गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१२

खाण तशी माती अन् भ्रष्टाचार तशी नीती !

कोळसा खाणीवाटपातील भ्रष्टाचार उघड झालाय. सरकारने खोदलेला घोटाळा ‘कॅग’ने उघडा केलाय. भ्रष्टाचाराची खाण बनत चाललेल्या देशात हिमालयाच्या पर्वतरांगांना लाजवतील अशा भ्रष्टाचाराच्या पर्वतरांगा तयार झाल्या आहेत. एक एक करता त्या पर्वतरांगांची आता टोके दिसू लागलीत. एका घोटाळ्यापेक्षा दुसरा घोटाळा कसा मोठा असेल याचीच दक्षता अधिक घेतली जातेय. आता अहवालाच्या सत्यतेची चौकशी केली जाईल. परंतु चौकशीतून सत्य काय उघड होणार आणि सत्य उघडच झालं तर ते आजच्या व्यवस्थेच्या चौकटीवर किती टिकेल आणि किती टिकवले जाईल, हे काळालाही कळणार नाही. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यापेक्षा मोठी व्याप्ती असलेल्या खाणवाटप घोटाळ्यामुळे देश कालवंडलाय, एवढंच नव्हे तर आता त्यांच्यावर ‘डार्क काजळी’ पकडलीय याची कुणालाही काळजी नाहीय. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजीनामा मागण्याचं ‘काळजीवाहू राजीनामानाट्य’ घडेल, पण एक मात्र नक्की की, या सुजलाम, सुफलाम देशात भ्रष्टाचार ‘मलय’म झालाय आणि याच विषयावर पिंपळपारावर चर्चा करण्यासाठी नेहमीची मंडळी जमली. चहा पिता पिता सत्या परखडेंनी राजकारणी बाबा राजगिरेंची खोड काढली. “काय राजगिरे...काय म्हणताय... नाही म्हटलं तोंड कुठं काळं करून आलात कोळशासारखं ?”“कुठे काय...कुठे काय ?” दोन्ही पंजांनी चेहरा पुसता पुसता राजगिरे गळबळले.“आले असतील कोळशाच्या खाणीत तोंड घालून”, दादा समाजे मधेच बोलले. समाजेंच्या बोलण्यामुळे राजगिरेंनी त्यांच्याकडे डोळे वटारले आणि बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात नेहा नटवेने ओठ उघडले, “राजगिरे, राजगिरे...तुमचा कोळशाच्या खाणीत तोंड लपण्याचा अनुभव कसा होता ?” नटवेच्या प्रश्नाने आगीतून धुराचे लोळ उसळावेत तसे राजगिरेंच्या डोळ्यांतून राग उसळला.“अगं नटवे, असं सटवीसारखं बोलू नकोस. कसे झाले तरी ते आपल्या देशाची धुरा खाणीतून निघणा-या धुरासारखी खांद्यावरून वाहत आहेत”, राजा संपादके नटवेला समजावण्याच्या सूरात बोलले.“अहो संपादके, त्यात काय चुकले नटवेचं ? आज खाणीवाटपाच्या भ्रष्टाचाराचा धूर पसरतोय तो राजगिरे खाणीत गिरल्यामुळेच ना !” परखडेंनी वरखडा काढला. पण नटवेच्या प्रश्नाने अस्वस्थ झालेले राजगिरे गप्प बसतील तर कोळशाची खाण शपथ! “हे बघा, तुम्ही जे जे काय बोलताय त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, ही काळ्या कोळशावरची रेघ आहे. माझ्या नावाचा उगाच भोंगा वाजवू नका.” राजगिरे तिडकीने बोलले. “बरोबर आहे तुमचं, राजगिरे. शेवटी ती काय, ती काळ्या कोळशावरचीच रेघ आहे. भिंग वापरूनही दिसणार नाही.” दादा समाजेंनी कोळशाचा तुकडा तोडावा तसं राजगिरेंना तोडलं.“राजगिरे,  तुम्ही जे काय करता ते अयोग्य आणि पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्ही सांगता एक, करता एक आणि वागता एक. त्यामुळे तुमच्यात बाकी कशात एकता नसली तरी भ्रष्टाचारात एकवाक्यता आहे. जनतेशी असे वागणं आणि त्यांची फसवणूक करणं म्हणजे जनतेचा विश्वासघात करण्यासारखं आहे. जनता सहनशील असली तरी जास्त सहन करणार नाही.” संपादकेंनी आपलं मत मधेच मांडलं. “संपादके, हे तुमच्या ‘अनाकलनीय’मध्ये छापलंय ना...मग पुन्हा तेच कशाला ऐकवता ?” नटवेने मधेच सवयीप्रमाणे नाक खुपसलं.“असू दे... असू दे...तू कशी एकच बातमी दोन वेळा वाचतेस आणि दाखवतेस तसा हा प्रकार आहे.” सत्या परखडे मधे पडले. तेवढ्यात आतापर्यंत गप्प बसलेले विचारे वैचारिक मांडू लागले, “राजगिरे, तुम्ही सर्व प्रक्रिया छुपा-छुपीसारखं कशासाठी करता ? आज देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत हे ‘युवा’ नेत्यांना कळतंय आणि तुम्हा म्हाता-यांना कळत नाही म्हणजे काय. देश भ्रष्टाचाराने पोखरला जात आहे आणि तुम्ही अधिक पोखरत आहात. देशाला वाचवायचं सोडून सर्व जण भ्रष्टाचार करण्यात मग्न आहेत.”“विचारे, तुमचं वैचारिक थांबवा बघू. मी काय म्हणतो, खाणवाटपाचे जे नियम तयार केले ते सर्वांना अमान्य झाले. त्यामुळे जास्त वेळ न घेता खाणवाटप करून टाकले. नियमही नको आणि निकषही नको. चांगल्या कामाला मुहूर्त कशाला ? नाही का !”“हेच...हेच ते. मी अगोदरपासून कोकळत होतो की, खाणवाटपात गिरलेल्या राजगिरेंचा हात आहे. सीबीआयतर्फे त्याचा तपास व्हावा. पण लक्षात घेतो कोण ? मी बडबड करतो असंच सर्वांना वाटायचं. पुराव्याशिवाय आरोप करायची सवय नाही या दादा समाजेंना, समजलात.” दादा समाजेंनी एखाद्या कसलेल्या मल्लासारखे दंड थोपटले.“अहो समाजे, या राजगिरेंना पोटात घेऊन समजवा नाहीतर पोटतिडकीने समजवा...त्यांच्या कालवंडलेल्या चेह-यावरची भ्रष्टाचाराची काजळी जाणार नाही. गेंड्यांच्या चामडीवर कधी परिणाम होणार नाही.” परखडेंनी राजगिरेंच्या धगधगत्या कोळशावर थंड पाणी ओतलं. तेवढ्यात नटवेनं मनात नटवलेल वाक्य बोलली.“म्हणजे कोळसा खाणवाटप घोटाळा झाला ही काळ्या दगडावरची रेष आहे आहे तर!” आतापर्यंत सर्व संवाद-विसंवाद ऐकत असलेले सदा सामान्ये शेवटी म्हणाले, “कोळसा कितीही उगळला तरी काळा तो काळाच आणि भ्रष्टाचारावर कितीही ‘आचार’ केला तरी भ्रष्टाचार तो भ्रष्टाचार आणि यालाच म्हणतात भ्रष्टाचाराची खाण तशी नेत्यांची नीती!”

रविवार, १९ ऑगस्ट, २०१२

दादा, तुम्हीसुद्धा ?


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू केलं. त्यासाठी लोकपाल बिलाचा आग्रह ही धरला. यासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. दिल्लीतील जंतरमंतरवर केलेल्या उपोषणाला प्रचंड पाठिंबा मिळाला. परंतु या वेळी दहा दिवस केलेल्या उपोषणाकडे सरकारने ढुंकूनही पाहिलं नाही. सरकारच्या थंड प्रतिसादामुळे टीम अण्णाचं उपाषण थंडावलं मात्र बंडासाठी राजकारणाच्या आखाड्यात उडी घेण्याचा निश्चय केला. देशाला पर्याय देण्याचे सूतोवाच झालं आणि जंतरमंतरवरच्या उपोषणानंतर टीम अण्णाला राजकीय मार्गाने मंतरलं. टीम अण्णाच्या या भूमिकेला संमिश्र प्रतिसाद मिळाला, पण भ्रष्टाचार हा शिष्टाचारासारखा झाल्याने पिंपळपारावरही भ्रष्टाचार, उपोषण आणि राजकारण यावर तावातावाने चर्चा झडू लागली.
बाबा राजगिरे, राजा संपादके, जागृत विचारे, सत्या परखडे, नेहा नटवे, दादा समाजे आणि सदा सामान्ये नेहमीप्रमाणे चर्चेला उपस्थित होती.
सत्या परखडे यांनी तावातावाने बोलायला सुरुवात केली "दादा समाजे, तुम्ही उपोषणाचा राजमार्ग सोडून राजकारणाचा एक्स्प्रेस पकडलात..."
 "परखडे, असे उतावीळ होऊ नका. जरा शांत व्हा. तुमच्यासारखी अनेकांची स्थिती झालीय", संपादके मधेच संपादित वाक्य बोलले.
 "पण, दादांनी अजून काही दिवस उपोषण केलं असतं तर.... तर .." नेहा नटवे पापण्या मिचकावत बोलली.
 "...तर.. तर... काय ? " संपादके नटवेला मध्येच तोडत म्हणाले.
 "...तर काय मला काही दिवस टीव्हीवर झळकायला मिळालं असतं ना..एक संधी."
 "कशी काय ?" सत्या परखडे.
 "परखडे, दादांचे उपोषण दाखविताना..."
 "हे बरं आहे. दादांनी उपोषण करायचं आणि तुम्ही पोटभूर जेवून कोकळायचं." परखडेंनी नटवेंवर ओरखडे ओढले.
 "तेवढा तरी सपोर्ट करतोच ना आम्ही." नटवे संपादकेंकडे पाहत बोलली आणि संपादकेंनी नटवेंच्या हा मध्ये हा मिसळत म्हणाले,
 "एकदम बरोबर बोलली नटवे. दादा समाजे हे स्वच्छ आहेत. त्यांचे आचरणही भ्रष्ट नाही. सर्व कारभार कसा धुतलेल्या तांदळासारथा स्वच्छ. तसेच काचेप्रमाणे पारदर्शक. माझं तर ठाम मत आहे की यात बाबा राजगिरेंनी राजकारणी चलाखी करून वेगळीच खेळी केलीय आणि दादांना राजकारणात ओढलंय."
संपादकेंचं बोलणं थांबते न थांबते तोच राजगिरे जोशात बोलले,
 "अहो संपादके, काय बोलताय काय ? काही तरी मर्यादा आहे की नाही तुम्हा संपादकांना ? उगाच तरी सुतावरून  स्वर्ग नका गाठू. तुम्हाला काय...दुसरं काय छापायला नाही मिळालं तर राजकारण आहेच." बाबा राजगिरेंचा पारा चढला होता. डोळे गरगरा फिरवत असतानाच सत्या परखडे सत्य वदला.
 "बरोबर आहे संपादकेंचं. दादांना बिल पास करण्याची आश्वासने तुम्हीच दिली होती ना. चर्चा, विचार, विनिमय करून, गोंगाट, गोंधळ घालून संसद तुम्हीच गाजविलीत ना...दादांच्या आणि टीम दादाच्या नावाने. मग त्या आश्वासनांचं काय झालं. ती भ्रष्टाचाराच्या चुलीत गेली की तुम्ही बसता त्या गल्लीतच गेलीत."
 "हे राजकारणी असेच असतात. आश्वासनांचा डोंगर उभा करायचा आणि मग डोंगर पोखरून उंदीर काढायचा. एखादे आश्वासन पाळायचं आणि भल्या मार्गाने जाणाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडायच्या अगदी एके -56 , एके 47 सारख्या. हा धंदाचा झालाय." संपादकेंचा आवाज वाढला होता, पण गप्प बसतील तर बाबा राजगिरे कसले.
 "हे बघा परखडे आणि संपादके, आमचा भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याचा अजेंडा आहेच. पण समूळ भ्रष्टाचार निर्मूलन होणं अशक्य आहे. मात्र दादाही समूळ भ्रष्टाचाराचे उच्चाटन होण्याच्या मुद्द्यावर अडून राहिले म्हणून मग आम्ही नडून राहिलो. दादांनी राजकारणात यावे आणि निवडणुका लढवाव्यात." बाबा राजगिरे हातवारे करत आपलं भाषण थांबवणार इतक्यात परखडे उखडले,
 "उपोषण हे भ्रष्टाचारावरील जालीम औषध नाही हे तुम्हाला माहीत आहे ना...मग तुम्ही कायदा का करत नाही. तुमच्या अंगात कर नाही तर मग डरता कशाला? मंजूर करा ना एकदाचे लोकपाल बिल. ते बिल नाही यशस्वी झालं तर रद्द करता येईलच ना..."
 "स्वत:चे भ्रष्टाचार उघड्यावर आले तर आदर्श घोटाळ्यासारखे होईल म्हणून ते घाबरत असावेत. नाही तर काय ...लोकपाल बिल लाना मना है क्या ? " नेहा नटवे सर्व जोश एकत्र करून बोलली. नटवेच्या बोलण्याने जागृते जागृत  झाले आणि त्यांचे विचार मांडायला सुरुवात केली.
 "भ्रष्टाचाराच्या किडीने संपूर्ण देश पोखरला आहे. ज्या प्रकारे वाळवीने फर्निचर कुरतडावे त्याप्रमाणे भ्रष्टाचाराने देशाला कुरतडलंय. देश भ्रष्टाचाराने बरबरटलाय. बोट ठेवावं तिथं भ्रष्टाचार. पण याविरोधात टीम दादाने जे पाऊल उचललं ते योग्यच होतं, म्हणून तर देशभरातून त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला प्रतिसाद मिळाला."
 "अहो, पहिल्या आंदोलनाला भरघोस प्रतिसाद मिळतोच. त्यात नवल ते काय ? " विचारेंचे विचार मधेच तोडत बाबा राजगिरे तणतणले.
 "मग आधीच तरतूद असलेल्या बिलाचा कायदा बनवायला हरकत का ?" संपादक संपादले.
 "हो एकदम बरोबर बोललात संपादके तुम्ही. पहिल्यांदा तुमृच्या 'अनाकलीय'चं आकलन झालं आणि मी काय म्हणतो, पहिल्या कायद्यांचा परिमाणकारक उपयोग  होत नसेल तर अजून कायदे करून काय फायदे आणि काय वायदे ?" परखडेंच्या वदनी सत्य प्रकटले.
 "थांबा...थांबा...थांबा...तुम्ही असं एकमेकांना विरोध करू नका. या वेळच्या आमच्या उपोषणाचे, आमच्या आंदोलनाचे बाबा राजगिरे आणि अन्य पक्षांनी दखल घेतली नाही. शेवटी उपोषणात वेळ घालवण्यापेक्षा आणि आश्वासनांच्या पूर्ततेची वाट पाहण्यापेक्षा अॅक्शन करण्याची वेळ आलीय." दादा समाजे समाजावत बोलले.
 "म्हणजे दादा, सरकारने तुमची विकेट काढली का ?" नटवेच्या अनपेक्षित प्रश्नाने संपादके आणि विचारे स्तब्ध झाले तर आपल्या संवादाचे चौर्यकर्म केल्याने परखडेंनी तोंडावर हात ठेवले. पण खमकेपणा दाखविणारे दादा समाजे बाबा राजगिरेंकडे पाहात बोलले.
 "या देशाला आता नवा पर्याय हवाच आहे आणि हा पर्याय मी दिल्याशिवाय राहणार नाही. माझा शब्द आहे. प्रत्यक्ष राजकारणात न उतरता, समाजसेवा सुरू ठेवून असं राजकारण लढवेन ना त्याचं प्रात्यक्षिक बघात तुम्ही."
 "दादा, दाखवाच तुम्ही तुमचं पाणी. वाद च्विंगमसारखा चघळून चघळून चोथा करण्यात आमचा कुणीही हात धरू शकणार नाही. उगाच नाही गल्ली 1 पासून गल्ली 10 पर्यंत मजल मारलीय." राजगिरे छातीवर हात आपटत बोलले.
वाद वाढत जाणार आणि काहीही साध्य होणार नाही याची जाणीव झालेले सदा सामान्ये शेवटी शांतपणे म्हणाले,  "काहीही असो...भ्रष्टाचार सोडवण्याचा मार्गही आता राजकारणातून गेला !" 

रविवार, ५ ऑगस्ट, २०१२

'समन्वय' तुझा नि माझा


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी असा वाद निर्माण झाला. दिल्लीतील राजकारणासह राज्यातील राजकारणावरही त्याचा परिणाम झाला. अखेर अनेक वेळा बैठका घेऊन घेऊन तोडगा निघाला. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात अधिवेशन गाजण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादी वादाचाच अधिक गाजावाजा झाला. नाराजीच्या फुग्याचा बॉम्ब न होता नुसता फुसका बार ठरला आणि इकडे पिंपळपारावरच्या बैठकीत मात्र फटाके फुटू लागले.
बाबा राजगिरे, राजा संपादके, नेहा नटवे, सत्या परखडे, जागृत विचारे, दादा समाजे आणि सदा सामान्ये यांनी पिंपळपारावर ठाण मांडले....
'काय बाबा राजगिरे, तुम्ही कसलं राजकारण करता? आदी नावातच गिरे...म्हणजे गिरे तो भी टांग उपर ', सत्या  परखडेंनी बाबा राजगिरेंची खोड काढली.
'काय म्हणता परखडे, अहो तुम्ही माझ्या राजकारणाबद्दल शंका उपस्थित करता...माझ्यासारखा दूरदूष्टी लाभलेला नेता संपूर्ण भारतवर्षात शोधून सापडणार नाही आणि राजकारणात तर नाहीच नाही', राजगिरेंनी छातीवर हात ठोकून ठोकून सांगितले.
'अय्या खरंच, तुमची दृष्टी छान आहे. मग दृष्ट काढू का? जरा तुमच्या दूरदृष्टीपणाबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा ना...काय वाटतं तुम्हाला तुमच्या दूरदृष्टीपणाबद्दल?', टीव्ही अँकर नेहा नटवेने हातातला पेन राजगिरेंच्या तोंडासमोर बूमसारखा धरला... एवढ्यात राज संपादके मधेच लिहिते नव्हे बोलते झाले,
'नटवे, नटवे, असा नटखट प्रश्न साहेबांना कशाला विचारलास? त्यांनी दूरदृष्टीपणाबद्द्ल सांगावे म्हणजे स्वत:हून स्वत:ची स्तुती केल्यासारखे वाटेल ना...आणि त्यांच्यासाठी दूरदृष्टीपणा हा चावून चावून चघळलेला विषय आहे.'  यावर नटवे बोलायच्या अगोदर परखडेंनी ओरखडे काढायला सुरुवात केली.
'या गल्लीतील बाबांकडे कसला आलाय राजकीय दूरदृष्टीपणा. राजकारणात पडल्यावर त्यांनी जो दूरदृष्टीपणा दाखवला तो समस्त जगाने पाहिला. संपादके, तुम्हीसुद्धा दूरदृष्टीपणाबद्दल सारखे सारखे लिहून त्याला गुळगुळीतपणाचा लेप चढवलात. या राजगिरेंनी स्वत:च्या गल्लीचा विकास केला आणि बाकीच्या गल्ल्या अद्याप भकास आहेत.'
'म्हणजे मुंबई झकास आणि उर्वरित महाराष्ट्र भकास', नटवेने मधेच तोंड खुपसले.
'वा...वा...काय छान अलंकारिक वाक्य बोललीस तू, नटवे. असंच अँकरिंग केलंस ना तर टीआरपी  वाढेल म्हटलं', राजा संपादके उपरोधिकपणे बोलले. बाईंनी बोलावे आणि इतरांनी मान डोलवावी तसं नटवेने संपादकेंकडे पाहत मान डोलावली. आणि आतापर्यंत शांतपणे विचार करणारे दादा समाजे जागे झाले.
'बाबा राजगिरे, तुम्ही राजकारणातील बाप माणूस.' समाजे असं म्हणताच कॉलर ताट करून मान उंचावणार इतक्यात परखडे ओरडलेच.
'समाजे, अहो काय बोलताय काय...राजगिरे राजकारणातील बाप नाही ताप आहे नुसता ताप.' परखडेंच्या ओरखड्याने राजगिरेंनी स्वत:ची धरलेली कॉलर सोडली आणि मान उंचावून बोलणार इतक्यात संपादके मध्येच संपादले,
'परखडे, तुम्ही नटवेच्या बाजूला बसलात ते बरे झाले. जरा सुंदर शब्द सुचू लागले. असो. समाजे, तुम्ही काय म्हणत होता ते सांगा.' समाजे बालू लागले...
'राजगिरे, राजकारणाची अधोगती झालीय. त्यातच तुम्ही आघाडीत बिघाडी करून तिढा निर्माण करताय. त्यामुळे राजकारण आणखी रसातळाला जायला लागलंय. तुम्ही तुमच्या आतील आवाज ऐका. ख-या अर्थाने तुमच्यात ताकद आहे. तुम्ही स्वबळावर अनेक निवडणुका लढवू शकता, पण तसं होताना दिसत नाही. याचाच अर्थ तुम्ही द्रष्टे असलात तरी ते द्रष्टेपण राजकारणासाठी उपयुक्त ठरताना दिसत नाही. आणि हो, तुम्ही ते वेळोवेळी सिद्धही केलंय. स्वत:च्या हाताने स्वत:च्या पायावर कु-हाड मारून घेण्यातच तुम्हाला जास्त हौस दिसते. तुम्ही टीकाही करता आणि ओंजळही पसरता. हे तुमच्यासारख्या कसलेल्या, मुरब्बी राजकारण्याला शोभनीय नाही. यातून वेगळा विचार समाजापर्यंत जातो...तुमच्या भाषेत सांगायचं तर मतदारांपर्यंत जातो तो म्हणजे तुम्ही बोलता एक, दाखवता दुसरं, करता तिसरंच आणि  या सर्वांतून निष्पण होतं भलतंच. तुमच्या तडजोडी राजकारणाबद्दल मी आझाद मैदानात उपोषण करणार आहे, हे आत्ताच सांगून ठेवतो...' समाजे बोलतानाच नटवेने त्यांचे बोलणं अर्धवट तोडलं,
'करा, करा...समाजे तुम्ही उपोषण करा...आम्ही तुमचे उपोषण क्षणोक्षणी दाखवू.'  नटवेच्या बोलण्यावर समाजे किंचितसे हसले आणि राजगिरेंकडे पाहात म्हणाले,
'राजगिरे, तुम्ही स्वबळावर लढावं असं आम्हाला वाटतं.' समाजेंचे वैचारिक संपताच परखडे बोलले,
'अहो समाजे, यांना केव्हाही आणि कितीही वेळा भुजांचे बळ दिले तरी ते स्वबळावर निवडून येणार नाहीत. त्यांना गल्ली-६मध्ये निवडून येतील की नाही याची शाश्वती नाही, मग गल्ली-२ पर्यंत काय निवडणुका लढवणार. या राजगिरेंचा इतिहास असा विश्वासघातकी आणि आत्मघातकी. कुणाचं केव्हा काय करतील आणि याचा नेम नाही.'
'एकदम परफेक्ट बोललात, परखडे तुम्ही', संपूर्ण अग्रलेखात एखादं संपादित वाक्य असावं तसं संपादके बोलले.
'राजगिरे एखादा निर्णय घेतात आणि सर्व नेत्यांना आणि त्यांच्या मित्रांनाही ते कामाला लावतात. अशीही बाबांची सवय. बाबांच्या सवयीला आमचे आबा काय करणार...म्हणजे माझे बाबा काय करणार- पण काही वळत नाही आणि वळणावरही येत नाही तसेच वळचळणीलाही येत नाही. मग आपटतात तोंडावर, तोंडघशी पडतात अगदी घशाला कोरड येईपर्यंत. आणि नंतर सुरू होतात बैठकांवर बैठका...'
'वा...संपादके, क्या बात है. तुम्ही हे जे काय अनाकलनीय बडबड केलीत तशी मला जमली तर मग मी एकदम स्टार अँकर  होईन', नटवे बडबडली. पण गप्प बसतील ते संपादके कसले. अनाकलनीयचा उल्लेख करून नटवेने त्यांना डिवचलं होतं.
'नको...गं  बाय माझे... तू तुझी अक्कल मधेच पाजळू नकोस. नाहीतर तुझ्या त्या बुलेटिनमध्ये बातम्या कमी आणि तुझी बडबडच अधिक दिसायची.'
'हूँ, माहितेय...माहितेय' नेहा नटवेनं नाक मुरडलं. चर्चेचा नूर पालटू नये म्हणून जागृत विचारे जागरुकपणे बोलते झाले.
'आज जग जवळ आलंय. जागतिक घडामोडींचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे आपल्या राजकीय व्यवस्थेवर परिणाम होतोय. त्यातच प्रादेशिक पक्षांचा जोर नको तितका वाढतोय. केंद्रात एका पक्षाचे सरकार आणि राज्यात दुस-या पक्षाचे सरकार. एकाच पक्षाचे सरकार सत्येवर येणं अशक्य होत चाललंय. स्थिर सरकार देण्यासाठी आता प्रादेशिक पक्षांचा टेकू घ्यावा लागतोय. आणि हो प्रादेशिक पक्षांचा टेकू घेऊन सरकार चालवणं म्हणजे एका अर्थी राष्ट्रीय पक्षांची ही अधोगतीच म्हणायला हवी. याचाच फायदा प्रादेशिक आणि छोटे छोटे पक्ष घेताना दिसतात. नाक दाबून तोंड कसे उघडायचं हे राजकारण्यांना पक्के माहीत असतं. तसेच शेपूट वळवळलं तर ते कसं ठेचायचं याचंही ज्ञान असतं. आपल्या कळपात एखादा नवीन प्राणी आला की काही दिवसांसाठी काही प्राण्यांमध्ये अस्वस्था पसरते, असा माझा अनुभव आहे. आपले महत्त्व कमी होण्याची एक अनामिक भीती असते. तेव्हा केवळ पॉवरफुल असून चालत नाही त्यासाठी पॉवरफुल वैचारिक बैठक असायला हवी. बाबा राजगिरेंचं काहीसं असंच झालेलं असावं. ' विचारेंच्या या मंथनात सर्वांनी माना डोलावल्या आणि सरतेशेवटी सदा सामान्ये बोलते झाले.
'राजगिरेंनी कितीही बंड केले आणि बैठका घेतल्या तरी त्या सर्वसामान्यांसाठी हिमनगासारख्याच वाटतात. कारण सर्वसामान्यांपर्यंत 'समन्वय' पोहोचतो बाकी सर्व गुपितं गुपितच राहतात अगदी हिमनगासारखी!.'

मंगळवार, १७ जुलै, २०१२

बंधुत्व आणि मित्रत्व


 हे बंधुत्व आणि हे मित्रत्व

प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सर्व काही माफ असतं. अक्षम्य चुका क्षम्य असतात. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रपतीपदाच्या निवडीचा वाद सुरू आहे. या वादात राजकीय पक्षांनी आपले रंग दाखविले. एवढेच नव्हे तर संगमांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. पण अशा या पेचात सरस ठरली ती मैत्री. राजकीय पटलावरचे सम्राट शरद पवार आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची निखल मैत्री आणि त्यांचं मित्रत्व कामाला आलं. तर उद्धव ठाकरेंना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर राजकारणापलीकडचे बंधुप्रेम उफाळून आलं. राजकारणापलीकडचं बंधुत्वाचं नातं ख-या अर्थाने महत्त्वाचं असतं हे त्यांनी दाखवून दिलं. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं तमाम मराठी मनांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरेंच्या एका हृदयाने ते काही काळासाठी का होईना पण केलं. मीडियावाल्यांनी अनेक शक्यतांच्या फटाक्यांची आतषबाजी करत चर्चेला तोंड फोडलं. मग पिंपळपारावरील बैठक तरी कशी मागे राहील. पिंपळपारावरच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटू लागले. आणि त्यांनी विषय निवडला हे मित्रत्व आणि हे बंधुत्व’.
आज ख-या अर्थाने बंधुभाव जागृत झाला. माझ्यासह अनेकांना त्याचा आनंद झाला. भावाने भावाची भेट घेणं यातच सर्व आलं, राजा संपादके संपादकीय लिहिण्याच्या ढंगात बोलले. संपादकेंचं बोलणं थांबतं न थांबतं तोच नेहा नटवे केसांच्या पिसा-यात हात घालत म्हणाली, अय्या मला तर आज रामायण आठवलं...म्हणजे राम वनवासात असतानाची त्यातील राम आणि भरत यांची भेट आठवली आणि.... नटवे काय बोलतेस काय, उद्धव काय वनवासात होते?, अगं त्यांना बरं नव्हतं म्हणून भेटले. दादा समाजे नटवेला समजावत म्हणाले.
सॉरी सॉरी हं. त्याचं काय झालं त्यांचं बंधुप्रेमाच्या बातम्या आत्मतिडकीने देताना मी जरा हेलावूनच गेल. काय सांगू, त्यांच्यातील प्रेम सांगताना मला जरा प्रेमाचं भरतंच आलं होत.
येईल तुला ना भरतं काय प्रेम ओसंडून वाहेल. नशीब मगाशी महाभारत आठवलं म्हणून म्हटलं नाहीस. सत्या परखडे नटवेकडे तिरक्या नजरेनं पाहात म्हणाले.
नटवेनं म्हणे बंधुप्रेम चावून चावून चघळले सकाळपासून संध्याकाळपर्यंत’, संपादकेंनी परखडेंकडे कटाक्ष टाकत नेटवेला टोला हाणला. पण गप्प बसेल ती नेहा नटवे कसली. तिने लगेच राजा संपादकेंना उत्तर देऊन टाकलं, आम्ही चावून चावून चघळले आता तुम्ही लिहून लिहून छापा.
संपादके आणि नटवे यांच्यातील वाद वाढणार नाही याची काळजी जागृत विचारेंनी घेतली. तुम्ही दोघंही वाद थांबवा. पण राज ठाकरेंनी आज जे बंधुप्रेम दाखवलं ते याग्यच होतं. भाऊ भावाच्या पाठीशी उभा राहणार नाही तर कोण राहणार? शेवटी त्यांच्यातील रक्ताचं नातंच पुढे आलं. राजकीय वाद असताना असा दिलदारपणा दाखवणं यासाठी मोठं काळीज लागतं. राजकारणापेक्षा कुटुंबही महत्त्वाचं असतं.
एकदम बरोबर बोललात, समाजे, आज जरा शांत असलेले परखडे बोलले. तुम्ही या संपादके आणि नटवे यांच्यातील वाद वाढला असता तर नटवेंनी महाभारतातील कृष्ण-अर्जुनचं उदाहरण दिलं असतं. आणि कृष्णाने जसं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं तसं म्हणे राजने उद्धव ठाकरेंच्या गाडीचं केलं. या नेहा नटवेचा काय नेम नाही.
मग काय तुमच्यावर नेम लावू नटवे जरा जोशातच बोलली. त्याबरोबर चर्चेत हशा पिकला.
राजनी जसं बंधुत्वाचं नातं दाखलवं तस सर्व राजकारण्यानी दाखवलं पाहिजे. फक्त राजकारण एके राजकारण करून चालणार नाही. समाजाप्रती, कुटुंबाप्रती काही आपली जबाबदारी आहे याची जाणीव सर्व राजकारणी मंडळींना व्हायला हवी. स्वत:च्या विकासाबरोबर समाजाचा विकास करताना असा बंधुभाव दाखवला पाहिजे, दादा समाजेंच्या शब्दांतून प्रेमाबरोबर समाजसेवाही सांडत होती.
पण काहीही म्हणा आठवड्यात आपल्याला बंधुत्व आणि मित्रत्व यांचं दर्शन झालं. असं दर्शन होणं म्हणजे योग यावा लागतो. त्यासाठी भोगही भोगावे लागतात सत्या परखडेंनी मध्येच मित्रत्वाचा मुद्दा मांडला.
बंधुत्वाच्या विषयाबरोबर मित्रत्वाचा विषय चालवला गेला. राजकारणात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंची राजकारणापलीकडील मैत्री सर्वश्रुत आहे. जेव्हा जेव्हा राजकीय पेचप्रसंग निर्माण होतात तेव्हा तेव्हा बारामती मुंबईला येते.
मग काय बारामती मुंबईला आली रे आली की आम्ही सर्व जगाला दाखवली’, नेहा नटवेंने संपादकेंकडे बघत शब्दफेक केली.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून जे रामायण, महाभारत होतंय ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण छोटीशी गोष्ट मोठी करतो. तिच्यावर महाचर्चा घडवतो. वेळ आणि पैसा खर्च करतो. लोकशाही भारतात वेळ आणि पैशांचा अपव्यय टाळणं हे राजकारणी मंडळींनी पाहिलं पाहिजे. काँग्रेसला राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार निवडण्यासाठी प्रणवदांची मदत घ्यावी लागली. त्यांना अन्य पक्षांकडून विरोध झाल्यामुळे आणि त्यातच भाजपने विरोध दर्शविल्यामुळे मोठा बाका प्रसंग निर्माण झाला. शेवटी शिवसेनेने प्रणवदांना पाठिंबा दर्शविला. प्रणवदांच्या भेटीवेळी शरद पवार मातोश्रीवर हजर होते. यालाच मित्रत्व म्हणतात, जागृत विचारेंनी आपले विचार मांडले.
ही चर्चा बंधुत्व आणि मित्रत्वाच्या नात्यावर रंगत होती. सर्व जण आपापले विचार मांडत होते... इतक्या अद्यापपर्यंत एकही शब्द न बोलणार सदा सामान्ये म्हणाले, बंधुत्व आणि मित्रत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्याची तिसरी बाजू आहे भाव’.

गुरुवार, १२ जुलै, २०१२

...आणि आदर्श चर्चा हरलवी


आदर्श सोसायटी घोटाळा वाढतोय, गाजतोय, वाजतोय आणि बडवला जातोय. जेवढं झाकलं जातयं तेवढं उघडं होतंय. चौकशी आयोगासमोर येणारे चार बोटं आपल्याकडे ठेवून एका बोटाने दुस-याचं नाव सूचकरणे सुचवत आहेत. तू-तू मै-मैबरोबर तो-तोचा आणि तो मी नव्हेच करत सही रे सहीचं नाट्य रंगलंय. मीडियाने तर बातम्या देण्याचं काम चोख बजावलंय. वर्तमानपत्रात आदर्शबाबत रोज एक बातमी उगवतेय. तर चॅनेलवाले चर्चा, महाचर्चा आणि विशेष चर्चा घडवत आहेत. उशिरा का होईन सत्य नेहमीप्रमाणे शेवटीच बाहेर येणार. पण आज पिंपळाच्या पारावर सप्तजणांची बैठक बसली होती आणि तिचा आजचा विषयही होता आदर्श सोसायटी घोटाळा. चर्चेसाठी राजकीय पटलावर नेहमी वावरणारे बाबा राजगिरे, गल्लीबोलात समाजसेवा करणारे दादा समाजे, सर्व गोष्टींबाबत विश्लेषणाची बाजू मांडणारे जागृत विचारे, टीव्ही अँकर नेहा नटवे, कशाचीही भीडभाड न राकता-चूक की बरोबर याची तमा न बालगता बोलणारे सत्या परखडे, स्वत:चे वर्तमानपत्र चालविणारे आणि संपादक म्हणून काम करणारे राजा संपादके आणि नेहमीच शेवटी बोलणारे आणि सामान्यांचे प्रतिनिधी करणारे सदा सामान्ये.

पिंपळाच्या पारावर बैठकीला सुरुवात झाली. जवळच्या चहावाल्याकडून अद्रक मार के चहा मागवला. चहाचा घोट घेत राजा संपादके बोलले, वा ssss काय फक्कड चहा झालाय. एकदम झकास. फर्स्ट क्लास. अद्रकचा मस्त वास येतोय. 
काय बाबा राजगिरे, काय धापा मारताय. अहो. अद्रकचा नाही आदर्शचा वास येतोय. सत्या परखडे परखडपणे बोलले. परखडेंचा स्वभाव तसा परखड आणि थोडासा तापट. सत्य काय, असत्य काय,  चूक काय, बरोबर काय, याचा सारासार विचार करणं त्यांच्या स्वभावात नाही. जे काय बोलायचं ते तेथल्या तेथेच. ताडफाड हिशेब आणि तत्काळ रिझल्ट. sss, बाबा राजगिरे तोंडावर हात ठेवत म्हणाले. परखडेंच्या ओरखड्याने बाबांच्या तोंडाला चटका बसला.
जाऊ द्या हो राजगिरे, तुम्ही लक्ष देऊ नका परखडेंकडे,’ 'अनाकलनीय' वर्तमानपत्राचे संपादक राजा संपादके मधेच बोलले. 
अहो संपादके, जाऊ दे काय, जेव्हापासून आदर्श सोसायटीचा घोटाळा गाजतोय ना त्या दिवसापासून हा परखडे माझ्याकडे परखड, पारखी आणि संशयी नजरेने पाहतोय. माझं नाव बाबा आहे, मी आदर्शचा बाबा नाही. हवं तर आबांना विचारा. बाबा राजगिरे जरा जोशातच बोलले. राजगिरेंचा रोख आपल्याकडे आहे हे पाहून परखडे हातावर हात आपटत म्हणाले,
अहो राजगिरे, तुमची सवयच तशी आहे. स्वत:चं ठेवायचं झाकून, दुस-याचंही ठेवायचं दाबून आणि नको त्याचं दाखवायचं उघडून.
अय्या sss, वा काय बाईट आहे परखडे तुमचा. जबरदस्त टोला लगावलात हो बाबांना.
मानेला जरासा झटका देत हातातील कंगवा बूमसारखा पुढे करत टीव्ही अँकर नेहा नटवे जरा हटकेच बोलली. 
तिच्या या अचानक बोलण्याने सर्व जण तिच्याकडे पाहतच राहिले. अँकरिंग करताना जेवढा होश दाखवला नव्हता तेवढा जोश आता नेहा नटवेला चढला होता. 
या नटवेला काय बोलावे, याचा राजा संपादके विचार करत असताना आतापर्यंत गप्प बसलेले दादा समाजे सावकास व संमजसपणे म्हणाले, ‘बेटा नटेव, बाबा पक्के राजकारणी आहेत. त्यांचा स्वभाव हा स्थायी नसला तरी अस्थायी म्हणजेच सरड्याच्या रंगासारखा बदलणारा आहे. आणि वयाचा विचार करता परखडे जरी त्यांना बोलले तरी तू अती उत्साह दाखवू नकोस. नाय, काय असतं नव्या दमाच्या पोरींमध्ये उत्साह जास्त असतो.
दादांच्या बोलण्याने थोडी वरमलेली नटवे परखडेंच्या तोंडाजवळ असलेला कंगवारूपी बूम तसाच ठेवत म्हणाली, ‘सॉरी...सॉरी समाजेजी,.. म्हणजे मला काय म्हणायचंय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला हेच मोठं. धन्यवाद.

परखडे आणि नटवे तुम्ही जरा धीर धरा. असं उतावळी होऊ नका. शेवटी सर्व प्रश्न हे विचारविनिमय करूनच सुटतात आणि सोडवायचे असतात. आता राजकारण्यांनी ठरविलेल्या त्यांच्याच हातात असणाऱ-या यंत्रणा तपास करत आहेत ना...मग आपण एक नागरिक म्हणजे सुशिक्षित नागरिक म्हणून सत्य जगासमोर येईपर्यंत शांतपणे वाट पाहिली पाहिजे, प्रतीक्षा केली पाहिजे.’ ग्लासमधील चहा संपवत आतापर्यंत शांतपणे ऐकणार आणि फेमस विचारवंत जागृत विचारे यांनी आपली बाजू मांडली.
विचारे, तुमचं विचारमंथन होईपर्यंत दुसरा घोटाळा बाहेर पडेल. सत्य जगासमोर येईपर्यंत जग तरी सत्याचं राहिलं पाहिजे की नाही?’ परखडेंनी विचारेंच्या विचारावर आपला विचार मांडला.
परखडे तुम्ही असं कसं म्हणता? त्यात माझी काय चूक? मी राजकारणी असलो तरी माझा त्याच्याशी काहीही काडीचा संबंध नाही. उगाच नाहक गोवण्याचा प्रयत्न करू नका.’ बाबा राजगिरेंचाही आवाज थोडा वाढला. 
इतक्यात दोघांनाही थांबवत राजा संपादके मधे पडले, ‘तुम्ही दोघेही शांत व्हा बघू. आपण चर्चा करायला आलो की भांडायला? साधकबाधक चर्चा करून मार्ग काढायला हवा यातून. तशी चर्चा झाली पाहिजे की नको?’
वा संपादकेसाहेब, म्हणजे चॅनेलवर चालते तशी चर्चा म्हणाताय ना...नेहा नटवेने मधेच नाक खुपसायच्या अगोदर तोंड खुपसले. 

विधिमंडळात आजकाल फ्रीस्टाईल चर्चा केली रंगते. चर्चेचा आखाडा होतो. अशी चर्चा करू नये. राजकारण बाजूला ठेवून एखाद्या विषयावर मुद्देसुद चर्चा झडली पाहिजे. आरोप-प्रत्यारोप करू नयेत. चर्चेने एखादा विषय सुटू शकतो याच्यावर विश्वास असायला हवा नव्हे, जनसामान्यांचा त्याच्यावर विश्वास बसायला हवा,’ विचारेंना अगदी जागृतपणे विचार मांडले.

विचारे, तुम्ही एकदम सत्य बोललात. लोकशाहीत लोकशाहीच असायला हवी. आणि साधकबाधक चर्चाच व्हायलाच हवी. मी तर म्हणेन आदर्शप्रकरणी आदर्शवत चर्चा घडवून सरकारने आदर्श घातला पाहिजे म्हणजे आदर्श असा पाया घातला पाहिजे. अन्यथा, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू आणि आबा, दादा, काका, मामा यांना एकदाच इशारा देऊ,’ समाजसेवेचे व्रतस्थ समाजे धीरगंभीरपणे बोलले. विचारेंच्या मतात समाजेंचे विचार एकरूप होऊ लागले. 

एकदम बरोबर बोललात, समाजे. हे तुम्ही अगोदर आमच्याकडे प्रसिद्धीसाठी द्या. आम्ही हवी तशा हवा तयार करतो. वाताची निर्मिती करू शकतो. मग बघा काय होते ते ? वर्षभर गाजणारा आदर्श घोटाळा चुटकीसारखा सुटला की, त्याच्यावर एक मस्तपैकी संपादकीय लिहून काढतो, संपादके जरा उत्साहातच बोलले.
पण संपादकांच्या या संपादकीयची परखडेंनी चिरफाड करायला सुरुवात केली. 
अहो संपादके, तुम्ही काय खरडता संपादकीय?’ परखडे.
काय खरडतो म्हणजे...चक्क लिहितो.’- संपादके.
‘...हा तेच ते...बरेचसं तुमच्या वर्तमानपत्राच्या नावाप्रमाणे अनाकलनीयच असतं. असंही म्हणायचं आणि तसंही म्हणायचं. परखडेंनी संपादकेवर सूडच उगवला.
अहो, आम्ही आमची भूमिका मांडतो. सर्वसामान्यांची भूमिका असते ती. तुम्हाला नाय कळणार परखडे. संपादके म्हणाले.
म्हणूनच अनाकलनीय म्हणतो मी. म्हणतात भूमिका मांडतो...अहो ती भूमिका चावला तरी बरी भूमिका करते. परखडे पुन्हा बोलले.
काहीही असो. वर्तमानपत्राने बातमी प्रकाशित केली आणि आदर्शचा अनादर्श जगासमोर आला. घोटाळा बाहेर काढण्याचं श्रेय ख-या अर्थाने आमचं आहे आणि आम्ही ते आमचं कर्तव्य समजतो.’ संपादके मोठ्या फुशारकीत बोलले.
छे ओ...तुम्ही फुशारकी मारू नका... आदर्श घोटाळा आम्ही टीव्हीवाल्यांनी एवढा पिटलाय म्हणून सांगू...आदर्श घोटाळा सर्व स्तरांत, घराघरांत पोहोचवला. आदर्शबाबत येणारी प्रत्येक बातमी आम्ही ब्रेक केली. आणि सर्व नेत्यांचे बाईट घेतले अगदी वाईट वाटले तरी.नेहा नटवे अतिउत्साहातच मानेला लचके आणि गचके देत बोलली. बोलण्याच्या नादात डोळ्यावर आलेली बट मागे करत संपादकेंना कसं कापलं याच्या आनंदात ती सांडून गेली.
एवढ्यात जागृत विचारे आपल्या विचारांची पुंजी पुढे करत म्हणाले, ‘मीडियाने असं भांडू नेय. शेवटी हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. पण काहीही असो, या आदर्शप्रकरणात सीएम-बीएम, मंत्री, संत्री, लिंबू, टिंबू सर्वच अडकले. अशा नेत्यांकडून अशी अपेक्षा नव्हती पण अपेक्षाभंग करणं हा नेत्यांचा आता नित्यधर्म होत चाललाय. ज्याला आश्वासन असं गोंडस नाव दिलं जातंय स्वार्थाची पोळी भाजत आहेत. चौकशी आयोगासमोर सही रे सहीपासून बरीच बनवाबनवी होत आहे. पुरोगामी आणि अग्रेसर अशा महाराष्ट्राच्या नेत्यांकडून अशी अपेक्षा नव्हती. आपण एवढे घोटाळे करून ठेवलेत की, भविष्यात विद्यार्थी पीएचडीसाठी घोटाळा हा विषय निवडतील. एवढं दुर्दैव महाराष्ट्राच्या वाट्याला येणं ही राज्यासाठी शान, मान, जान, प्रतिष्ठा लयाला जाण्याची लक्षणं आहेत.
एकदम बरोबर बोललात विचारे, मी तुमच्या मताशी बावनकशी सोन्यासारखा सहमत आहे. सर्व यंत्रणांनी योग्य आणि निष्पक्षपाती चौकशी केली पाहिजे. आणि तसं नाही झालं तर आझाद मैदान जास्त दूर नाही. समाजसेवेचे व्रत न घेतले मी अंधनते, दादा समाजे शांतपणे आणि निर्धाराने म्हणाले.

यांच्या या सर्व चर्चेने सत्या परखडेंची खोपडी सनकली. त्यांनी दात, ओठ खात मानेच्या शिरा ताणल्या. तळपायाची आग मस्तकाला भिनली
अहो महाशय, पुरे झाले तुमचे हे आदर्श रामायण आणि महाभारत. आदर्श घोटाळ्यावर नव्याने महाभारत लिहिता येईल एवढा ऐवज सीबीआयकडे जमा झालाय. महाभारतातील एका एका पात्रावर सिनेमा काढता येत असला तरी आदर्श घोटाळ्यातील पात्रांवरून लघुपट नक्कीच निघेल. आणि काय हो, समाजे, उपोषण करुन काय राशी पाडणार ? या घोटाळ्यातील मंत्र्यांचे, संत्र्यांचे राजीनामे घेणार ? अहो, देतील राजीनामे...काही दिवसांसाठी... महिन्यांसाठी... त्याने काय फरक पडणार आहे... त्यांचे काही दिवसांनी राजकीय पुनर्वसन होईलच ना... त्यांचे पुनर्वसन प्रस्तापितांच्या पुनर्वसनासाऱखे वर्षानुवर्षे कुजणार नाही,’
सत्य परखडेंचा अवतार आणि आवेश पाहून राजगिरेंचे बोलण्यासाठी उगडलेले तोंड तसेच उघडे राहिले. विचारे डोके खाजवत होते. संपादकेंनी खिशाला पेन लावला. नेहा नटवेंची चुळबुळ सुरू झाली. समाजे स्तब्ध होते. इतक्यात येवढ्या गदारोळात एक शब्दही न बोलणारे सदा सामान्ये बोलते झाले,
आदर्शच्या चर्चेसाठी जमलो होतो. चर्चा भरकटवायची परंपरा पारावरही आहे. शेवटी काय एकमेकांच्या नावाने खडे फोडत चर्चेचे गु-हाळ असंच सुरू राहील आणि हाती मात्र धुपाटणंच येईल. चौकशीसाठी मात्र सामान्यांचा पैसा खर्च झालेला असेल.
देव आणि दैत्यांनी सागरमंधन केलं तेव्हा त्यातून निदान अमृत आणि हलाहल तरी बाहेर पडले, पण आदर्शच्या मंथनातून सत्य बाहेर येईल की नाही याची शंका आहे...नाहीतर सत्य बाहेर येईपर्यंत चौकशी आणि चर्चांचे मंथन मात्र सुरूच राहील.