माझी लाडकी शाळा
शाळा सिनेमा ज्यांना ज्यांनी पाहिला असेल त्यांना आपल्या भूतकाळातील आठवणींना उजाळा मिळाला असेल. मग तो आपल्या शालेय जीवनाचा असेल, एखाद्या प्रसंगाचा असेल किंवा अधु-या प्रेमकहाणीचा असेल, तर सफल प्रेमाचाही असेल, शिक्षकांनी दिलेल्या शिक्षेचा असेल किंवा शिक्षकांना कसं बनवलं याचा असेल. अनेकांच्या मनातील, हृदयातील भावनाही दाटून आल्या असतील...मलाही अशाचा माझ्या शाळेच्या आठवणी मनी दाटून आल्या. आठवणींच्या इतिहासाचं पान झपकन सरकून न जाता सावकाश उलटले आणि एक एक सोनेरी क्षण नव्याने झळालले. त्यांचेच नाव आहे माझी शाळा. श्री महाकाली इंग्लिश स्कूल नवेदर आडिवरे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील अनेक वाड्याचं सुंदर आणि स्वप्नवत बनलेलं आणि निसर्गानं नटलंलं, सजलंल आडिवरे हे माझं गाव. या गावाचं ग्रामदेवत आहे श्री महाकाली देवी. या ग्रामदेवतेचं ग्रामस्थांच्या हृदयात जेवढं मानाचं, प्रेमाचं, आदराचं, श्रद्धेचं स्थान आहे तितकंच स्थान श्री महाकाली इंग्लिश स्कूल नवेदर आडिवरे या माझ्या शाळेचं आहे. संपूर्ण जिल्ह्यात एक नावजलेली आणि स्वत:चं वेगळेपण जपणारी शाळा म्हणून तिची महती खूप मोठी आहे. या शाळेतून यशस्वीरीत्या बाहेर पडलेल्या पहिल्या विद्यार्थ्यांच्या बॅचपासून आताच्या विद्यार्थ्यांपर्यंत मनात शाळेचा आदर आहे आणि तेवढाच मान आहे अन या शाळेत शिकल्याचा सार्थ अभिमान आहे.
वाडापेठपासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेली माझी शाळा शांत वातावरणात आहे. बाजूने जाणारा डांबरी रस्ता, दुस-या बाजूला मळेशेती, एका बाजूला हापूसच्या कलमांची बाग आणि एका बाजूला खास असं आकर्षण आणि सर्वाच्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेला भाऊ डॉक्टरांचा दवाखाना आणि त्यांचं घर.
सभोवार असलेल्या शाळेच्या इमारती...मधे खेळाचे मोठे मैदान...काही खोल्यांवर कौले...जांभ्या दगडांच्या चिरेबंदी भिंती आणि काही विटांच्या भिंतींचे वर्ग...अशी काही शाळेची औरच नजाकत...शाळेच्या वरच्या बाजूला विहीर...अजूनही कापडी पिशवीचं दप्तर घेऊन वर्गात बसावंस वाटतं.
पूर्वी शाळेच्या परिसरात सुरूची झाडे शाळेची शोभा वाढवायची... सुरुच्या झाडांसोबत निलगिरीच्या झाडे आणि जोडीला अशोक होताच...मैदानातील सुरूची झाडे वा-याबरोबर जेव्हा खेळायची तेव्हा मनाला सुखावेल असा नाद निर्माण व्हायचा आणि एअरकंडिशनला लाजवेल असा गारवा सर्व वर्गात वावरायचा. शाळेच्या विस्तीर्ण अशा मैदानात राज्यस्तरीय खो-खो, कबड्डी, गोलाफेक, भालाफेक
अशा स्पर्धा तर व्हायच्या, शिवाय रिलेवेळी तर औरच मजा यायची. राज्यस्तरीय किंवा तालुकास्तरीय पातळ्यांवरील स्पर्धा असायच्या तेव्हा शाळेत जणू क्रीडा महोत्सवच असायचा. त्यावेळचा आनंद काही वेगळाच असायचा. विविध खेळ पाहायला सर्व वर्ग सोडून दिले जायचे. आणि आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना, त्यांचा खेळ पाहताना भारी मजा यायची. सीनिअर्स विद्यार्थ्यां ची नावेही माहीत नसा्यची...पण आमच्यात त्यांच्यापेक्षा जास्त उत्साह संचारलेला असायचा. कबड्डीतील चढाई आणि खो-खोत मारलेली डाय पाहताना आरडाओरड करायला जाम मजा यायची, तर डाय चुकली तर चुकचुक करायची वेळ यायची. पुढे मलासुद्धा खो-खो खेळायची संधी मिळाली, हे मी आता सांगितलं तर लोक नक्कीच माझ्याकडे संशयाने पाहतील, यात तीळमात्र शंका नाही. अशा या मैदानात सातवी-आठवीत असताना आम्ही पकडापकडी खेळायचो ते मोठ्या म्हणजे जेवणाच्या सुटीत. शाळेजवळ राहणारे विद्यार्थी पाऊण तासात घरी जाऊन जेवून यायचे...बाकी लांबचे सर्व विद्यार्थी सकाळी यायचे ते संध्याकाळी घरी जाऊनच जेवायचे. त्यामुळे मधला वेळ असा घामजेपर्यंत खेळण्यात सत्कारणी लावायचा. नववी-दहावीला मात्र कुठेतरी उभे राहून किंवा मळ्यात फिरून किंवा एखाद्या आंब्याच्या झाडावर बसून शिक्षक आणि अन्य कुठल्याही विषयावर पाऊण तास चर्चा झडायच्या. त्यात अभ्यासाविषयी चर्चा अपवादात्मकच असायच्या.
माझं तळीवाडी गाव हे या शाळेपासून चक्क पाच किलोमीटर दूर आहे. तेव्हा रोज दहा किमीचे अंतर तुडवत शाळा शिकायची. मी मामांच्या गावी राहत होतो. त्यामुळे मला तो त्रास सहन करावा लागला नाही. पण मी शनिवार, रविवार माझ्या घरी जायचो. तेव्हा असाच पाच किमीचा प्रवास करत. शाळा सकाळी ११ ते ५ या वेळेत भरायची. तळीवाडीतून तसं वेगात चाललं तरी एक ते सव्वा तास कुठे जायचा नाही. त्यात आम्ही सर्व विद्यार्थी म्हटल्यावर रमतगमत जाणं-येणं व्हायचं. सकाळी ९.३० ला घर सोडायचं ते संध्याकाळी दिवेलागणीलाच म्हणजे ६.३० वाजताच घरी यायचं. पावसाळ्यात मात्र थोडीफार मजा असायची. एकदा का कातळावर आलो की, पावसात कातळावर सापडणा-या कुर्ल्या (खेकडा) पकडत शाळेत जायचं. त्या पकडलेल्या कुर्ल्या कुठे तरी दडवून ठेवायच्या आणि संध्याकाळी घरी येताना घरी घेऊन यायच्या. त्यावेळी सडकीचा कच्चा रस्ता होता. त्या रस्त्यावर दोन परे लागायचे. एक मुसळ आणि दुसरा आडाचा. खूप पाऊस आला की प-या पार करणं जोखमीचं व्हायचं. मग सर्व साखळी करून प-या पार करायचो. उन्हाळ्याच्या दिवसांत करवंद आणि कै-या यांचा समाचार घेतच शाळेतून घरी आणि घरातून शाळेत जाणं होत असे. हिवाळ्यात सकाळीची शाळा असायची. पाच फुटांच्या पुढचं दिसतानाना मारामार असायची. त्यावेळी कातळावरील गवताला आगी लावून शेकोटी घेण्याचा नित्य उपक्रम असायचा. आग पसरू नये याचीही काळजी घ्यायचो. जेव्हा दिवस लहान असायचा तेव्हा तर घरी जायला चक्क अंधार पडायचा. मग तळीवाडी, मोगरे आणि व्येत्ये येथील विद्यार्थी हेडमास्तर श्री. चव्हाण सरांकडे जायचो. त्यांना वस्तुस्थिती सांगायची... मग माझी शाळा विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायची. शाळेची वेळ १०.३० ते ४.३० अशी केली जायची. काही विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यार्थी हा निर्णय मान्य करायचे हाच खरा मोठेपणा होता.
माझ्या शाळेला तसा खूप मोठा इतिहास आहे. तो पुन्हा केव्हातरी पाहू. पण अशा या शाळेला जो शिक्षकवृंद लाभला होता तो अतिशय प्रेमळ, जिज्ञासू, विद्यार्थ्यांवर मनस्वी प्रेम करणारा. शाळेसाठी स्वत:च्या घराइतकाच प्रेम करणारा, शाळेचा हित जोपासणारा, वेळप्रंसगी पदरमोड करणारा, आणि एखादी चूक झाल्यास विद्यार्थ्याला शिक्षाही करणारा. असा शिक्षकवृंद लाभणं हे शाळेचं भाग्य आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांचं नशिब. अशा या शिक्षकवृंदात मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर, उपमुख्याध्यापक श्री. शेवडे सर, श्री. भट सर, श्री. पुंडपाळ सर, श्री. देसाई सर, श्री. भिडे सर, श्री. दबडे सर, श्री. हजारे सर, श्री. गुणे सर, श्री. जी. के. जाधव सर, श्री.कानविंदे सर, श्री. एस. के. जाधव सर, श्री.साखरकर सर, सौ, तेलंग मॅडम, भागवत मॅडम, नाईक मॅडम यांचा समावेश मोठ्या अभिमानाने करावा लागेल. या शिक्षकवृंदाबरोबर ज्यांचे नाव नेहमीच घ्यावे लागते ते श्री. तेलंग सर. या सर्वांनी मिळून अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले. त्यासाठी अपार मेहनत घेतली. विनावेतन काम केलं. त्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी होण्याचे भाग्य लाभले.
माझ्या शाळेचा शिपाईवृंदही तितकाच प्रेमळ होता. आम्ही सर्व विद्यार्थी त्यांना तात्या म्हणत असू. अडचण, काही काम असलं की हे तात्याच आठवायचे आणि मदत करायचे. त्यात पावणाक तात्या सर्वांच्या आवडीचे. सुधाकर तात्या, रघू तात्या, विलास तात्या ही 'तात्या' मंडळी सेवेसाठी आणि मदतीसाठी सदैव तत्पर असायची. रघू तात्यांचं अक्षर म्हणजे मोती. त्यांच्या अक्षरांसारखं आपलं अक्षर असावं असं हजारवेळा तरी वाटायचं. एकदा पावसात वादळ आलं आणि नवीन बांधलेल्या वर्गाचं छप्पर उखडलं गेलं. आश्चर्य म्हणजे ते छप्पर पुन्हा उभारण्याचं काम सर्व शिक्षकांनीच केलं होतं, याची नोंद आवर्जून घ्यावी लागते. कारण शाळेवर अपत्याप्रमाणे प्रेम करणारे शिक्षक विरळाच असतात. असंच आणखी एका व्यक्तिमत्वाचं आवर्जून नाव घ्यावं लागेल आणि ते नाव आहे सर्वांचे आदरणीय डॉ. भाऊ जोशी. शाळेतील कोणत्याही कार्यक्रमावेळी हे ठरलेले आणि सर्वांचे आवडते गेस्ट. कोणत्याही विषयावर ते बोलायचे. अशा या डॉक्टर भाऊ जोशींबद्दल सर्वांच्या मनात नितांत आदर आणि प्रेम. त्यांच्यविषयी नक्की कधीतरी लिहीन.
असो. अशी माझी सर्वगुणसंपन्न शाळा आणि तिच्या आठवणी. शाळेबद्दल आठवण आली की मन कधी भरारी मारून येतं ते कळतही नाही. शाळेतील आठवणींवर मन कसं हिंदोळत असतं ते त्याचं त्यालाच माहीत. अशी ही माझी श्री महाकाली इंग्लिश स्कूल नवेदर आडिवरे ही शाळा खरंच दी ग्रेट. अशा या ग्रेट शाळेचे विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये ग्रेट कामगिरी करत आहे. याचा अभिमान आहे. त्यामुळे माझ्या या लाडक्या शाळेला सॅल्युट !!!
या शाळेला जो शिक्षकवृंद लाभला होता तो अतिशय प्रेमळ, जिज्ञासू, विद्यार्थ्यांवर मनस्वी प्रेम करणारा. शाळेसाठी स्वत:च्या घराइतकाच प्रेम करणारा, शाळेचा हित जोपासणारा, वेळप्रंसगी पदरमोड करणारा, आणि एखादी चूक झाल्यास विद्यार्थ्याला शिक्षाही करणारा. असा शिक्षकवृंद लाभणं हे शाळेचं भाग्य आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांचं नशीब...
उत्तर द्याहटवाखूपच छान!
माझ्या प्रिय शाळेस,
हटवातुझ्यामुळेच मी शब्दांच्या दुनियेत हरवून गेलो....
शब्द शब्द जूळवून कविता करू लागलो...
तुझ्यामुळेच आता हे जीवन जगावस वाटु लागल ....
नकोस वाटणारे आयुष्यही आता छोट भासु लागल ....
तुझ्यामुळेच अन्यायाविरुद्ध आवाज उठवू लागलो...
काव्याद्वारे हैवानाना शब्दांचे फटके देवू लागलो...
तुझ्यामुळेच ....खरच तू दिलेल्या न्यानाच्या शिदोरिमुळेच ...!!
-------सुहास शेडेकर ------...
chaan dada.... punha salet gelyasarkhe vatale....!!!!
हटवा