राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी असा वाद निर्माण झाला. दिल्लीतील राजकारणासह राज्यातील राजकारणावरही त्याचा परिणाम झाला. अखेर अनेक वेळा बैठका घेऊन घेऊन तोडगा निघाला. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात अधिवेशन गाजण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादी वादाचाच अधिक गाजावाजा झाला. नाराजीच्या फुग्याचा बॉम्ब न होता नुसता फुसका बार ठरला आणि इकडे पिंपळपारावरच्या बैठकीत मात्र फटाके फुटू लागले.
बाबा राजगिरे, राजा संपादके, नेहा नटवे, सत्या परखडे, जागृत विचारे, दादा समाजे आणि सदा सामान्ये यांनी पिंपळपारावर ठाण मांडले....
'काय बाबा राजगिरे, तुम्ही कसलं राजकारण करता? आदी नावातच गिरे...म्हणजे गिरे तो भी टांग उपर ', सत्या परखडेंनी बाबा राजगिरेंची खोड काढली.
'काय म्हणता परखडे, अहो तुम्ही माझ्या राजकारणाबद्दल शंका उपस्थित करता...माझ्यासारखा दूरदूष्टी लाभलेला नेता संपूर्ण भारतवर्षात शोधून सापडणार नाही आणि राजकारणात तर नाहीच नाही', राजगिरेंनी छातीवर हात ठोकून ठोकून सांगितले.
'अय्या खरंच, तुमची दृष्टी छान आहे. मग दृष्ट काढू का? जरा तुमच्या दूरदृष्टीपणाबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा ना...काय वाटतं तुम्हाला तुमच्या दूरदृष्टीपणाबद्दल?', टीव्ही अँकर नेहा नटवेने हातातला पेन राजगिरेंच्या तोंडासमोर बूमसारखा धरला... एवढ्यात राज संपादके मधेच लिहिते नव्हे बोलते झाले,
'नटवे, नटवे, असा नटखट प्रश्न साहेबांना कशाला विचारलास? त्यांनी दूरदृष्टीपणाबद्द्ल सांगावे म्हणजे स्वत:हून स्वत:ची स्तुती केल्यासारखे वाटेल ना...आणि त्यांच्यासाठी दूरदृष्टीपणा हा चावून चावून चघळलेला विषय आहे.' यावर नटवे बोलायच्या अगोदर परखडेंनी ओरखडे काढायला सुरुवात केली.
'या गल्लीतील बाबांकडे कसला आलाय राजकीय दूरदृष्टीपणा. राजकारणात पडल्यावर त्यांनी जो दूरदृष्टीपणा दाखवला तो समस्त जगाने पाहिला. संपादके, तुम्हीसुद्धा दूरदृष्टीपणाबद्दल सारखे सारखे लिहून त्याला गुळगुळीतपणाचा लेप चढवलात. या राजगिरेंनी स्वत:च्या गल्लीचा विकास केला आणि बाकीच्या गल्ल्या अद्याप भकास आहेत.'
'म्हणजे मुंबई झकास आणि उर्वरित महाराष्ट्र भकास', नटवेने मधेच तोंड खुपसले.
'वा...वा...काय छान अलंकारिक वाक्य बोललीस तू, नटवे. असंच अँकरिंग केलंस ना तर टीआरपी वाढेल म्हटलं', राजा संपादके उपरोधिकपणे बोलले. बाईंनी बोलावे आणि इतरांनी मान डोलवावी तसं नटवेने संपादकेंकडे पाहत मान डोलावली. आणि आतापर्यंत शांतपणे विचार करणारे दादा समाजे जागे झाले.
'बाबा राजगिरे, तुम्ही राजकारणातील बाप माणूस.' समाजे असं म्हणताच कॉलर ताट करून मान उंचावणार इतक्यात परखडे ओरडलेच.
'समाजे, अहो काय बोलताय काय...राजगिरे राजकारणातील बाप नाही ताप आहे नुसता ताप.' परखडेंच्या ओरखड्याने राजगिरेंनी स्वत:ची धरलेली कॉलर सोडली आणि मान उंचावून बोलणार इतक्यात संपादके मध्येच संपादले,
'परखडे, तुम्ही नटवेच्या बाजूला बसलात ते बरे झाले. जरा सुंदर शब्द सुचू लागले. असो. समाजे, तुम्ही काय म्हणत होता ते सांगा.' समाजे बालू लागले...
'राजगिरे, राजकारणाची अधोगती झालीय. त्यातच तुम्ही आघाडीत बिघाडी करून तिढा निर्माण करताय. त्यामुळे राजकारण आणखी रसातळाला जायला लागलंय. तुम्ही तुमच्या आतील आवाज ऐका. ख-या अर्थाने तुमच्यात ताकद आहे. तुम्ही स्वबळावर अनेक निवडणुका लढवू शकता, पण तसं होताना दिसत नाही. याचाच अर्थ तुम्ही द्रष्टे असलात तरी ते द्रष्टेपण राजकारणासाठी उपयुक्त ठरताना दिसत नाही. आणि हो, तुम्ही ते वेळोवेळी सिद्धही केलंय. स्वत:च्या हाताने स्वत:च्या पायावर कु-हाड मारून घेण्यातच तुम्हाला जास्त हौस दिसते. तुम्ही टीकाही करता आणि ओंजळही पसरता. हे तुमच्यासारख्या कसलेल्या, मुरब्बी राजकारण्याला शोभनीय नाही. यातून वेगळा विचार समाजापर्यंत जातो...तुमच्या भाषेत सांगायचं तर मतदारांपर्यंत जातो तो म्हणजे तुम्ही बोलता एक, दाखवता दुसरं, करता तिसरंच आणि या सर्वांतून निष्पण होतं भलतंच. तुमच्या तडजोडी राजकारणाबद्दल मी आझाद मैदानात उपोषण करणार आहे, हे आत्ताच सांगून ठेवतो...' समाजे बोलतानाच नटवेने त्यांचे बोलणं अर्धवट तोडलं,
'करा, करा...समाजे तुम्ही उपोषण करा...आम्ही तुमचे उपोषण क्षणोक्षणी दाखवू.' नटवेच्या बोलण्यावर समाजे किंचितसे हसले आणि राजगिरेंकडे पाहात म्हणाले,
'राजगिरे, तुम्ही स्वबळावर लढावं असं आम्हाला वाटतं.' समाजेंचे वैचारिक संपताच परखडे बोलले,
'अहो समाजे, यांना केव्हाही आणि कितीही वेळा भुजांचे बळ दिले तरी ते स्वबळावर निवडून येणार नाहीत. त्यांना गल्ली-६मध्ये निवडून येतील की नाही याची शाश्वती नाही, मग गल्ली-२ पर्यंत काय निवडणुका लढवणार. या राजगिरेंचा इतिहास असा विश्वासघातकी आणि आत्मघातकी. कुणाचं केव्हा काय करतील आणि याचा नेम नाही.'
'एकदम परफेक्ट बोललात, परखडे तुम्ही', संपूर्ण अग्रलेखात एखादं संपादित वाक्य असावं तसं संपादके बोलले.
'राजगिरे एखादा निर्णय घेतात आणि सर्व नेत्यांना आणि त्यांच्या मित्रांनाही ते कामाला लावतात. अशीही बाबांची सवय. बाबांच्या सवयीला आमचे आबा काय करणार...म्हणजे माझे बाबा काय करणार- पण काही वळत नाही आणि वळणावरही येत नाही तसेच वळचळणीलाही येत नाही. मग आपटतात तोंडावर, तोंडघशी पडतात अगदी घशाला कोरड येईपर्यंत. आणि नंतर सुरू होतात बैठकांवर बैठका...'
'वा...संपादके, क्या बात है. तुम्ही हे जे काय अनाकलनीय बडबड केलीत तशी मला जमली तर मग मी एकदम स्टार अँकर होईन', नटवे बडबडली. पण गप्प बसतील ते संपादके कसले. अनाकलनीयचा उल्लेख करून नटवेने त्यांना डिवचलं होतं.
'नको...गं बाय माझे... तू तुझी अक्कल मधेच पाजळू नकोस. नाहीतर तुझ्या त्या बुलेटिनमध्ये बातम्या कमी आणि तुझी बडबडच अधिक दिसायची.'
'हूँ, माहितेय...माहितेय' नेहा नटवेनं नाक मुरडलं. चर्चेचा नूर पालटू नये म्हणून जागृत विचारे जागरुकपणे बोलते झाले.
'आज जग जवळ आलंय. जागतिक घडामोडींचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे आपल्या राजकीय व्यवस्थेवर परिणाम होतोय. त्यातच प्रादेशिक पक्षांचा जोर नको तितका वाढतोय. केंद्रात एका पक्षाचे सरकार आणि राज्यात दुस-या पक्षाचे सरकार. एकाच पक्षाचे सरकार सत्येवर येणं अशक्य होत चाललंय. स्थिर सरकार देण्यासाठी आता प्रादेशिक पक्षांचा टेकू घ्यावा लागतोय. आणि हो प्रादेशिक पक्षांचा टेकू घेऊन सरकार चालवणं म्हणजे एका अर्थी राष्ट्रीय पक्षांची ही अधोगतीच म्हणायला हवी. याचाच फायदा प्रादेशिक आणि छोटे छोटे पक्ष घेताना दिसतात. नाक दाबून तोंड कसे उघडायचं हे राजकारण्यांना पक्के माहीत असतं. तसेच शेपूट वळवळलं तर ते कसं ठेचायचं याचंही ज्ञान असतं. आपल्या कळपात एखादा नवीन प्राणी आला की काही दिवसांसाठी काही प्राण्यांमध्ये अस्वस्था पसरते, असा माझा अनुभव आहे. आपले महत्त्व कमी होण्याची एक अनामिक भीती असते. तेव्हा केवळ पॉवरफुल असून चालत नाही त्यासाठी पॉवरफुल वैचारिक बैठक असायला हवी. बाबा राजगिरेंचं काहीसं असंच झालेलं असावं. ' विचारेंच्या या मंथनात सर्वांनी माना डोलावल्या आणि सरतेशेवटी सदा सामान्ये बोलते झाले.
'राजगिरेंनी कितीही बंड केले आणि बैठका घेतल्या तरी त्या सर्वसामान्यांसाठी हिमनगासारख्याच वाटतात. कारण सर्वसामान्यांपर्यंत 'समन्वय' पोहोचतो बाकी सर्व गुपितं गुपितच राहतात अगदी हिमनगासारखी!.'
बाबा राजगिरे, राजा संपादके, नेहा नटवे, सत्या परखडे, जागृत विचारे, दादा समाजे आणि सदा सामान्ये यांनी पिंपळपारावर ठाण मांडले....मस्तच!
उत्तर द्याहटवाछान भट्टी जमलेय....