रविवार, १९ ऑगस्ट, २०१२

दादा, तुम्हीसुद्धा ?


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू केलं. त्यासाठी लोकपाल बिलाचा आग्रह ही धरला. यासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. दिल्लीतील जंतरमंतरवर केलेल्या उपोषणाला प्रचंड पाठिंबा मिळाला. परंतु या वेळी दहा दिवस केलेल्या उपोषणाकडे सरकारने ढुंकूनही पाहिलं नाही. सरकारच्या थंड प्रतिसादामुळे टीम अण्णाचं उपाषण थंडावलं मात्र बंडासाठी राजकारणाच्या आखाड्यात उडी घेण्याचा निश्चय केला. देशाला पर्याय देण्याचे सूतोवाच झालं आणि जंतरमंतरवरच्या उपोषणानंतर टीम अण्णाला राजकीय मार्गाने मंतरलं. टीम अण्णाच्या या भूमिकेला संमिश्र प्रतिसाद मिळाला, पण भ्रष्टाचार हा शिष्टाचारासारखा झाल्याने पिंपळपारावरही भ्रष्टाचार, उपोषण आणि राजकारण यावर तावातावाने चर्चा झडू लागली.
बाबा राजगिरे, राजा संपादके, जागृत विचारे, सत्या परखडे, नेहा नटवे, दादा समाजे आणि सदा सामान्ये नेहमीप्रमाणे चर्चेला उपस्थित होती.
सत्या परखडे यांनी तावातावाने बोलायला सुरुवात केली "दादा समाजे, तुम्ही उपोषणाचा राजमार्ग सोडून राजकारणाचा एक्स्प्रेस पकडलात..."
 "परखडे, असे उतावीळ होऊ नका. जरा शांत व्हा. तुमच्यासारखी अनेकांची स्थिती झालीय", संपादके मधेच संपादित वाक्य बोलले.
 "पण, दादांनी अजून काही दिवस उपोषण केलं असतं तर.... तर .." नेहा नटवे पापण्या मिचकावत बोलली.
 "...तर.. तर... काय ? " संपादके नटवेला मध्येच तोडत म्हणाले.
 "...तर काय मला काही दिवस टीव्हीवर झळकायला मिळालं असतं ना..एक संधी."
 "कशी काय ?" सत्या परखडे.
 "परखडे, दादांचे उपोषण दाखविताना..."
 "हे बरं आहे. दादांनी उपोषण करायचं आणि तुम्ही पोटभूर जेवून कोकळायचं." परखडेंनी नटवेंवर ओरखडे ओढले.
 "तेवढा तरी सपोर्ट करतोच ना आम्ही." नटवे संपादकेंकडे पाहत बोलली आणि संपादकेंनी नटवेंच्या हा मध्ये हा मिसळत म्हणाले,
 "एकदम बरोबर बोलली नटवे. दादा समाजे हे स्वच्छ आहेत. त्यांचे आचरणही भ्रष्ट नाही. सर्व कारभार कसा धुतलेल्या तांदळासारथा स्वच्छ. तसेच काचेप्रमाणे पारदर्शक. माझं तर ठाम मत आहे की यात बाबा राजगिरेंनी राजकारणी चलाखी करून वेगळीच खेळी केलीय आणि दादांना राजकारणात ओढलंय."
संपादकेंचं बोलणं थांबते न थांबते तोच राजगिरे जोशात बोलले,
 "अहो संपादके, काय बोलताय काय ? काही तरी मर्यादा आहे की नाही तुम्हा संपादकांना ? उगाच तरी सुतावरून  स्वर्ग नका गाठू. तुम्हाला काय...दुसरं काय छापायला नाही मिळालं तर राजकारण आहेच." बाबा राजगिरेंचा पारा चढला होता. डोळे गरगरा फिरवत असतानाच सत्या परखडे सत्य वदला.
 "बरोबर आहे संपादकेंचं. दादांना बिल पास करण्याची आश्वासने तुम्हीच दिली होती ना. चर्चा, विचार, विनिमय करून, गोंगाट, गोंधळ घालून संसद तुम्हीच गाजविलीत ना...दादांच्या आणि टीम दादाच्या नावाने. मग त्या आश्वासनांचं काय झालं. ती भ्रष्टाचाराच्या चुलीत गेली की तुम्ही बसता त्या गल्लीतच गेलीत."
 "हे राजकारणी असेच असतात. आश्वासनांचा डोंगर उभा करायचा आणि मग डोंगर पोखरून उंदीर काढायचा. एखादे आश्वासन पाळायचं आणि भल्या मार्गाने जाणाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडायच्या अगदी एके -56 , एके 47 सारख्या. हा धंदाचा झालाय." संपादकेंचा आवाज वाढला होता, पण गप्प बसतील तर बाबा राजगिरे कसले.
 "हे बघा परखडे आणि संपादके, आमचा भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याचा अजेंडा आहेच. पण समूळ भ्रष्टाचार निर्मूलन होणं अशक्य आहे. मात्र दादाही समूळ भ्रष्टाचाराचे उच्चाटन होण्याच्या मुद्द्यावर अडून राहिले म्हणून मग आम्ही नडून राहिलो. दादांनी राजकारणात यावे आणि निवडणुका लढवाव्यात." बाबा राजगिरे हातवारे करत आपलं भाषण थांबवणार इतक्यात परखडे उखडले,
 "उपोषण हे भ्रष्टाचारावरील जालीम औषध नाही हे तुम्हाला माहीत आहे ना...मग तुम्ही कायदा का करत नाही. तुमच्या अंगात कर नाही तर मग डरता कशाला? मंजूर करा ना एकदाचे लोकपाल बिल. ते बिल नाही यशस्वी झालं तर रद्द करता येईलच ना..."
 "स्वत:चे भ्रष्टाचार उघड्यावर आले तर आदर्श घोटाळ्यासारखे होईल म्हणून ते घाबरत असावेत. नाही तर काय ...लोकपाल बिल लाना मना है क्या ? " नेहा नटवे सर्व जोश एकत्र करून बोलली. नटवेच्या बोलण्याने जागृते जागृत  झाले आणि त्यांचे विचार मांडायला सुरुवात केली.
 "भ्रष्टाचाराच्या किडीने संपूर्ण देश पोखरला आहे. ज्या प्रकारे वाळवीने फर्निचर कुरतडावे त्याप्रमाणे भ्रष्टाचाराने देशाला कुरतडलंय. देश भ्रष्टाचाराने बरबरटलाय. बोट ठेवावं तिथं भ्रष्टाचार. पण याविरोधात टीम दादाने जे पाऊल उचललं ते योग्यच होतं, म्हणून तर देशभरातून त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला प्रतिसाद मिळाला."
 "अहो, पहिल्या आंदोलनाला भरघोस प्रतिसाद मिळतोच. त्यात नवल ते काय ? " विचारेंचे विचार मधेच तोडत बाबा राजगिरे तणतणले.
 "मग आधीच तरतूद असलेल्या बिलाचा कायदा बनवायला हरकत का ?" संपादक संपादले.
 "हो एकदम बरोबर बोललात संपादके तुम्ही. पहिल्यांदा तुमृच्या 'अनाकलीय'चं आकलन झालं आणि मी काय म्हणतो, पहिल्या कायद्यांचा परिमाणकारक उपयोग  होत नसेल तर अजून कायदे करून काय फायदे आणि काय वायदे ?" परखडेंच्या वदनी सत्य प्रकटले.
 "थांबा...थांबा...थांबा...तुम्ही असं एकमेकांना विरोध करू नका. या वेळच्या आमच्या उपोषणाचे, आमच्या आंदोलनाचे बाबा राजगिरे आणि अन्य पक्षांनी दखल घेतली नाही. शेवटी उपोषणात वेळ घालवण्यापेक्षा आणि आश्वासनांच्या पूर्ततेची वाट पाहण्यापेक्षा अॅक्शन करण्याची वेळ आलीय." दादा समाजे समाजावत बोलले.
 "म्हणजे दादा, सरकारने तुमची विकेट काढली का ?" नटवेच्या अनपेक्षित प्रश्नाने संपादके आणि विचारे स्तब्ध झाले तर आपल्या संवादाचे चौर्यकर्म केल्याने परखडेंनी तोंडावर हात ठेवले. पण खमकेपणा दाखविणारे दादा समाजे बाबा राजगिरेंकडे पाहात बोलले.
 "या देशाला आता नवा पर्याय हवाच आहे आणि हा पर्याय मी दिल्याशिवाय राहणार नाही. माझा शब्द आहे. प्रत्यक्ष राजकारणात न उतरता, समाजसेवा सुरू ठेवून असं राजकारण लढवेन ना त्याचं प्रात्यक्षिक बघात तुम्ही."
 "दादा, दाखवाच तुम्ही तुमचं पाणी. वाद च्विंगमसारखा चघळून चघळून चोथा करण्यात आमचा कुणीही हात धरू शकणार नाही. उगाच नाही गल्ली 1 पासून गल्ली 10 पर्यंत मजल मारलीय." राजगिरे छातीवर हात आपटत बोलले.
वाद वाढत जाणार आणि काहीही साध्य होणार नाही याची जाणीव झालेले सदा सामान्ये शेवटी शांतपणे म्हणाले,  "काहीही असो...भ्रष्टाचार सोडवण्याचा मार्गही आता राजकारणातून गेला !" 

1 टिप्पणी: