसाहेब प्रेमाने येतात भेटायला मातोश्रीवर. अगं परवाचंच बघ ना. संपूर्ण महाराष्ट्र समस्याग्रस्त आहे यावर जेवढा एकोपा नेत्यांनी केला नाही तेवढा एकोपा पवारसाहेबांना मारल्यानंतर झाला. माझ्या मते ही खूप चांगली गोष्ट आहे. निदान महाराष्ट्र एक होऊ शकतो याची अन्य राज्यांना खात्री पटली. शरद पवारांसारखा दूरदृष्टी लाभलेला नेता महाराष्ट्राला लाभलाय. म्हणून पवारांच्या पडली तेव्हा सर्वांना चिडीने जाग आली. आणि साहेबांनी रावांची बाजू घेतली. अगदी एखाद्या जीवलग मित्रानं घ्यावी तशी. मित्र असावा तर असा. अशी राजकीय पटलापलीकडील जपलेली मैत्री विरळाच. तेव्हा मी काय म्हणतो, आपण सलाम करूया त्यांच्या मित्रत्वाला आणि आपली मैत्री मात्र घट्ट करूया.

तुझाच मैत्री जपणारा,
प्रेयस

शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

माझं दुसरं घर

प्रिय मैत्रणी,
गुड इव्हिनिंग, अगं आज म्हटलं गुड इव्हिनिंग करूया... वीकेण्ड असला की अनेक जण वीकेण्डला जाण्याचे बेत आखतात... पण तुला सांगू का, मी आता वीकेण्डला माझ्या दुस-या घरी जाण्याचं ठरवलंय... आता दुसरं घर कुठलं ही उत्सुकता लागली असेलच... असो... अशी रागावू नकोस... बरं तर माझ्या दुस-या घराचा पत्ता आहे... मुंबई, डॉक्टर आंबेडकर रोड, रंगारी बदक चाळीतील अभिज्ञान अकादमी... माझ्या या दुस-या घराचं घरपण सांभाळतायंत माझे प्रिय गुरूवर्य, मित्रवर्य प्राध्यापक विजय जामसंडेकर... अभिज्ञान अकादमी ही माणसाला प्रेमपण देणारी एकमेव संस्था आहे... काय देत नाही हे घर मला... सर्वच देतं अगदी अथपासून इथपर्यंत... मी जो काही तुझ्यासमोर आहे ना ती या घराची देणगी आहे... जो जे वांछिल ते... असं माझं हे घर... या घरानं अनेक विद्यार्थ्यांना केवळ उभंच केलं नाही तर त्यांचं आयुष्य घडवलंय... अनेकांना मरणाच्या वाटेवरून नवजीवन दिलंय... अनेकांचे उदध्वस्त संसार फुलवलेत... तर मोडणा-या संसारांना प्रेमाने, विचारांनी, जगण्याच्या दृष्टिकोनानं उभारी दिलीय... अशा माझ्या घराचा असा मोठा परिवार...रमायला आवडतं अशा या परिवारात... मनसोक्त आनंद लुटल्याचा क्षण काही औरच असतो, बघ...
माझं हे संस्थारूपी घर जगावेगळं शैक्षणिक कार्य करतंय...अगदी प्रवाहाच्या विरोधात जाऊन... आजच्या तकलादू आणि खर्चिक शिक्षणपद्धतीमुळे आत्महत्या करणा-या विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझं घर आधारवड ठरलंय... आणि अजून ठरत आहे... इतकंच नव्हे तर ते अनेकांना अगदी माझ्यासारख्यांना जणू आपलं हक्काचं दुसरं घरच वाटंत... ज्योत से ज्योत.... म्हणतात ना तेच कार्य माझं घरकुल करतंय... गेली अनेक वर्षांपासून आणि तेही अगदी मनापासून...या घरकुलानं शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाजातील अनेकांचं जीवन प्रकाशासारखं लख्ख उजळून टाकलंय... आता तू म्हणशील हे कसं काय शक्य आहे, तुला प्रश्न पडणं साहजिकच आहे...माझं घर म्हणजे अभिज्ञान अकादमी सातत्यानं नव्या रचनावादी शिक्षणासाठी विधायक भूमिका मांडतेय... आजच्या बदलत्या जीवनमूल्यांच्या काळात पालकांना मुलांच्या जडणघडणीत जीवन-शिक्षणविषयक समुपदेशन करतेय...एवढंच नव्हे तर विविध शैक्षणिक उपक्रमांची शासन, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणसंस्था, शिक्षणप्रेमी आणि माध्यमांनी दखल घेतलीय... आहे की नाही दम... आणि हो खास गोष्ट सांगायची राहूनच गेली....कोणती असं काय विचारतेस... अकादमीने प्रकाशित केलेल्या विशेषांकांना एक नव्हे-दोन नव्हे तर तब्बल अठरा पुरस्कार प्राप्त झालेत... आहे ना अभिमानास्पद आणि गौरवास्पद गोष्ट... गोष्ट असावी तर अभिज्ञान अकादमीसारखी स्वच्छ आणि स्पष्ट...
माझ्या या अकादमीत बौद्धिक चर्चा झडतात... आधुनिक आणि वैचारिक दृष्टिकोन दिला जातो... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथे जीवन घडवलं जातं.... त्यामुळे येथे पाखरांनो परत फिरा असं म्हणावं लागत नाही तर पाखरंच घरट्याकडे म्हणजे अभिज्ञान अकादमीकडे परततात...मनसोक्त बागडण्यासाठी...वैचारिक देवाण-घेवाण करण्यासाठी...मदतीचा हात पुढे करण्यासाठी...आता तूही चल माझ्याबरोबर... कारण घराला प्रेमपण देणारी माणसं घडवतंय हे माझं घरकुल...त्या घरकुलात प्रत्येकाचं स्वागतच होतं... आज तुझंही होईल तेवढ्याच प्रेमानं जेवढं माझं काही वर्षांपूर्वी झालं होतं... चलं, आता बोलण्यात वेळ घालवू नकोस...वाट पाहतंय माझं दुसरं घर...

तुझाच घरकुलवेडा,
प्रेयस

रविवार, २७ नोव्हेंबर, २०११

चल, बेगीनं नाट्यसंमेलनाला...

प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग, अगं, एक आनंदाची बातमी सांगायचीय तुला... सांगावीच लागणार... तुला वर्तमानपत्रं वाचायला नकोत अन् न्यूज पाहायला नकोत... पुस्तकं वाचतेस हेच मोठं नशीब... अशी आवासून पाहू नकोस... तयारीला लाग आदी... बॅग भर... अगं, कुठून पळून जायचंय नाही... मग, कुठं जायचा असा प्रश्न पडला असेल ना तुला... सांगतो हं... हे बघ आपल्याला ना सांगलीत जायचंय, सांगलीत... सांगलीत, असा प्रश्नार्थक चेहरा करू नकोस... सांगलीत ९२ वं नाट्यसंमेलन भरणार आहे ना... त्यासाठी जायचंय... २२ आणि २३ जानेवारीला... आणि आनंदाची गोष्ट म्हणजे अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेंची निवड झालीय... झक्कास... आपल्याला वर्षे नाही ना झालीत एवढी नाट्यसंमलनं झालीत... सांगलीच्या संमेलनात वादावादी न करता तुला भेटायला आवडेल मला... कदाचित एकादी कविता नाहीतर चारोळी तरी सुचेल तुझ्यावरून... तेवढीच सादर करू... हे बघ, साहित्यिक-पत्रकार-राजकारणी वाद असायचे तर असू दे...तुझ्या अन् माझ्यात मात्र वाद नको...कळंल का... अन् हो स्वागताला डॉक्टर आहेतच की... म्हणजे काय म्हणजे...तुला प्रत्येक गोष्ट आता भरवायला लावू नकोस हं... अगं, डॉक्टर पतंगराव कदम आहेत स्वागताला... तसेच अनेक थोरामोठ्या साहित्यिकांच्या गाठीभेटी होतीलच की... थोर नाटककार, कलावंत, रंगकर्मी अन् कोण कोण भेटतील म्हणू सांगू... ते जाऊ दे...प्रत्यक्षच पाहू...मोघेंना तर सासूरवाशिणीला माहेरी आल्यानंतर होणा-या आनंदाची अनुभूती आलीय म्हणे... असू दे... त्यांच्या आनंदात आपला आनंदही साजरा करू...इकडे मुंबईत म्हणे जयवंत परबांना शिवसेनागृही परतल्यानंतर तसली अनुभूती आलीय... शेवटी माहेरपणाचा थाट काही मोठा आणि औरच... तू अशी बेळगाववाशी अन् मी मुंबईकर... दोघांनी मिळून आता सांगलीकर होऊया... कशी वाटली कल्पना... हा पण तुला सारखंसारखं राजकारण्यांसारखं स्वगृही नाही हा जाता येणार... चल, मी निघालो....कुठे काय विचारतेस... सांगलीचं तिकीट बुक करून येतो...नंतर बसू बोलत दोघं -जण नाट्यनिर्मितीपासून नाट्यसमीक्षेपर्यंत...
तुझाच संमेलनवेडा,
प्रेयस

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

ती वीज तुझ्या नजरेमधली...

प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग... अगं अजून डोळे काय झाकून आहेस... सूर्य महाराजांचं केव्हाच आगमन झालंय माथ्यावर अन तू म्हणतेस डोळे चुरचुरतायंत... कॉलेजलाही तू अशीच डोळे मिचमिचवीत असायचीस... अगदी झोपेतनं उठल्यासारखी... पण काहीही म्हण तुझी नजर मात्र सॉलिड भेदक होती... तुझी ती नजर पाहिली ना की कशाची उपमा देऊ हा माझ्या नजरेला प्रश्न पडायचा... असं वाटायचं की, शोएब अख्तरचा नो बॉलही एवढा वेगात येत नसेल... तुझी ती भेदक नजर संपूर्ण क्लासवर भरभरली की क्लास प्रकाशमान वाटायचा... माहीत आहे ना मराठीचे प्राध्यापक काय म्हणायचे ते... मुली अशा जागा पकडतात की एका नजरेत ३६० चा अँगल असतो... ते जाऊ दे... हे मात्र खरं की त्या नजरेनं माझी विकेट घेतली...आय मीन मला बोल्ड केलं... तुझ्या त्या सुंदर नजरेचे कांगोरे मला नेहमीच हवेहवेसे वाटायचे... तुझे ते नयन पाहिले की एश्वर्या रायच्या डोळ्यांचं सौंदर्यही खुजं वाटायचं... आठवतं तुला... तू कॉलेजच्या बागेत फिरत होतीस... आणि मी असा चाफा बोले ना सारखा पांढ-या चाफ्याच्या मुदात एकलव्यासारखा बसून होतो... फूलझाडागणिक आणि चेह-यावरील हास्यागणिक बदलणारी तुझी नजर मला घायाल करायची... एकदा तर तुझ्या नजरेनं माझं हृद्य इतकं घायाल झालं की दिलाच्या आकाराचे तुकडे सांभाळताना नाकीनऊ आले माझ्या... तुझं ते डोक्याला हात लावून तिरक्या नजरेनं पाहणं... गार्डनमध्ये बसल्यावर मान वळवून पाहणं... चौपाटीवर फिरताना वा-याच्या लकेरीअगोदर तुझ्या डोळ्याची पापणी लवणं... अन् निरोप घेताना पुन्हा पुन्हा पाहणं... सर्व कसं हृदयात साठवून ठेवणारं... मनात जपून राहणारं... डोळ्यात बसून राहणारं... फक्त स्वप्नवत...मला तर सारखं वाटायचं मी सोडला तर कुणाची बिशाद होती तुझ्या नजरेला नजर मिळवायची... तरी तुला सांगतो... तू माधुरी दीक्षितसारखी नजरे मिळवलीस की माझा माभ संजय कपूर व्हायचा राजा सिनेमातल्यासारखा... पण तुझ्या नजरेसमोर माझी जिगर असायची हे विसरू नको हं...मला प्रेमात पाडणारी तुझी नजर मात्र शामल नव्हती...ती वीज तुझ्या नजरेमधली...जीवाला वेड लावणारी... प्रेमात पाडणारी... आजन्म नजरेत ठेवणारी.... शेवटी एकच म्हणावसं वाटतं की, ती वीज तुझ्या नजरेमधली...अन् गालावर माझ्या खुलली खळी....
तुझाच नजरकैदी,
प्रेयस

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०११

चल, हटके क्लास काढू


प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग... अगं ऊठ लवकर... आनंदाची बातमी सांगायची आहे... आता आपल्याला व्यवसायासाठी सुवर्णसंधीच प्राप्त झालीय... कुठली असं काय विचारतेस... न्यूज चॅनेल्स पाहात नाही का तू... अगं, राजसाहेबांनी चक्क आपल्या उमेदवारांसाठी परीक्षा जाहीर केलीय... राज सरांनी क्लासच घेतला म्हणे...आता इच्छुक उमेदवार परीक्षा देणार म्हणजे त्यांना वाचावं-लिहावं लागणार... याचाच साधा अर्थ त्यांना क्लासला जावं लागणार... कोहिनूरने क्लास काढायच्या अगोदर आपला क्लास सुरू झाला पाहिजे... कळलं... आणि हो आपण क्लास काढला तर तो तोट्यात जाणार नाही... कारण काय विचारतेस... अगं, निवडणुकांमागून निवडणुका नाही का होतात... मग नो टेन्शन फक्त अटेन्शन... राजसाहेबांनी परीक्षा घ्यायची ठरवलीय...आपण त्या परीक्षेचा फॉर्म्युला ठरवू... फॉर्म्युला वनप्रमाणे चालेल क्लास... फक्त एकदाच जाहिरात देऊ... उमदेवारांना योग्य प्रशिक्षण देणारा एकमेव क्लास...बघ, रांगाच रांगा लागतील क्लाससमोर...उमेदवारी विद्यार्थ्यांच्या... आणि हो आपल्या क्लासला काय एकाच पक्षाचे थोडे उमेदवार येणार आहेत... सर्वच पक्षांचे उमेदवार हे आपले विद्यार्थी असतील... एका पक्षातून दुस-या पक्षात जाणं हा तर आपल्याकडचा ट्रेण्ड आहे... त्यामुळे आपला क्लास सर्वपक्षीयांना उपयुक्त ठरेल...आणि हो, मी काय म्हणतो, जर आपण उमेदवारीच्या प्रशिक्षणावर पुस्तक काढले ना तर तुफान चालेल...वृत्याच्या वृत्या म्हणजे आवृत्या काढाव्या लागतील... तू काही टेन्शन घेऊ नकोस... हा, आता तू शिक्षकांचा प्रश्न उपस्थित केलास हे बरं केलंस... पण घाबरू नकोस... मी आहे ना खंबीर... आपल्याकडे अनेक जण पदव्या घेऊन बेकार आहेत... येतील ते शिकवायला... बाकी काहीही असो... राजसाहेबांनी परीक्षा घेण्याचा ट्रेण्ड सुरू केला पण मला मात्र माझा व्यवसाय करण्याची नामी संधी मिळाली असं वाटतंय... तुला काय वाटायचं ते वाटो...आणि हो... सांगायचं राहूनच गेलं... माझ्या क्लासचे गेस्ट लेक्चरर असतील कोण... ते मात्र तू गेस करून सांग....
तुझाच क्लासवेडा,
प्रेयस

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

सीमावादाची ५५ वर्षे

प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग, अगं ही काय आळोखे देत उठण्याची वेळ आहे का? लोक वादावादासाठी रस्त्यावर उतरलेत अन् तू एक अजून बेड टी घेतेस... आज कसला आलाय वाद असा प्रेमळ स्वरात प्रश्न विचारू नकोस... गेली ५५ वर्षे सुरू आहे वादावादी... अगं, तू हा वाद कशीकाय विसरलीस? सीमावाद म्हणतोय मी... सीमावाद असा प्रश्नार्थक प्रश्न विचारू नकोस... महाराष्ट्र-कर्नाटक वादाला पाढे पंच्चावण.. स्वारी, पुरी ५५ वर्षे झालीत... वाद आवरण्याची वेळ आलीय, पण दोन्ही राज्ये सीमावाद जोपासण्याचा कसोशीने म्हणे प्रयत्न करतायत... आता सीमावादाचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या हातात... असू दे... तोपर्यंत दरवर्षी हा सीमावाद दहशतवादासारखा डोकं वर काढणार आहे...तोडफोड, हाणामारी, जाळपोळ, काळं फासणं, रास्ता रोको या शब्दांनाही आता लाज वाटेल इतका वाद ताणला गेलाय असं नाही का तुला वाटत? एक वेळ रबर ताणला तर तुटेल पण असले वाद सुटणारही नाहीत आणि तुटणारही नाहीत... वाद सोडविण्यापेक्षा वाद कुजविण्याचं कौशल्या वादातीत आहे... वादाच्या विस्तवावर राजकारण्यांनी पोळ्या भाजण्याचंच कर्तृत्व केलंय... ज्या शिवसेनेनं सीमावादात उडी घेतली त्या शिवसेनेला संधी असतानाही सीमावाद सोडवता आला नाही.... मला काय म्हणायचंय हे तुला कळतंय ना.... तू अशी बेळगाववासिनी अन् मी असा महाराष्ट्रवासी... आपल्यात मात्र असा वाद होऊ देऊ नकोस...सीमाबांधवांना आता कोणताही पक्ष वाली राहिलेला नसला तरी मी तुझा वाली आहे... आणि म्हणून मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे... सीमाभागातील जनतेचं आयुष्य असं होरपळून निघतंय...तसं तुझं आयुष्य मी होरपळू नाही देणार...हा माझा वचननामा आहे....मला काय म्हणायचंय... मुंबईच्या फर्लांगभर असणारे वाडे, पाडे, वाड्यावस्त्या आज उपोषण, कुपोषण आणि घोटभर पाण्यासाठी घटका मोजतायंत, शेतकरी आत्महत्या करतायंत, ऊस, कांदा, कापसाचा प्रश्न आहेच पाचवीला पुजलेला... मग बेळगाववासीयांना महाराष्ट्रात घेतलं तर खरंच आपण संगोपन करू का त्यांचं, हा प्रश्न आहेच.... बघ, हे सर्व बाजूला ठेव आणि माझ्यावरच्या पूर्ण विश्वासानं तू महाराष्ट्रीय हो... तुला सांभाळण्यासाठी मी समर्थ आहे... ५५ वर्षांपर्यंत वाटेला डोळे लावून वाट बघायला लावणार नाही तुला हा माझा शब्द...
तुला सामावून घेणारा तुझाच,
प्रेयस

रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

व्रत बंद अन् बडबड सुरू

प्रिय मैत्रणी...
गुड मॉर्निंग... वा किती छान... मी तुला म्हटलं आणि तू चक्क मौनव्रत सोडलंस... क्या बात है... हे बघ तू मौनव्रत सोडलंस याचा अर्थ असा नाही की तू माझ्यावर रागाचा आगडोंब ओकशील... नाही तसं नव्हे काय असतं मैत्रणी, मौनव्रत केल्यावर मनात खूप असं साचून राहतं... ते कुणाकडे तरी सांगावंस वाटतं सामान्य लोकांना... तू नक्की सांग मी आहे ना तुझा हक्काचा, प्रेमाचा प्रेयस... अगं आता तरी हूं हूं करणं सोड सखे... मी काय तुला अण्णा हजारेंची पदवी देणार नाही... त्यांनी म्हणे मौनव्रत सोडल्यावर असा काही सपाटा लावला बोलायचा... म्हणे एका एकाला धारेवर धरलं... ख-या अर्थानं काही गोष्टी नाही उघड करायच्या...पण पत्रकारांच्या नाही ओठात राहात नाही पोटात... असं म्हटलं जातं... केव्हा एकदा जगाला सांगतो असं होतं...माझंही तसंच झालं...तू मौनव्रत सोडलंस याचा काय आनंद झाला म्हणून सांगू... तो आता सर्वांना सांगायचा आहे... तू तशी काय कुणाशी आणि कुणाला बोलणार नाही हे मला माहीत आहे... कारण तू काही अण्णांसारखी सेलिब्रिटी नाहीस... मीडियासाठी नाहीस तसेच न्यूजमेकर नाहीस... आपण आपलं सामान्य असलेलं बरं नाही का... हे बघ आता तू व्रत सोडलंस आहेस तर आपण भेटूया एकांतात आणि एवढ्या दिवस मुके झालेले शब्द तुझे येऊ दे ओठावर....कारण तुझी बडबड ही माझ्यासाठी मोठा एकांतच असतो... तू बोलायला लागलीस अन् माझी विजनवास संपला बघ... अण्णा काय म्हणतात ते म्हणू दे... तू अशी धावत ये....भरभरून बोलायला....

तुझाच बोलका बडबड्या,
प्रेयस

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११

मौनव्रत सोड ना गडे....


चला मौनव्रत सोडूया
प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग........................ अगदी एफएमवाले सकाळीच आरोळी ठोकतात तसं वाटलं का... ऊठ लवकर... अन् हो पेपरवैगरे वाचवास की नाही... बरं मग कुठलं चॅनेल तरी पाहिलंस का.... अगं, बोलत का नाहीस... तुझं मौनव्रत आहे का...मी फोनवरून एवढं कोकळंतोय... हे बघ मैत्रिणी, अण्णांनी मौनव्रत धरलं ते त्यांच्या तब्येतीसाठी... तू तर एकदम फिट आहेस... अगं बोल....मी काय म्हणतो, ज्यांना बोलायची, बडबडायची सवय असते त्यांनी मौनव्रत धरू नये... मला असं नाही म्हणायचं की लोकपाल बिलाच्या वेळी अण्णा जेवढे बोलले तेवढं तू बोललीस... पण अण्णांनी गप्प राहणं बहुतेक अण्णांच्या आतल्या मनाला काय ते अंतर्मनाला पटत होतं का हे त्यांचा प्रश्न आहे... तुझा नाही... अण्णा गप्प होते तेव्हा अनेकांनी बोलण्याच्या पोळ्या भाजून घेतल्या... जाऊ दे... ते सर्व राहू दे बाजूला... तू केव्हा आणि कशासाठी मौनव्रत धारण केलंस ते बोल.... माझ्याकडून काही चूक झाली का राणी... हे बघ आपण सर्वसामान्य माणसे... अण्णा मनातलं ओठावर थांबवू शकतात... तसं तुझं नाही... तू किती बोलघेवडी आहेस ना ते मला माहीत आहे... तुला काय वाटतं, अण्णांवर आणि टीम अण्णांवर जे आरोप होत होते त्यांचे उत्तर न देण्यासाठी अण्णांनी मौनव्रत धारण केले होते... की बोलणा-यांनी आता अती केल्यामुळे त्यांनी मौनव्रत सोडले... बघ हा त्यांचा प्रश्न आहे... तुला त्याच्यावर काही भाष्य करायचे नसेल तर तू माझ्याशी अबोला कशाला धरलास...
हा अबोला सोड बघू आणि पुन्हा पूर्वीसारखं गोड गोड बोल...
काय... चक्क हसलीस... किती गोड.... आता कसा गेला रुसवा बयेचा माझा...

तुझाचा तुला बोलता करणारा,
प्रेयस

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०११

अन् कुणीही टपली मारतो

प्रिय मैत्रिणी,
गुड मॉर्निग झाली का आणि झाली असेल तर अशी आळस देत राहू नकोस। तशी ती तुझी जुनी सवय आहे। चहाबरोबर वर्तमानपत्र वाच। वाचायची सवय नसली ना की मग कोण काय सांगतं ते ऐकत राहावं लागत। अगं, म्हणे त्या संजय निरुपम यांनी पुन्हा परप्रांतीयांचा महिमा गायलाय...ते जाऊ दे। मी काय म्हणतो
मराठी अस्मिता, मराठी बाणा, मराठी हुंकार, मराठी स्वाभिमान आणि अभिमान हे शब्द आता लिहिण्या-बोलण्यापुरतेच राहिलेत. आज कुणीही येतं आणि केव्हाही मराठी माणसाच्या डोक्यावर टपली मारतं। मराठी माणसाची ताकद, शौर्य, निधड्या छातीचा मराठी अशी बिरुदं मिरवणारा मर्दमराठी खरंच नामर्द झालाय का, अशी परिस्थिती निर्माण झालीय।
संजय निरुपम आणि अबू आझमी मनाला वाटेल तेव्हा मराठीचा, मराठी माणसाचा अपमान करीत असतात। त्यांच्या जगी मराठी माणसाची खिजगणतीच नसते। एखादे झुरळ झटकावं तसं मराठी माणसांना मुंबईतून झटकलं जातंय। पण मराठीचे वारी आणि कैवारी तोंडघेवडा विरोध करतात आणि नंतर विसरून जातात। यायाच फायदा जो तो उठवत आहे।
उत्तर भारतीयांनी ठरवंल तर मुंबई बंद पडेल असे अकलेचे तारे तोडणारं विधान संजय निरुपम यांनी केलंय। अर्थात याला मनपा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे। भलतं सलतं केलात तर दात घशात घालू अशी ठाकरी डरकाळी उद्धव ठाकरेंनी फोडलीय तर पक्षात महत्त्व न राहिल्यामुळे सवंग प्रसिद्धीसाठी संजय निरुपम अशी विधानं करीत असल्याचा टोला मनसेनं लगावलाय। निरुपम यांना ख-या अर्थानं तोंडघशी पाडलंय ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी। मुंबई बंद होऊ देणार नाही असं निरुपम यांना फटकारत घरचा आहेर दिलाय। संजय निरुपम यांनी बोलावं आणि इतरांनी लगेच त्याला विरोध करावा यात भीम पराक्रम नाही। निरुपम काँग्रेसमध्ये गेले याचा अर्थ त्यांची मूळची संस्कृती बदलली असा होत नाही। शेवटी निरुपम हे शिवसेनेच्या मुशीतच तयार झालेले आहेत। शिवसेना ज्यांनी ज्यांनी सोडली त्यांनी त्यांनी शिवसेनेवर टीकाच केलीय। त्यामुळे संजय निरुपम यांच्याकडून वेगळी अपेक्षा करणं गैर ठरतं।
उत्तर भारतीय आणि मराठी वाद तसा नवा नाही। हा वाद म्हणजे कोळशावर साचलेली राख आहे। राखेला फुंकर मारली की कोळसा उजळतो तसा हा वादही उफाळतो। आणि त्यात खतपाणी घातलं की आग भडकते। आज मुंबईत शिवसेनेच्या जशा शाखा आहेत तशाच परप्रांतीयांच्या सभा आणि संघ आहेत। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वाद होतच राहणार। खरं पाहिलं तर मुंबईच्या विकासाच्या वेगापेक्षा मराठी माणसाचा मुंबईतून हद्द्पार होण्याचा वेग जास्त आहे। पोटासाठी पार कर्जत-कसारा आणि विरार-डहाणू-पालघरपासून मुंबईत येतो तो मराठी माणूस ठरलाय। कारण व्यवसाय करणं हा मराठी माणसाचा स्वभाव नाही। ज्याप्रमाणे परप्रांतीय छोठा-मोठा कोणताही धंदा-व्यवसाय करतात आणि आपले हातपाय पसरवतात।
मनपाची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच पक्ष आपापल्यापरीने कामाला लागलेत। त्यांचे नेतेही आता पावसात उगवणा-या छत्र्यांप्रमाणे दिसायला लागलेत। मात्र विकासकामांचा विचार राहिला बाजूला एकमोकांवरील कुरघोडीच्या राजकारणाला ऊत आलाय। त्यामुळे पक्षात आपलं अस्तित्व दाखवायचं असेलत तर काहीतरी हिट करणं मह्त्त्वाचं ठरतं आणि तेच निरुपम यांनी केलंय आणि त्याला अन्य पक्षांच्या नेत्यांनीही साथ दिलीय।
शिवसेना आता पहिल्या इतकी मजबूत, बळकट राहिलेली नाही हे सत्य आता शिवसेनेला स्वीकारावं लागेल त्यामुळे छगन भुजबळ, नारायण राणे, संजय निरुपम, राज ठाकरे ही शिवसेनेच्या मुशीत तयार झालेली नेतेमंडळी शिवसेनेवर वार करीत आहेत। शिवसेनेने निरुपम यांचे दात घशात घालयची वेळ दवडलीय। कदाचित निरुपम यांनी शिवसेना सोडली तेव्हाच ती योग्य वेळ होती म्हणजे आता त्यांची जीभ वळवळली नसती।
आज ख-या अर्थानं मराठी माणसंच मराठीच्या मुळावर उठलीत। छोठ्या-मोठ्या कुटुंबातही तेच दिसतंय। त्यामुळे मराठी माणसांची खरी ताकद विखुरली गेलीय। आणि याला इतिहास आहे। कीव याच गोष्टीची करावीशी वाटते की मराठी माणूसच मराठी माणसाची उणी-धुणी काढतोय आणि अन्य लोक त्याचा फायदा उठवत आहेत। मतांच्या जोगव्यासाठी मराठी माणसाची परवड केली जातेय। ती परवड थांबवायला हवीय। मराठी माणलाला विश्वास आणि प्रखर आत्मविश्वासाची अत्यंत गरज आहे।
मात्र एवढं खरं की मराठी माणसाकडे पाहण्याचा राजकीय दृष्टिकोण उदासीन असल्यामुळे कोणीही येतं आणि टपली मारतं।

तुझाच
प्रेयस

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०११

दीपावली

दीपावली सुखाची जावो...
दीपावली म्हणजे प्रकाशाचा सण. हा सण सर्वांना सुखाचा, समाधानाचा आणि समृद्धीचा जावो. सर्व देशवासीयांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा.
देशाची सर्वांगीण उन्नती होवो. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि अन्य अनेक क्षेत्रांत देशाची भरभराट व्होवो. सर्व जण पोटभर खाऊन सुखी-समाधानाने नांदो.
आपण भेटत राहू रोज कदाचित आठवड्याने...
माझ्यावर मनापासून प्रेम करणा-या माझ्या सर्व नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना, शेजा-यापाजा-यांना, गावकरी यांना दीपावलीच्या शुभेच्छा