सोमवार, २ जुलै, २०१२

प्रिय मैत्रणी


असं घडायला नव्हे तर घडवायला हवं...

खूप दिवसांनी पत्र लिहिण्याच योग आला. तूही वाट पाहत बसली असशीलच तर म्हटलं वेगळं काहीतरी लिहू..
समाज म्हटला की, त्या त्या समाजाचे रीतिरिवाज, परंपरा, रुढी, संस्कृती आणि चालीरीती आल्याच. ते सर्व रीतिरिवाज कसोशीने पाळणारेही आलेच. पालखी असली म्हणजे भोई असायला हवेच. सोप्या सोप्या गोष्टी कठीण करून त्यात अडकत जाण्यात काहींना मोठा आनंद वाटतो तर काही जणांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. काही समाजांत सूतक आणि सुवेर या दोन गोष्टी मानल्या जातात. पाळल्याही जातात. त्यात काही गैर वाटण्यासारखं नाही. यात भावना आणि व्यवहाराचा विचार केला तर भावना नेहमीच व्यवहारावर मात करताना दिसते. एखाद्याच्या घरी मूल जन्माला आले की 11 दिवसांचा सुवेर आणि एखाद्याच्या घरी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 11 दिवसांचं सूतक म्हणजे दुखवटा पाळला जातो. एखादी व्यक्ती कायमची निघून जाणं याचं अतिव दु: ख होणं यात शंका नाही. पण आज युग ज्या झपाट्याने प्रगती करीत आहे, बदलत आहे त्याच झपाट्याने व्यावसायिक गणितंही बदलत आहेत. वेळेचं गणितही तेवढंच बदलत आहे. त्यामुळे अनेकदा आपण आपल्या सोयीनुसार मार्ग काढत असतो. उदा. मुंबईत बरीचशे विवाह हे हॉलच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. त्यानुसार दोन्ही घरांमध्ये व्यवहार ठरविले जातात. विवाहाची तारीख ठरवली जाते. सर्व नियोजन केलं जातं. अनेक नातेवाईकांना मान-सन्मान देण्यासाठी पायाच्या चपलाही झिजवून निमंत्रण दिलं जातं. दोन्ही बाजूंकडे आनंदी वातावरण असतं...आणि एक फोन येतो....अरे, आपल्याला सुवेर आला आहे... यावेळी ज्या बाजूकडील मंडळींना हा फोन येतो त्यांच्या नजरेसमोर निदान दोन मिनिटे तरी काळोख येतो. आणि त्याच्या तोंडून ही दोन वाक्य नक्कीच ऐकू येतात...
1. आत्ताच बाळंत व्हायचं होतं..
किंवा
2. धाड भरली आत्ताच मरायला वेळ मिळाला
मग मॅनेज केलेल्या सर्व गोष्टी रिमॅनेज कराव्या लागतात. तो जो काही रिमॅनेजचा ताप असतो तो त्या निस्तरणाऱ्या व्यक्तीलाच कळतो. जन्म किंवा मृत्यू ही गोष्ट आपल्या हातात नसली तरी अशा गोष्टींमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी निदान विचार करायला हवा. तसा प्रयत्न करणे तरी आपल्या हातात आहे. काही गावांमध्ये असा बदल होत असल्याचे ऐकू आले. "ज्यांच्या घराच्या मूल जन्माला आले तर त्याच्या घरात 11 दिवस सुवेर किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 11 दिवस सूतक पाळले जाते. भावकीने सूतक किंवा सुवेर 11 दिवस पाळू नये." हे एकून जरा धक्का बसला. पण जेव्हा व्यावहारिक पातळीवर विचार केला तेव्हा त्यांनी स्वीकारलेली नवी गोष्ट योग्यच वाटली.
तेव्हा- ज्याप्रमाणे माझा धर्म आणि देव घरापुरताच असावा तसाच सुवेर आणि सूतकही घरापुरतेच मर्यादित असावं.
असा नवा विचार व्हायला काय हरकत आहे ?

तुझाच बदल पाहणारा,
प्रेयस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा