शनिवार, १८ एप्रिल, २०१५

पोटे भरलेली अन् पोटे रिकामी...
वांद्रे विधानसभा पोटनिवडणूक संपली तरी वाद-विवाद आणि आरोप-प्रत्यारोपांचा शिमगा संपलेला नाही. आरोप-प्रत्यारोपांची उधळण सुरूच आहे. या निवडणुकीतील निकाल हे धक्कादायक नसले तरी प्रतिष्ठेला धक्का देणारे ठरले. कोण हरले, कोण जिंकले, कोणाला काय मिळाले, यांचे मंथनही झाले. त्यामुळे कलानगरच्या कट्ट्यावर पोटतिडिकीची चर्चा सुरू झाली. पत्रकार संपादके, राजकारणात रमलेले राजकारणे, वटवट करणारी टीव्ही अँकर नेहा नटवे, सत्य बोलणारे सत्या सदावर्ते, समाजाची काळजी करणारे समाजे, वैचारिक पाजणारे विचारे आणि नेहमीच सामान्यपणे राहणारे सदा सामान्ये यांच्यात वांद्रे पोटनिवडणुकीवरून कलानगरच्या कट्ट्यावर कलेकलेने चर्चा सुरू झाली.
'कोंबडी पळाली...तंगडी धरून...लंगडी घालायला लागली...कॉक कॉक..' 'अहो नटेव मॅडम, ही सभा आहे, तुमच्या बुलेटिनची सुरुवात नाही'..वटवट करणाऱ्या नटवेची नांदी मधेच तोडत संपादके बोलते झाल्याबरोबर नाक मुरडत नटवेंनी मान वळवली. 'काय गं नटवे, कोंबडीवरून असे पुगवे येण्याचे कारण काय?' मधेच विचारे विचारते झाले आणि नटवेंचे पुगलेले तोंड फुलून आले आणि तिने संपादकेंकडे एक कटाक्ष टाकला. 'अहो, विचारे, त्या वांद्रेच्या पोटनिवडणुकीत नाही का कोंबड्या नाचवल्या... त्या मी टीव्हीवर गाजवल्या, पण या संपादकेंना मधेच त्या कोंबड्यांचा कैवार आला अगदी 'त्यां'च्यासारखा.' नटवेने संपादकेंवर वार केला. नटवे पुन्हा तोंड उघडणार तेवढ्यात 'मला काय म्हणायचे, माणसांचा विजय झाला की प्राण्यांचा बळी जातोच की...' विचारेंनी वैचारिक मांडले. या वैचारिकानंतर संपादके बोलते झाले, 'विचारे, अहो तुम्ही असा विचार करायला केव्हापासून लागलात?' 'संपादके, तुम्ही जेव्हा बातम्या आणि संपादकीय यांचा मुडदा पाडायला लागलात तेव्हाच विचार बदलून टाकला.' विचारेंनी संपादकेंना विचारवाणी सांगतल्यावर नटवेला मात्र गाळातल्या गाळात हसू आले. 'अगदी बरोबर बोललात विचारे,' नटवेंना केसांना झटके देत संपादकेंच्या समोर बूम धरावा तसा मोबाईल धरला. 'तुम्ही आदी तो बूम सॉरी मोबाईल बाजूला घ्या. पण मला काय म्हणायचे, वांद्रेची ही पोटनिवडणूक एवढी प्रतिष्ठेची करायची गरजच काय? तासगावसारखी नाही का करता आली असती?' सत्या सदावर्तेंनी पोटनिवडणुकीच्या मुद्यावर बोट ठेवले तसे समाजे बोलते झाले, 'निवडणूक कुठली असली तरी ती निकोप व्हायला हवी. लोकांना मतदानाचा अधिकार आहे. त्यांनी तो बजावून योग्य उमेदवार निवडावा.' 'काय... काय म्हणता समाजे तुम्ही, हे आता शक्य आहे का? निवडणुकीपूर्वी काय झाले ते काय नव्याने सांगायला हवे का? नुसता आरोप-प्रत्यारोपांचा खेळ..हे कुठेतरी थांबायला नको का?' सत्या सत्य वदले तसे समाजे समजावणार इतक्यात सत्या पुन्हा बोलते झाले, 'समाजे, तुम्ही या सर्व गोष्टी थांबवायला उपोषणाला का नाही बसलात?' 'उपोषणाला बसून असले प्रश्न सुटले असते तर एक चांगला संदेश गेला असता,' विचारे मधेच बोलून गेले. या सर्व मुद्यांवर चर्चा सुरू असताना धूर्त राजकारणे मात्र हसत होते. आता त्यांना राहावेना...'आमची राजकारण्याची जात. जागा महत्त्वाची...कारण जागा मिळाली की जगायला मोकळे पुन्हा निवडणूक लागेपर्यंत.' राजकारणे बोलले आणि त्यानंतर सत्या कडाडले, 'तुम्ही तेच पाहा. बाकी काय पाहू नका. किती पैसा उधळला गेला असेल याच्यावर? तेवढा पैसा जनतेवर उधळला असता तर बरे झाले असते.' 'हे राजकारणी मंडळी कोणती गोष्ट मोठी करतील आणि कोणती नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि प्रतिष्ठाही पणाला लावली तसेच प्रतिष्ठाही घालवली,' विचारेंनी चिंता व्यक्त केली. 'आणि हो, या मीडियावाल्यांनी तर आणखी मोठी केली. संपादकेंनी लिहून लिहून मोठी केली आणि नटवेंनी वाचून वाचून चर्विली.' सत्यांची सत्यवाणी झाली. इतक्यात इतका वेळ शांत बसलेले सदा सामान्ये पोटतिडिकीने बोलले, 'या पोटनिवडणुकीत अनेकांची पोटे भरली असतील, पण सामान्यांची मात्र पोटे रिकामीच राहणार आहेत'. सामान्यांच्या या  सर्वसामान्य विचाराने कलानगरच्या कट्ट्यावरची चर्चा संपली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा