प्रिय मैत्रणी
गुड मॉर्निंग. नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! मैत्रणी, नव्या वर्षाचा नवा संकल्प आखलास की नाही ? आखलाससुद्धा. वा. ग्रेटच ! काय म्हणतेस, मी संकल्प आखला का ? तुला खरं सांगू का... मी दरवर्षी संकल्प करतो ना तो मुळी मोडण्यासाठी. हसतेस काय... मी जेवढे म्हणून संकल्प आखले ना त्या सर्व संकल्पांनी अर्ध्यावरच डाव मोडला आणि संकल्पांची कहाणी अधुरी राहिली. तरीही मी या वर्षी नवा संकल्प केलाय. कोणता काय विचारतेस ? 'भ्रष्टाचारमुक्त मी'. आता भ्रष्टाचारमुक्त मी असं नाव ऐकून आश्चर्य वाटलं ना. वाटणारच. कारण माझ्या संकल्पाची संकल्पानाच भारी आहे. आणि हे बघ ना की ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी भ्रष्टाचार कमी करण्यासाठी उपोषण केलं. पण काय झालं ते ठाऊक आहे ना. लोकपालचं जोकपाल झालं असं नाही वाटत तुला ? लोकशाहीच्या चौथ्या खांबाने संपूर्ण दिली आणि दाखविली की... खरं पाहता, लोकपालसाठीचे आंदोलन यशस्वी झालं नाही, याची बोच मनाला टोचत राहणार... तेव्हा भारत देश भ्रष्टाचारमुक्त होईल तेव्हा होईल, पण मला स्वत:ला भ्रष्टाचारमुक्त होता येतं का ते पाहायचंय. म्हणजे प्रत्येक जण भ्रष्टाचारमुक्त होऊ शकला तर कालांतराने देश भ्रष्टाचारमुक्त नाही का होणार ? मैत्रणी, पुढच्या ೨೦೧೩ मध्ये माझ्या या संकल्पाचे तीनतेरा वाजणार नाहीत याची काळजी मला घ्यायचीय. तेव्हा तूही सामील हो माझ्या या संकल्पात. कारण थोड्या दिवसांनी किंवा वर्षांनी या संकल्पाचे नाव बदलेल... आणि त्याचं नवं नाव होईल 'भ्रष्टाचारमुक्त आपण.'
तुझाच नवसंकल्प मांडणारा आणि मोडणारा,
प्रेयस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा