हे ‘बंधुत्व’ आणि हे ‘मित्रत्व’
प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सर्व काही माफ असतं. अक्षम्य चुका क्षम्य असतात. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रपतीपदाच्या निवडीचा वाद सुरू आहे. या वादात राजकीय पक्षांनी आपले रंग दाखविले. एवढेच नव्हे तर संगमांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. पण अशा या पेचात सरस ठरली ती मैत्री. राजकीय पटलावरचे सम्राट शरद पवार आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची निखल मैत्री आणि त्यांचं मित्रत्व कामाला आलं. तर उद्धव ठाकरेंना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर राजकारणापलीकडचे बंधुप्रेम उफाळून आलं. राजकारणापलीकडचं बंधुत्वाचं नातं ख-या अर्थाने महत्त्वाचं असतं हे त्यांनी दाखवून दिलं. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं तमाम मराठी मनांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरेंच्या एका हृदयाने ते काही काळासाठी का होईना पण केलं. मीडियावाल्यांनी अनेक शक्यतांच्या फटाक्यांची आतषबाजी करत चर्चेला तोंड फोडलं. मग पिंपळपारावरील बैठक तरी कशी मागे राहील. पिंपळपारावरच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटू लागले. आणि त्यांनी विषय निवडला ‘हे मित्रत्व आणि हे बंधुत्व’.
‘आज ख-या अर्थाने बंधुभाव जागृत झाला. माझ्यासह अनेकांना त्याचा आनंद झाला. भावाने भावाची भेट घेणं यातच सर्व आलं,’ राजा संपादके संपादकीय लिहिण्याच्या ढंगात बोलले. संपादकेंचं बोलणं थांबतं न थांबतं तोच नेहा नटवे केसांच्या पिसा-यात हात घालत म्हणाली, ‘अय्या मला तर आज रामायण आठवलं...म्हणजे राम वनवासात असतानाची त्यातील राम आणि भरत यांची भेट आठवली आणि....’ ‘नटवे काय बोलतेस काय, उद्धव काय वनवासात होते?, अगं त्यांना बरं नव्हतं म्हणून भेटले.’ दादा समाजे नटवेला समजावत म्हणाले.
‘सॉरी सॉरी हं. त्याचं काय झालं त्यांचं बंधुप्रेमाच्या बातम्या आत्मतिडकीने देताना मी जरा हेलावूनच गेल. काय सांगू, त्यांच्यातील प्रेम सांगताना मला जरा प्रेमाचं भरतंच आलं होत.‘
‘येईल तुला ना भरतं काय प्रेम ओसंडून वाहेल. नशीब मगाशी महाभारत आठवलं म्हणून म्हटलं नाहीस.’ सत्या परखडे नटवेकडे तिरक्या नजरेनं पाहात म्हणाले.
‘नटवेनं म्हणे बंधुप्रेम चावून चावून चघळले सकाळपासून संध्याकाळपर्यंत’, संपादकेंनी परखडेंकडे कटाक्ष टाकत नेटवेला टोला हाणला. पण गप्प बसेल ती नेहा नटवे कसली. तिने लगेच राजा संपादकेंना उत्तर देऊन टाकलं, ‘आम्ही चावून चावून चघळले आता तुम्ही लिहून लिहून छापा.’
संपादके आणि नटवे यांच्यातील वाद वाढणार नाही याची काळजी जागृत विचारेंनी घेतली. ‘तुम्ही दोघंही वाद थांबवा. पण राज ठाकरेंनी आज जे बंधुप्रेम दाखवलं ते याग्यच होतं. भाऊ भावाच्या पाठीशी उभा राहणार नाही तर कोण राहणार? शेवटी त्यांच्यातील रक्ताचं नातंच पुढे आलं. राजकीय वाद असताना असा दिलदारपणा दाखवणं यासाठी मोठं काळीज लागतं. राजकारणापेक्षा कुटुंबही महत्त्वाचं असतं.’
‘एकदम बरोबर बोललात, समाजे’, आज जरा शांत असलेले परखडे बोलले. तुम्ही या संपादके आणि नटवे यांच्यातील वाद वाढला असता तर नटवेंनी महाभारतातील कृष्ण-अर्जुनचं उदाहरण दिलं असतं. आणि कृष्णाने जसं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं तसं म्हणे राजने उद्धव ठाकरेंच्या गाडीचं केलं. या नेहा नटवेचा काय नेम नाही.’
‘मग काय तुमच्यावर नेम लावू’ नटवे जरा जोशातच बोलली. त्याबरोबर चर्चेत हशा पिकला.
‘राजनी जसं बंधुत्वाचं नातं दाखलवं तस सर्व राजकारण्यानी दाखवलं पाहिजे. फक्त राजकारण एके राजकारण करून चालणार नाही. समाजाप्रती, कुटुंबाप्रती काही आपली जबाबदारी आहे याची जाणीव सर्व राजकारणी मंडळींना व्हायला हवी. स्वत:च्या विकासाबरोबर समाजाचा विकास करताना असा बंधुभाव दाखवला पाहिजे’, दादा समाजेंच्या शब्दांतून प्रेमाबरोबर समाजसेवाही सांडत होती.
‘पण काहीही म्हणा आठवड्यात आपल्याला बंधुत्व आणि मित्रत्व यांचं दर्शन झालं. असं दर्शन होणं म्हणजे योग यावा लागतो. त्यासाठी भोगही भोगावे लागतात‘ सत्या परखडेंनी मध्येच मित्रत्वाचा मुद्दा मांडला.
बंधुत्वाच्या विषयाबरोबर मित्रत्वाचा विषय चालवला गेला. राजकारणात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंची राजकारणापलीकडील मैत्री सर्वश्रुत आहे. जेव्हा जेव्हा राजकीय पेचप्रसंग निर्माण होतात तेव्हा तेव्हा बारामती मुंबईला येते.
‘मग काय बारामती मुंबईला आली रे आली की आम्ही सर्व जगाला दाखवली’, नेहा नटवेंने संपादकेंकडे बघत शब्दफेक केली.
‘राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून जे रामायण, महाभारत होतंय ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण छोटीशी गोष्ट मोठी करतो. तिच्यावर महाचर्चा घडवतो. वेळ आणि पैसा खर्च करतो. लोकशाही भारतात वेळ आणि पैशांचा अपव्यय टाळणं हे राजकारणी मंडळींनी पाहिलं पाहिजे. काँग्रेसला राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार निवडण्यासाठी प्रणवदांची मदत घ्यावी लागली. त्यांना अन्य पक्षांकडून विरोध झाल्यामुळे आणि त्यातच भाजपने विरोध दर्शविल्यामुळे मोठा बाका प्रसंग निर्माण झाला. शेवटी शिवसेनेने प्रणवदांना पाठिंबा दर्शविला. प्रणवदांच्या भेटीवेळी शरद पवार मातोश्रीवर हजर होते. यालाच मित्रत्व म्हणतात,’ जागृत विचारेंनी आपले विचार मांडले.
ही चर्चा बंधुत्व आणि मित्रत्वाच्या नात्यावर रंगत होती. सर्व जण आपापले विचार मांडत होते... इतक्या अद्यापपर्यंत एकही शब्द न बोलणार सदा सामान्ये म्हणाले, ‘ बंधुत्व आणि मित्रत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्याची तिसरी बाजू आहे ‘भाव’.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा