मंगळवार, १७ जुलै, २०१२

बंधुत्व आणि मित्रत्व


 हे बंधुत्व आणि हे मित्रत्व

प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सर्व काही माफ असतं. अक्षम्य चुका क्षम्य असतात. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रपतीपदाच्या निवडीचा वाद सुरू आहे. या वादात राजकीय पक्षांनी आपले रंग दाखविले. एवढेच नव्हे तर संगमांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. पण अशा या पेचात सरस ठरली ती मैत्री. राजकीय पटलावरचे सम्राट शरद पवार आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची निखल मैत्री आणि त्यांचं मित्रत्व कामाला आलं. तर उद्धव ठाकरेंना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर राजकारणापलीकडचे बंधुप्रेम उफाळून आलं. राजकारणापलीकडचं बंधुत्वाचं नातं ख-या अर्थाने महत्त्वाचं असतं हे त्यांनी दाखवून दिलं. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं तमाम मराठी मनांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरेंच्या एका हृदयाने ते काही काळासाठी का होईना पण केलं. मीडियावाल्यांनी अनेक शक्यतांच्या फटाक्यांची आतषबाजी करत चर्चेला तोंड फोडलं. मग पिंपळपारावरील बैठक तरी कशी मागे राहील. पिंपळपारावरच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटू लागले. आणि त्यांनी विषय निवडला हे मित्रत्व आणि हे बंधुत्व’.
आज ख-या अर्थाने बंधुभाव जागृत झाला. माझ्यासह अनेकांना त्याचा आनंद झाला. भावाने भावाची भेट घेणं यातच सर्व आलं, राजा संपादके संपादकीय लिहिण्याच्या ढंगात बोलले. संपादकेंचं बोलणं थांबतं न थांबतं तोच नेहा नटवे केसांच्या पिसा-यात हात घालत म्हणाली, अय्या मला तर आज रामायण आठवलं...म्हणजे राम वनवासात असतानाची त्यातील राम आणि भरत यांची भेट आठवली आणि.... नटवे काय बोलतेस काय, उद्धव काय वनवासात होते?, अगं त्यांना बरं नव्हतं म्हणून भेटले. दादा समाजे नटवेला समजावत म्हणाले.
सॉरी सॉरी हं. त्याचं काय झालं त्यांचं बंधुप्रेमाच्या बातम्या आत्मतिडकीने देताना मी जरा हेलावूनच गेल. काय सांगू, त्यांच्यातील प्रेम सांगताना मला जरा प्रेमाचं भरतंच आलं होत.
येईल तुला ना भरतं काय प्रेम ओसंडून वाहेल. नशीब मगाशी महाभारत आठवलं म्हणून म्हटलं नाहीस. सत्या परखडे नटवेकडे तिरक्या नजरेनं पाहात म्हणाले.
नटवेनं म्हणे बंधुप्रेम चावून चावून चघळले सकाळपासून संध्याकाळपर्यंत’, संपादकेंनी परखडेंकडे कटाक्ष टाकत नेटवेला टोला हाणला. पण गप्प बसेल ती नेहा नटवे कसली. तिने लगेच राजा संपादकेंना उत्तर देऊन टाकलं, आम्ही चावून चावून चघळले आता तुम्ही लिहून लिहून छापा.
संपादके आणि नटवे यांच्यातील वाद वाढणार नाही याची काळजी जागृत विचारेंनी घेतली. तुम्ही दोघंही वाद थांबवा. पण राज ठाकरेंनी आज जे बंधुप्रेम दाखवलं ते याग्यच होतं. भाऊ भावाच्या पाठीशी उभा राहणार नाही तर कोण राहणार? शेवटी त्यांच्यातील रक्ताचं नातंच पुढे आलं. राजकीय वाद असताना असा दिलदारपणा दाखवणं यासाठी मोठं काळीज लागतं. राजकारणापेक्षा कुटुंबही महत्त्वाचं असतं.
एकदम बरोबर बोललात, समाजे, आज जरा शांत असलेले परखडे बोलले. तुम्ही या संपादके आणि नटवे यांच्यातील वाद वाढला असता तर नटवेंनी महाभारतातील कृष्ण-अर्जुनचं उदाहरण दिलं असतं. आणि कृष्णाने जसं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं तसं म्हणे राजने उद्धव ठाकरेंच्या गाडीचं केलं. या नेहा नटवेचा काय नेम नाही.
मग काय तुमच्यावर नेम लावू नटवे जरा जोशातच बोलली. त्याबरोबर चर्चेत हशा पिकला.
राजनी जसं बंधुत्वाचं नातं दाखलवं तस सर्व राजकारण्यानी दाखवलं पाहिजे. फक्त राजकारण एके राजकारण करून चालणार नाही. समाजाप्रती, कुटुंबाप्रती काही आपली जबाबदारी आहे याची जाणीव सर्व राजकारणी मंडळींना व्हायला हवी. स्वत:च्या विकासाबरोबर समाजाचा विकास करताना असा बंधुभाव दाखवला पाहिजे, दादा समाजेंच्या शब्दांतून प्रेमाबरोबर समाजसेवाही सांडत होती.
पण काहीही म्हणा आठवड्यात आपल्याला बंधुत्व आणि मित्रत्व यांचं दर्शन झालं. असं दर्शन होणं म्हणजे योग यावा लागतो. त्यासाठी भोगही भोगावे लागतात सत्या परखडेंनी मध्येच मित्रत्वाचा मुद्दा मांडला.
बंधुत्वाच्या विषयाबरोबर मित्रत्वाचा विषय चालवला गेला. राजकारणात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंची राजकारणापलीकडील मैत्री सर्वश्रुत आहे. जेव्हा जेव्हा राजकीय पेचप्रसंग निर्माण होतात तेव्हा तेव्हा बारामती मुंबईला येते.
मग काय बारामती मुंबईला आली रे आली की आम्ही सर्व जगाला दाखवली’, नेहा नटवेंने संपादकेंकडे बघत शब्दफेक केली.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून जे रामायण, महाभारत होतंय ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण छोटीशी गोष्ट मोठी करतो. तिच्यावर महाचर्चा घडवतो. वेळ आणि पैसा खर्च करतो. लोकशाही भारतात वेळ आणि पैशांचा अपव्यय टाळणं हे राजकारणी मंडळींनी पाहिलं पाहिजे. काँग्रेसला राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार निवडण्यासाठी प्रणवदांची मदत घ्यावी लागली. त्यांना अन्य पक्षांकडून विरोध झाल्यामुळे आणि त्यातच भाजपने विरोध दर्शविल्यामुळे मोठा बाका प्रसंग निर्माण झाला. शेवटी शिवसेनेने प्रणवदांना पाठिंबा दर्शविला. प्रणवदांच्या भेटीवेळी शरद पवार मातोश्रीवर हजर होते. यालाच मित्रत्व म्हणतात, जागृत विचारेंनी आपले विचार मांडले.
ही चर्चा बंधुत्व आणि मित्रत्वाच्या नात्यावर रंगत होती. सर्व जण आपापले विचार मांडत होते... इतक्या अद्यापपर्यंत एकही शब्द न बोलणार सदा सामान्ये म्हणाले, बंधुत्व आणि मित्रत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्याची तिसरी बाजू आहे भाव’.

गुरुवार, १२ जुलै, २०१२

...आणि आदर्श चर्चा हरलवी


आदर्श सोसायटी घोटाळा वाढतोय, गाजतोय, वाजतोय आणि बडवला जातोय. जेवढं झाकलं जातयं तेवढं उघडं होतंय. चौकशी आयोगासमोर येणारे चार बोटं आपल्याकडे ठेवून एका बोटाने दुस-याचं नाव सूचकरणे सुचवत आहेत. तू-तू मै-मैबरोबर तो-तोचा आणि तो मी नव्हेच करत सही रे सहीचं नाट्य रंगलंय. मीडियाने तर बातम्या देण्याचं काम चोख बजावलंय. वर्तमानपत्रात आदर्शबाबत रोज एक बातमी उगवतेय. तर चॅनेलवाले चर्चा, महाचर्चा आणि विशेष चर्चा घडवत आहेत. उशिरा का होईन सत्य नेहमीप्रमाणे शेवटीच बाहेर येणार. पण आज पिंपळाच्या पारावर सप्तजणांची बैठक बसली होती आणि तिचा आजचा विषयही होता आदर्श सोसायटी घोटाळा. चर्चेसाठी राजकीय पटलावर नेहमी वावरणारे बाबा राजगिरे, गल्लीबोलात समाजसेवा करणारे दादा समाजे, सर्व गोष्टींबाबत विश्लेषणाची बाजू मांडणारे जागृत विचारे, टीव्ही अँकर नेहा नटवे, कशाचीही भीडभाड न राकता-चूक की बरोबर याची तमा न बालगता बोलणारे सत्या परखडे, स्वत:चे वर्तमानपत्र चालविणारे आणि संपादक म्हणून काम करणारे राजा संपादके आणि नेहमीच शेवटी बोलणारे आणि सामान्यांचे प्रतिनिधी करणारे सदा सामान्ये.

पिंपळाच्या पारावर बैठकीला सुरुवात झाली. जवळच्या चहावाल्याकडून अद्रक मार के चहा मागवला. चहाचा घोट घेत राजा संपादके बोलले, वा ssss काय फक्कड चहा झालाय. एकदम झकास. फर्स्ट क्लास. अद्रकचा मस्त वास येतोय. 
काय बाबा राजगिरे, काय धापा मारताय. अहो. अद्रकचा नाही आदर्शचा वास येतोय. सत्या परखडे परखडपणे बोलले. परखडेंचा स्वभाव तसा परखड आणि थोडासा तापट. सत्य काय, असत्य काय,  चूक काय, बरोबर काय, याचा सारासार विचार करणं त्यांच्या स्वभावात नाही. जे काय बोलायचं ते तेथल्या तेथेच. ताडफाड हिशेब आणि तत्काळ रिझल्ट. sss, बाबा राजगिरे तोंडावर हात ठेवत म्हणाले. परखडेंच्या ओरखड्याने बाबांच्या तोंडाला चटका बसला.
जाऊ द्या हो राजगिरे, तुम्ही लक्ष देऊ नका परखडेंकडे,’ 'अनाकलनीय' वर्तमानपत्राचे संपादक राजा संपादके मधेच बोलले. 
अहो संपादके, जाऊ दे काय, जेव्हापासून आदर्श सोसायटीचा घोटाळा गाजतोय ना त्या दिवसापासून हा परखडे माझ्याकडे परखड, पारखी आणि संशयी नजरेने पाहतोय. माझं नाव बाबा आहे, मी आदर्शचा बाबा नाही. हवं तर आबांना विचारा. बाबा राजगिरे जरा जोशातच बोलले. राजगिरेंचा रोख आपल्याकडे आहे हे पाहून परखडे हातावर हात आपटत म्हणाले,
अहो राजगिरे, तुमची सवयच तशी आहे. स्वत:चं ठेवायचं झाकून, दुस-याचंही ठेवायचं दाबून आणि नको त्याचं दाखवायचं उघडून.
अय्या sss, वा काय बाईट आहे परखडे तुमचा. जबरदस्त टोला लगावलात हो बाबांना.
मानेला जरासा झटका देत हातातील कंगवा बूमसारखा पुढे करत टीव्ही अँकर नेहा नटवे जरा हटकेच बोलली. 
तिच्या या अचानक बोलण्याने सर्व जण तिच्याकडे पाहतच राहिले. अँकरिंग करताना जेवढा होश दाखवला नव्हता तेवढा जोश आता नेहा नटवेला चढला होता. 
या नटवेला काय बोलावे, याचा राजा संपादके विचार करत असताना आतापर्यंत गप्प बसलेले दादा समाजे सावकास व संमजसपणे म्हणाले, ‘बेटा नटेव, बाबा पक्के राजकारणी आहेत. त्यांचा स्वभाव हा स्थायी नसला तरी अस्थायी म्हणजेच सरड्याच्या रंगासारखा बदलणारा आहे. आणि वयाचा विचार करता परखडे जरी त्यांना बोलले तरी तू अती उत्साह दाखवू नकोस. नाय, काय असतं नव्या दमाच्या पोरींमध्ये उत्साह जास्त असतो.
दादांच्या बोलण्याने थोडी वरमलेली नटवे परखडेंच्या तोंडाजवळ असलेला कंगवारूपी बूम तसाच ठेवत म्हणाली, ‘सॉरी...सॉरी समाजेजी,.. म्हणजे मला काय म्हणायचंय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला हेच मोठं. धन्यवाद.

परखडे आणि नटवे तुम्ही जरा धीर धरा. असं उतावळी होऊ नका. शेवटी सर्व प्रश्न हे विचारविनिमय करूनच सुटतात आणि सोडवायचे असतात. आता राजकारण्यांनी ठरविलेल्या त्यांच्याच हातात असणाऱ-या यंत्रणा तपास करत आहेत ना...मग आपण एक नागरिक म्हणजे सुशिक्षित नागरिक म्हणून सत्य जगासमोर येईपर्यंत शांतपणे वाट पाहिली पाहिजे, प्रतीक्षा केली पाहिजे.’ ग्लासमधील चहा संपवत आतापर्यंत शांतपणे ऐकणार आणि फेमस विचारवंत जागृत विचारे यांनी आपली बाजू मांडली.
विचारे, तुमचं विचारमंथन होईपर्यंत दुसरा घोटाळा बाहेर पडेल. सत्य जगासमोर येईपर्यंत जग तरी सत्याचं राहिलं पाहिजे की नाही?’ परखडेंनी विचारेंच्या विचारावर आपला विचार मांडला.
परखडे तुम्ही असं कसं म्हणता? त्यात माझी काय चूक? मी राजकारणी असलो तरी माझा त्याच्याशी काहीही काडीचा संबंध नाही. उगाच नाहक गोवण्याचा प्रयत्न करू नका.’ बाबा राजगिरेंचाही आवाज थोडा वाढला. 
इतक्यात दोघांनाही थांबवत राजा संपादके मधे पडले, ‘तुम्ही दोघेही शांत व्हा बघू. आपण चर्चा करायला आलो की भांडायला? साधकबाधक चर्चा करून मार्ग काढायला हवा यातून. तशी चर्चा झाली पाहिजे की नको?’
वा संपादकेसाहेब, म्हणजे चॅनेलवर चालते तशी चर्चा म्हणाताय ना...नेहा नटवेने मधेच नाक खुपसायच्या अगोदर तोंड खुपसले. 

विधिमंडळात आजकाल फ्रीस्टाईल चर्चा केली रंगते. चर्चेचा आखाडा होतो. अशी चर्चा करू नये. राजकारण बाजूला ठेवून एखाद्या विषयावर मुद्देसुद चर्चा झडली पाहिजे. आरोप-प्रत्यारोप करू नयेत. चर्चेने एखादा विषय सुटू शकतो याच्यावर विश्वास असायला हवा नव्हे, जनसामान्यांचा त्याच्यावर विश्वास बसायला हवा,’ विचारेंना अगदी जागृतपणे विचार मांडले.

विचारे, तुम्ही एकदम सत्य बोललात. लोकशाहीत लोकशाहीच असायला हवी. आणि साधकबाधक चर्चाच व्हायलाच हवी. मी तर म्हणेन आदर्शप्रकरणी आदर्शवत चर्चा घडवून सरकारने आदर्श घातला पाहिजे म्हणजे आदर्श असा पाया घातला पाहिजे. अन्यथा, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू आणि आबा, दादा, काका, मामा यांना एकदाच इशारा देऊ,’ समाजसेवेचे व्रतस्थ समाजे धीरगंभीरपणे बोलले. विचारेंच्या मतात समाजेंचे विचार एकरूप होऊ लागले. 

एकदम बरोबर बोललात, समाजे. हे तुम्ही अगोदर आमच्याकडे प्रसिद्धीसाठी द्या. आम्ही हवी तशा हवा तयार करतो. वाताची निर्मिती करू शकतो. मग बघा काय होते ते ? वर्षभर गाजणारा आदर्श घोटाळा चुटकीसारखा सुटला की, त्याच्यावर एक मस्तपैकी संपादकीय लिहून काढतो, संपादके जरा उत्साहातच बोलले.
पण संपादकांच्या या संपादकीयची परखडेंनी चिरफाड करायला सुरुवात केली. 
अहो संपादके, तुम्ही काय खरडता संपादकीय?’ परखडे.
काय खरडतो म्हणजे...चक्क लिहितो.’- संपादके.
‘...हा तेच ते...बरेचसं तुमच्या वर्तमानपत्राच्या नावाप्रमाणे अनाकलनीयच असतं. असंही म्हणायचं आणि तसंही म्हणायचं. परखडेंनी संपादकेवर सूडच उगवला.
अहो, आम्ही आमची भूमिका मांडतो. सर्वसामान्यांची भूमिका असते ती. तुम्हाला नाय कळणार परखडे. संपादके म्हणाले.
म्हणूनच अनाकलनीय म्हणतो मी. म्हणतात भूमिका मांडतो...अहो ती भूमिका चावला तरी बरी भूमिका करते. परखडे पुन्हा बोलले.
काहीही असो. वर्तमानपत्राने बातमी प्रकाशित केली आणि आदर्शचा अनादर्श जगासमोर आला. घोटाळा बाहेर काढण्याचं श्रेय ख-या अर्थाने आमचं आहे आणि आम्ही ते आमचं कर्तव्य समजतो.’ संपादके मोठ्या फुशारकीत बोलले.
छे ओ...तुम्ही फुशारकी मारू नका... आदर्श घोटाळा आम्ही टीव्हीवाल्यांनी एवढा पिटलाय म्हणून सांगू...आदर्श घोटाळा सर्व स्तरांत, घराघरांत पोहोचवला. आदर्शबाबत येणारी प्रत्येक बातमी आम्ही ब्रेक केली. आणि सर्व नेत्यांचे बाईट घेतले अगदी वाईट वाटले तरी.नेहा नटवे अतिउत्साहातच मानेला लचके आणि गचके देत बोलली. बोलण्याच्या नादात डोळ्यावर आलेली बट मागे करत संपादकेंना कसं कापलं याच्या आनंदात ती सांडून गेली.
एवढ्यात जागृत विचारे आपल्या विचारांची पुंजी पुढे करत म्हणाले, ‘मीडियाने असं भांडू नेय. शेवटी हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. पण काहीही असो, या आदर्शप्रकरणात सीएम-बीएम, मंत्री, संत्री, लिंबू, टिंबू सर्वच अडकले. अशा नेत्यांकडून अशी अपेक्षा नव्हती पण अपेक्षाभंग करणं हा नेत्यांचा आता नित्यधर्म होत चाललाय. ज्याला आश्वासन असं गोंडस नाव दिलं जातंय स्वार्थाची पोळी भाजत आहेत. चौकशी आयोगासमोर सही रे सहीपासून बरीच बनवाबनवी होत आहे. पुरोगामी आणि अग्रेसर अशा महाराष्ट्राच्या नेत्यांकडून अशी अपेक्षा नव्हती. आपण एवढे घोटाळे करून ठेवलेत की, भविष्यात विद्यार्थी पीएचडीसाठी घोटाळा हा विषय निवडतील. एवढं दुर्दैव महाराष्ट्राच्या वाट्याला येणं ही राज्यासाठी शान, मान, जान, प्रतिष्ठा लयाला जाण्याची लक्षणं आहेत.
एकदम बरोबर बोललात विचारे, मी तुमच्या मताशी बावनकशी सोन्यासारखा सहमत आहे. सर्व यंत्रणांनी योग्य आणि निष्पक्षपाती चौकशी केली पाहिजे. आणि तसं नाही झालं तर आझाद मैदान जास्त दूर नाही. समाजसेवेचे व्रत न घेतले मी अंधनते, दादा समाजे शांतपणे आणि निर्धाराने म्हणाले.

यांच्या या सर्व चर्चेने सत्या परखडेंची खोपडी सनकली. त्यांनी दात, ओठ खात मानेच्या शिरा ताणल्या. तळपायाची आग मस्तकाला भिनली
अहो महाशय, पुरे झाले तुमचे हे आदर्श रामायण आणि महाभारत. आदर्श घोटाळ्यावर नव्याने महाभारत लिहिता येईल एवढा ऐवज सीबीआयकडे जमा झालाय. महाभारतातील एका एका पात्रावर सिनेमा काढता येत असला तरी आदर्श घोटाळ्यातील पात्रांवरून लघुपट नक्कीच निघेल. आणि काय हो, समाजे, उपोषण करुन काय राशी पाडणार ? या घोटाळ्यातील मंत्र्यांचे, संत्र्यांचे राजीनामे घेणार ? अहो, देतील राजीनामे...काही दिवसांसाठी... महिन्यांसाठी... त्याने काय फरक पडणार आहे... त्यांचे काही दिवसांनी राजकीय पुनर्वसन होईलच ना... त्यांचे पुनर्वसन प्रस्तापितांच्या पुनर्वसनासाऱखे वर्षानुवर्षे कुजणार नाही,’
सत्य परखडेंचा अवतार आणि आवेश पाहून राजगिरेंचे बोलण्यासाठी उगडलेले तोंड तसेच उघडे राहिले. विचारे डोके खाजवत होते. संपादकेंनी खिशाला पेन लावला. नेहा नटवेंची चुळबुळ सुरू झाली. समाजे स्तब्ध होते. इतक्यात येवढ्या गदारोळात एक शब्दही न बोलणारे सदा सामान्ये बोलते झाले,
आदर्शच्या चर्चेसाठी जमलो होतो. चर्चा भरकटवायची परंपरा पारावरही आहे. शेवटी काय एकमेकांच्या नावाने खडे फोडत चर्चेचे गु-हाळ असंच सुरू राहील आणि हाती मात्र धुपाटणंच येईल. चौकशीसाठी मात्र सामान्यांचा पैसा खर्च झालेला असेल.
देव आणि दैत्यांनी सागरमंधन केलं तेव्हा त्यातून निदान अमृत आणि हलाहल तरी बाहेर पडले, पण आदर्शच्या मंथनातून सत्य बाहेर येईल की नाही याची शंका आहे...नाहीतर सत्य बाहेर येईपर्यंत चौकशी आणि चर्चांचे मंथन मात्र सुरूच राहील.

शुक्रवार, ६ जुलै, २०१२


 माझी लाडकी शाळा
शाळा सिनेमा ज्यांना ज्यांनी पाहिला असेल त्यांना आपल्या भूतकाळातील आठवणींना उजाळा मिळाला असेल. मग तो आपल्या शालेय जीवनाचा असेल, एखाद्या प्रसंगाचा असेल किंवा अधु-या प्रेमकहाणीचा असेल, तर सफल प्रेमाचाही असेल, शिक्षकांनी दिलेल्या शिक्षेचा असेल किंवा शिक्षकांना कसं बनवलं याचा असेल. अनेकांच्या मनातील, हृदयातील भावनाही दाटून आल्या असतील...मलाही अशाचा माझ्या शाळेच्या आठवणी मनी दाटून आल्या. आठवणींच्या इतिहासाचं पान झपकन सरकून न जाता सावकाश उलटले आणि एक एक सोनेरी क्षण नव्याने झळालले. त्यांचेच नाव आहे माझी शाळा. श्री महाकाली इंग्लिश स्कूल नवेदर आडिवरे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील अनेक वाड्याचं सुंदर आणि स्वप्नवत बनलेलं आणि निसर्गानं नटलंलं, सजलंल आडिवरे हे माझं गाव. या गावाचं ग्रामदेवत आहे श्री महाकाली देवी. या ग्रामदेवतेचं ग्रामस्थांच्या हृदयात जेवढं मानाचं, प्रेमाचं, आदराचं, श्रद्धेचं स्थान आहे तितकंच स्थान श्री महाकाली इंग्लिश स्कूल नवेदर आडिवरे या माझ्या शाळेचं आहे. संपूर्ण जिल्ह्यात एक नावजलेली आणि स्वत:चं वेगळेपण जपणारी शाळा म्हणून तिची महती खूप मोठी आहे. या शाळेतून यशस्वीरीत्या बाहेर पडलेल्या पहिल्या विद्यार्थ्यांच्या बॅचपासून आताच्या विद्यार्थ्यांपर्यंत मनात शाळेचा आदर आहे आणि तेवढाच मान आहे अन या शाळेत शिकल्याचा सार्थ अभिमान आहे.
वाडापेठपासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेली माझी शाळा शांत वातावरणात आहे. बाजूने जाणारा डांबरी रस्ता, दुस-या बाजूला मळेशेती, एका बाजूला हापूसच्या कलमांची बाग आणि एका बाजूला खास असं आकर्षण आणि सर्वाच्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेला भाऊ डॉक्टरांचा दवाखाना आणि त्यांचं घर.
सभोवार असलेल्या शाळेच्या इमारती...मधे खेळाचे मोठे मैदान...काही खोल्यांवर कौले...जांभ्या दगडांच्या चिरेबंदी भिंती आणि काही विटांच्या भिंतींचे वर्ग...अशी काही शाळेची औरच नजाकत...शाळेच्या वरच्या बाजूला विहीर...अजूनही कापडी पिशवीचं दप्तर घेऊन वर्गात बसावंस वाटतं. 
पूर्वी शाळेच्या परिसरात सुरूची झाडे शाळेची शोभा वाढवायची... सुरुच्या झाडांसोबत निलगिरीच्या झाडे आणि जोडीला अशोक होताच...मैदानातील सुरूची झाडे वा-याबरोबर जेव्हा खेळायची तेव्हा मनाला सुखावेल असा नाद निर्माण व्हायचा आणि एअरकंडिशनला लाजवेल असा गारवा सर्व वर्गात वावरायचा. शाळेच्या विस्तीर्ण अशा मैदानात राज्यस्तरीय खो-खो, कबड्डी, गोलाफेक, भालाफेक
 अशा स्पर्धा तर व्हायच्या, शिवाय रिलेवेळी तर औरच मजा यायची. राज्यस्तरीय किंवा तालुकास्तरीय पातळ्यांवरील स्पर्धा असायच्या तेव्हा  शाळेत जणू क्रीडा महोत्सवच असायचा. त्यावेळचा आनंद काही वेगळाच असायचा.  विविध खेळ पाहायला सर्व वर्ग सोडून दिले जायचे. आणि आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना, त्यांचा खेळ पाहताना भारी मजा यायची. सीनिअर्स विद्यार्थ्यांची नावेही माहीत नसा्यची...पण आमच्यात त्यांच्यापेक्षा जास्त उत्साह संचारलेला असायचा. कबड्डीतील चढाई आणि खो-खोत मारलेली डाय पाहताना आरडाओरड करायला जाम मजा यायची, तर डाय चुकली तर चुकचुक करायची वेळ यायची.   पुढे मलासुद्धा खो-खो खेळायची संधी मिळाली, हे मी आता सांगितलं तर लोक नक्कीच माझ्याकडे संशयाने पाहतील, यात तीळमात्र शंका नाही. अशा या मैदानात सातवी-आठवीत असताना आम्ही पकडापकडी खेळायचो ते मोठ्या म्हणजे जेवणाच्या सुटीत. शाळेजवळ राहणारे विद्यार्थी पाऊण तासात घरी जाऊन जेवून यायचे...बाकी लांबचे सर्व विद्यार्थी सकाळी यायचे ते संध्याकाळी घरी जाऊनच जेवायचे. त्यामुळे मधला वेळ असा घामजेपर्यंत खेळण्यात सत्कारणी लावायचा. नववी-दहावीला मात्र कुठेतरी उभे राहून किंवा मळ्यात फिरून किंवा एखाद्या आंब्याच्या झाडावर बसून शिक्षक आणि अन्य कुठल्याही विषयावर पाऊण तास चर्चा झडायच्या. त्यात अभ्यासाविषयी चर्चा अपवादात्मकच असायच्या.
माझं तळीवाडी गाव हे या शाळेपासून चक्क पाच किलोमीटर दूर आहे. तेव्हा रोज दहा किमीचे अंतर तुडवत शाळा शिकायची. मी मामांच्या गावी राहत होतो. त्यामुळे मला तो त्रास सहन करावा लागला नाही. पण मी शनिवार, रविवार माझ्या घरी जायचो. तेव्हा असाच पाच किमीचा प्रवास करत. शाळा सकाळी ११ ते ५ या वेळेत भरायची. तळीवाडीतून तसं वेगात चाललं तरी एक ते सव्वा तास कुठे जायचा नाही. त्यात आम्ही सर्व विद्यार्थी म्हटल्यावर रमतगमत जाणं-येणं व्हायचं. सकाळी ९.३० ला घर सोडायचं ते संध्याकाळी दिवेलागणीलाच म्हणजे ६.३० वाजताच घरी यायचं. पावसाळ्यात मात्र थोडीफार मजा असायची. एकदा का कातळावर आलो की, पावसात कातळावर सापडणा-या कुर्ल्या (खेकडा) पकडत शाळेत जायचं. त्या पकडलेल्या कुर्ल्या कुठे तरी दडवून ठेवायच्या आणि संध्याकाळी घरी येताना घरी घेऊन यायच्या. त्यावेळी सडकीचा कच्चा रस्ता होता. त्या रस्त्यावर दोन परे लागायचे. एक मुसळ आणि दुसरा आडाचा. खूप पाऊस आला की प-या पार करणं जोखमीचं व्हायचं. मग सर्व साखळी करून प-या पार करायचो. उन्हाळ्याच्या दिवसांत करवंद आणि कै-या यांचा समाचार घेतच शाळेतून घरी आणि घरातून शाळेत जाणं होत असे. हिवाळ्यात सकाळीची शाळा असायची. पाच फुटांच्या पुढचं दिसतानाना मारामार असायची. त्यावेळी कातळावरील गवताला आगी लावून शेकोटी घेण्याचा नित्य उपक्रम असायचा. आग पसरू नये याचीही काळजी घ्यायचो. जेव्हा दिवस लहान असायचा तेव्हा तर घरी जायला चक्क अंधार पडायचा. मग तळीवाडी, मोगरे आणि व्येत्ये येथील विद्यार्थी हेडमास्तर श्री. चव्हाण सरांकडे जायचो. त्यांना वस्तुस्थिती सांगायची... मग माझी शाळा विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायची. शाळेची वेळ १०.३० ते ४.३० अशी केली जायची. काही विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यार्थी हा निर्णय मान्य करायचे हाच खरा मोठेपणा होता.
माझ्या शाळेला तसा खूप मोठा इतिहास आहे. तो पुन्हा केव्हातरी पाहू. पण अशा या शाळेला जो शिक्षकवृंद लाभला होता तो अतिशय प्रेमळ, जिज्ञासू, विद्यार्थ्यांवर मनस्वी प्रेम करणारा. शाळेसाठी स्वत:च्या घराइतकाच प्रेम करणारा, शाळेचा हित जोपासणारा, वेळप्रंसगी पदरमोड करणारा, आणि एखादी चूक झाल्यास विद्यार्थ्याला शिक्षाही करणारा. असा शिक्षकवृंद लाभणं हे शाळेचं भाग्य आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांचं नशिब. अशा या शिक्षकवृंदात मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर, उपमुख्याध्यापक श्री. शेवडे सर,  श्री. भट सर, श्री. पुंडपाळ सर, श्री. देसाई सर, श्री. भिडे सर, श्री. दबडे सर, श्री. हजारे सर, श्री. गुणे सर, श्री. जी. के. जाधव सर, श्री.कानविंदे सर, श्री. एस. के. जाधव सर, श्री.साखरकर सर, सौ, तेलंग मॅडम, भागवत मॅडम, नाईक मॅडम यांचा समावेश मोठ्या अभिमानाने करावा लागेल. या शिक्षकवृंदाबरोबर ज्यांचे नाव नेहमीच घ्यावे लागते ते श्री. तेलंग सर. या सर्वांनी मिळून अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले. त्यासाठी अपार मेहनत घेतली. विनावेतन काम केलं. त्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी होण्याचे भाग्य लाभले.
माझ्या शाळेचा शिपाईवृंदही तितकाच प्रेमळ होता. आम्ही सर्व विद्यार्थी त्यांना तात्या म्हणत असू. अडचण, काही काम असलं की हे तात्याच आठवायचे आणि मदत करायचे. त्यात पावणाक तात्या सर्वांच्या आवडीचे. सुधाकर तात्या, रघू तात्या, विलास तात्या ही 'तात्या' मंडळी सेवेसाठी आणि मदतीसाठी सदैव तत्पर असायची. रघू तात्यांचं अक्षर म्हणजे मोती. त्यांच्या अक्षरांसारखं आपलं अक्षर असावं असं हजारवेळा तरी वाटायचं.  एकदा  पावसात वादळ आलं आणि नवीन बांधलेल्या वर्गाचं छप्पर उखडलं गेलं. आश्चर्य म्हणजे ते छप्पर पुन्हा उभारण्याचं काम सर्व शिक्षकांनीच केलं होतं, याची नोंद आवर्जून घ्यावी लागते. कारण शाळेवर अपत्याप्रमाणे प्रेम करणारे शिक्षक विरळाच असतात. असंच आणखी एका व्यक्तिमत्वाचं आवर्जून नाव घ्यावं लागेल आणि ते नाव आहे सर्वांचे आदरणीय डॉ. भाऊ जोशी. शाळेतील कोणत्याही कार्यक्रमावेळी हे ठरलेले आणि सर्वांचे आवडते गेस्ट. कोणत्याही विषयावर ते बोलायचे. अशा या डॉक्टर भाऊ जोशींबद्दल सर्वांच्या मनात नितांत आदर आणि प्रेम. त्यांच्यविषयी नक्की कधीतरी लिहीन.
असो. अशी माझी सर्वगुणसंपन्न शाळा आणि तिच्या आठवणी. शाळेबद्दल आठवण आली की मन कधी भरारी मारून येतं ते कळतही नाही. शाळेतील आठवणींवर मन कसं हिंदोळत असतं ते त्याचं त्यालाच माहीत. अशी ही माझी श्री महाकाली इंग्लिश स्कूल नवेदर आडिवरे ही शाळा खरंच दी ग्रेट. अशा या ग्रेट शाळेचे विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये ग्रेट कामगिरी करत आहे. याचा अभिमान आहे. त्यामुळे माझ्या या लाडक्या शाळेला सॅल्युट !!!