प्रिय मैत्रिणी,
गुड मॉर्निग झाली का आणि झाली असेल तर अशी आळस देत राहू नकोस। तशी ती तुझी जुनी सवय आहे। चहाबरोबर वर्तमानपत्र वाच। वाचायची सवय नसली ना की मग कोण काय सांगतं ते ऐकत राहावं लागत। अगं, म्हणे त्या संजय निरुपम यांनी पुन्हा परप्रांतीयांचा महिमा गायलाय...ते जाऊ दे। मी काय म्हणतो
मराठी अस्मिता, मराठी बाणा, मराठी हुंकार, मराठी स्वाभिमान आणि अभिमान हे शब्द आता लिहिण्या-बोलण्यापुरतेच राहिलेत. आज कुणीही येतं आणि केव्हाही मराठी माणसाच्या डोक्यावर टपली मारतं। मराठी माणसाची ताकद, शौर्य, निधड्या छातीचा मराठी अशी बिरुदं मिरवणारा मर्दमराठी खरंच नामर्द झालाय का, अशी परिस्थिती निर्माण झालीय।
संजय निरुपम आणि अबू आझमी मनाला वाटेल तेव्हा मराठीचा, मराठी माणसाचा अपमान करीत असतात। त्यांच्या जगी मराठी माणसाची खिजगणतीच नसते। एखादे झुरळ झटकावं तसं मराठी माणसांना मुंबईतून झटकलं जातंय। पण मराठीचे वारी आणि कैवारी तोंडघेवडा विरोध करतात आणि नंतर विसरून जातात। यायाच फायदा जो तो उठवत आहे।
उत्तर भारतीयांनी ठरवंल तर मुंबई बंद पडेल असे अकलेचे तारे तोडणारं विधान संजय निरुपम यांनी केलंय। अर्थात याला मनपा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे। भलतं सलतं केलात तर दात घशात घालू अशी ठाकरी डरकाळी उद्धव ठाकरेंनी फोडलीय तर पक्षात महत्त्व न राहिल्यामुळे सवंग प्रसिद्धीसाठी संजय निरुपम अशी विधानं करीत असल्याचा टोला मनसेनं लगावलाय। निरुपम यांना ख-या अर्थानं तोंडघशी पाडलंय ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी। मुंबई बंद होऊ देणार नाही असं निरुपम यांना फटकारत घरचा आहेर दिलाय। संजय निरुपम यांनी बोलावं आणि इतरांनी लगेच त्याला विरोध करावा यात भीम पराक्रम नाही। निरुपम काँग्रेसमध्ये गेले याचा अर्थ त्यांची मूळची संस्कृती बदलली असा होत नाही। शेवटी निरुपम हे शिवसेनेच्या मुशीतच तयार झालेले आहेत। शिवसेना ज्यांनी ज्यांनी सोडली त्यांनी त्यांनी शिवसेनेवर टीकाच केलीय। त्यामुळे संजय निरुपम यांच्याकडून वेगळी अपेक्षा करणं गैर ठरतं।
उत्तर भारतीय आणि मराठी वाद तसा नवा नाही। हा वाद म्हणजे कोळशावर साचलेली राख आहे। राखेला फुंकर मारली की कोळसा उजळतो तसा हा वादही उफाळतो। आणि त्यात खतपाणी घातलं की आग भडकते। आज मुंबईत शिवसेनेच्या जशा शाखा आहेत तशाच परप्रांतीयांच्या सभा आणि संघ आहेत। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वाद होतच राहणार। खरं पाहिलं तर मुंबईच्या विकासाच्या वेगापेक्षा मराठी माणसाचा मुंबईतून हद्द्पार होण्याचा वेग जास्त आहे। पोटासाठी पार कर्जत-कसारा आणि विरार-डहाणू-पालघरपासून मुंबईत येतो तो मराठी माणूस ठरलाय। कारण व्यवसाय करणं हा मराठी माणसाचा स्वभाव नाही। ज्याप्रमाणे परप्रांतीय छोठा-मोठा कोणताही धंदा-व्यवसाय करतात आणि आपले हातपाय पसरवतात।
मनपाची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच पक्ष आपापल्यापरीने कामाला लागलेत। त्यांचे नेतेही आता पावसात उगवणा-या छत्र्यांप्रमाणे दिसायला लागलेत। मात्र विकासकामांचा विचार राहिला बाजूला एकमोकांवरील कुरघोडीच्या राजकारणाला ऊत आलाय। त्यामुळे पक्षात आपलं अस्तित्व दाखवायचं असेलत तर काहीतरी हिट करणं मह्त्त्वाचं ठरतं आणि तेच निरुपम यांनी केलंय आणि त्याला अन्य पक्षांच्या नेत्यांनीही साथ दिलीय।
शिवसेना आता पहिल्या इतकी मजबूत, बळकट राहिलेली नाही हे सत्य आता शिवसेनेला स्वीकारावं लागेल त्यामुळे छगन भुजबळ, नारायण राणे, संजय निरुपम, राज ठाकरे ही शिवसेनेच्या मुशीत तयार झालेली नेतेमंडळी शिवसेनेवर वार करीत आहेत। शिवसेनेने निरुपम यांचे दात घशात घालयची वेळ दवडलीय। कदाचित निरुपम यांनी शिवसेना सोडली तेव्हाच ती योग्य वेळ होती म्हणजे आता त्यांची जीभ वळवळली नसती।
आज ख-या अर्थानं मराठी माणसंच मराठीच्या मुळावर उठलीत। छोठ्या-मोठ्या कुटुंबातही तेच दिसतंय। त्यामुळे मराठी माणसांची खरी ताकद विखुरली गेलीय। आणि याला इतिहास आहे। कीव याच गोष्टीची करावीशी वाटते की मराठी माणूसच मराठी माणसाची उणी-धुणी काढतोय आणि अन्य लोक त्याचा फायदा उठवत आहेत। मतांच्या जोगव्यासाठी मराठी माणसाची परवड केली जातेय। ती परवड थांबवायला हवीय। मराठी माणलाला विश्वास आणि प्रखर आत्मविश्वासाची अत्यंत गरज आहे।
मात्र एवढं खरं की मराठी माणसाकडे पाहण्याचा राजकीय दृष्टिकोण उदासीन असल्यामुळे कोणीही येतं आणि टपली मारतं।
तुझाच
प्रेयस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा