रविवार, ४ डिसेंबर, २०११

मित्र असावा तर असा

प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग. अरेच्या आज लवकर जाग आली वाटतं. फारच छान. म्हणजे मी रोज तुला मित्रत्वाच्या नात्याने फोन करतो याचा चांगला परिणाम झाला तर. अगं, मित्र असावा तर असा आणि मित्रत्व असावं तर आपल्यासारखं. मैत्रीवरून आठवलं बघ. काय आठवलं अस तू विचारणारच. शोलेमधलं ते सुंदर गीत तुला माहीत आहे का? कोणतं काय विचारतेस? चल तर सांगूनच टाकतो तुला. यह दोस्ती हम नही छोडेंगे... किती गहिरं नातं असत ना मित्रत्वाला. अगदी तुझं नि माझं आहे तसं. तुला तर मित्र म्हणजे आरसाच वाटतो. बरोबर ना. आपण कसे आहोत, हे मित्रच चांगलं सांगू शकतात. धडाकेबाज सिनेमा पाहिलास का तू... चक्क पाहिलास.. मग गाणं एकलं असशील. तसं नाही, काही जणांना सवय असते ना गाणं लागल्यावर डुलकी काढायची. अगदी अधिवेशनावेळी नेतेमंडळी काढतात तशी. जाऊ दे. आपण मैत्रीबद्दल बोलत होतो. हा, तर काय ही दोस्ती तुटायची नाय.. मला मैत्री सांगायचीय ती त्या साहेब आणि राव यांच्यातील. आता हे साहेब आणि राव कोण म्हणून विचारलंस ना तर महाराष्ट्राचा अधिवासी दाखला रद्द करून टाकायला सांगेन. अगं, मैत्री असावी तर बाळासाहेब आणि पवारांसारखी. निरागस, निखल आणि दूरदृष्टी असणारी बरं का. महाराष्ट्राचे हे दोन दिग्गज. काय मित्रत्व जपतात म्हणून सांगू. शिकलं पाहिजे आपण. राजकीय पटलावर एकमेकांचे घोडे मारलेत पण मैत्रीच्या पटलावर मात्र राजाप्रमाणे मित्रत्व जपलंय. सो ग्रेट. साहेबांकडून काही प्रसंग निर्माण झाला किंवा साहेबांवर काही प्रसंग पडला की रावसाहेब प्रेमाने येतात भेटायला मातोश्रीवर. अगं परवाचंच बघ ना. संपूर्ण महाराष्ट्र समस्याग्रस्त आहे यावर जेवढा एकोपा नेत्यांनी केला नाही तेवढा एकोपा पवारसाहेबांना मारल्यानंतर झाला. माझ्या मते ही खूप चांगली गोष्ट आहे. निदान महाराष्ट्र एक होऊ शकतो याची अन्य राज्यांना खात्री पटली. शरद पवारांसारखा दूरदृष्टी लाभलेला नेता महाराष्ट्राला लाभलाय. म्हणून पवारांच्या पडली तेव्हा सर्वांना चिडीने जाग आली. आणि साहेबांनी रावांची बाजू घेतली. अगदी एखाद्या जीवलग मित्रानं घ्यावी तशी. मित्र असावा तर असा. अशी राजकीय पटलापलीकडील जपलेली मैत्री विरळाच. तेव्हा मी काय म्हणतो, आपण सलाम करूया त्यांच्या मित्रत्वाला आणि आपली मैत्री मात्र घट्ट करूया.

तुझाच मैत्री जपणारा,
प्रेयस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा