बुधवार, २४ जून, २०१५

शिक्षणातला विनोद

प्रिय मैत्रणी
आज जाम खुशीत दिसतेय स्वारी! काय खास दिवस आहे? ‘अरे व्वा, म्हणजे तू आता ‘फादर डे’ साजरा करून चांगलाच ‘आदर’ निर्माण केलास तर... त्याची गरज होती गं... कारण आपला ‘योग डे’ अजून यायचाय ना.... ! मी काय म्हणतो मैत्रणी, आपल्याकडे डेज साजरे करण्याचे जे काय फॅड निघाले आहे त्याची शोभा होतेय असे वाटत नाही का? ‘होते ना शोभा, अगदी बरोबर बोललीस...’ जगाला आपण ‘योगा डे’ दाखवला आणि महाराष्ट्राने शिक्षणातील ताव‘डे’ पाहिले. त्यावरून जो काय गदारोळ झाला तो झाला. आता त्याची यत्ता कंची विचारण्यापासून सुरुवात झालीय. तसा महाराष्ट्रात खाते आणि त्याचा मंत्री हा त्या त्या क्षेत्रातला दिग्गज असतोच असे नाही. आजकाल ते ‘अवजड’ होऊनच बसलंय की! म्हणजे काय विचारतेस. हे बघ, आरोग्य खात्याचा मंत्री हा त्या क्षेत्रातला तज्ज्ञ असेलच असं नाही आणि पाच वर्षांनंतर श्वाश्वती नसल्यामुळे खातेवाटपाकडे लक्ष देतंय कोण? कुठेही उभे राहून त्या त्या खात्याबद्दल जोरदार भाषण ठोकता आले म्हणजे झाले. नाही तर पीएसाहेब असतातच की जोडीला!
बरं, तुला विचारायचं राहूनच गेलं बघ. तू जी काय डिग्री घेतलीस ती बोगस तर नाही ना? आणि हो असली तुझी डिग्री बोगस तर तुला तरी कसं कळणार म्हणा? संस्थाच बोगस असेल तर मग प्रश्न उरतोच कुठे उत्तर द्यायला. पण तू काहीही म्हण, परवानगी नसताना बोगस संस्थांकडे सरकार दुर्लक्ष करतंच कसं? डोळ्यांवर एवढी जाड झापडपट्टी बांधायची असते का? जाऊ दे गं... तू काळजी करू नकोस? तू मला तुझ्या असणाऱ्या पदवीसहित पसंत आहेस.
अरेच्या मैत्रणी, तू ‘शिक्षणाच्या आयचा घो’ सिनेमा पाहिलास का? नाही पाहिलास तर एकदा तरी नक्की पाहा. मला काय म्हणायचं, आता आपण जे काय EDUCATION घेत आहोत ते खऱ्या अर्थाने ‘येडूकेशन’ आहे असं मला वाटतंय...तुला नाही का वाटत तसं...वाटतं ना? काळानुरूप या ‘येडूकेशना’त थोडा बदल होत असला तरी स्पर्धा वाढवून ठेवलीच आहे की! मैत्रणी, ऐकतेस ना, नाहीतर मी शिक्षणावर बोलतोय आणि तू वामकुक्षी घ्यायचीस...गेली २० वर्षे घेतलीस शिकताना तशी...
शिक्षणात टक्केवारी व स्पर्धा आली आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाचं बाजारीकरण झालं. या बाजारीकरणाचा बळी ठरले ते विद्यार्थी...त्यातच ते सामान्य घरातील असतील तर आणखीनच हाल... जिद्द बरंच काही मिळवून देत असली तरी पैशाचं सोंग सर्वांना सर्वकाळ करता येत नाही ना! शाळेतले अनेक शिक्षकच क्लासवाले झाल्यामुळे शिक्षण वाट्यालाही लागलं, वाटायलाही लागलं आणि वाटेलाही लागलं.
समानतेची शिकवण देणारी शाळा पहिल्याच दिवशी जातीचे दाखले मागू लागल्या. शिक्षणानं समाजात समानता येण्याऐवजी विषमताच जास्त पसरताना दिसत आहे. त्याला सरकारी पातळीवरील अनास्थाही जबाबादार आहे, असं म्हटले तर मैत्रणी त्यात वाईट वाटण्यासारखं नाही. शिक्षणाच्या वर्गवारीने ‘आर्थिक जातीयवाद’ निर्माण केला आहे, एवढेच नव्हे तर तो फोफावत आहे. त्यामागे ‘महाग’ करून ठेवलेलं शिक्षण कारणीभूत आहे असं नाही का वाटत? सरकारी शाळा आणि खाजगी शाळा यातील आर्थिक आणि शैक्षणिक दर्जाची दरी स्पष्टपणे दिसतेय. आपल्याकडे शाळांचेही शैक्षणिक स्तर आहेत. मराठी शाळा, इंग्रजी शाळा, नॅशनल शाळा, इंटरनॅशनल शाळा... यांमुळे शैक्षणिक जातीयवाद आणि आर्थिक जातीयवाद उभा राहताना दिसतोय. त्यामुळे गरीब किंवा मध्यमवर्गातील विद्यार्थी इंटरनॅशनल शाळेत शिकू शकतील का? मैत्रणी, मला काय म्हणायचे की, शिक्षणात समानता तेव्हाच येईल जेव्हा सरकारी शाळांमध्ये इंटरनॅशनल स्कूलमधील सोयीसुविधा असतील आणि इंटरनॅशनल शाळेत सर्वसामान्यांचा मुलगा शिकू शकेल. त्यातच आपली शिक्षणपद्धती म्हणजे पदवीसाठी तारुण्य वेचणारी आहे. ज्या तारुण्यात काहीतरी करून दाखवण्याची रग असते ती रग, विद्यार्थ्यांमधील ऊर्जा पदवीसाठी खर्च होते. बरं, पदवी घेतल्यानंतरही तरुणांसमोर प्रश्नचिन्ह असतेच की ‘आता काय?’... शिक्षण पद्धती असे प्रश्नचिन्ह निर्माण करते हाच मोठा शिक्षणातील ‘विनोद’ आहे.
तुझाच खरा डिग्रीवाला,

प्रेयस.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा