बुधवार, १ जुलै, २०१५

मोदी, मन आणि मौन

प्रिय मैत्रणी,

हॅलो, हॅलो, हॅssलो, हॅsssलो, हॅssssलो, हॅsssssलो... अगं मैत्रणी, फोन 
उचललास ना... मग आता बोल काय तरी... मी एवढा कोकळतोय आणि तू मात्र 
काहीच का नाही बोलत? एवढी का रागावलीस तू? हे बघ, जे काय मनात आहे ना
 तुझा ते चक्क बोलून टाक बघू. मन की बात मन में रही तो तन तंदुरुस्त नही रहेगा
 यार...!’ “काय, काय म्हणालीस...?” तू मौनव्रत धारण केलंस आणि तेही 
माझ्याशी...मैत्रणी, हा माझ्यावर अन्याय नाही का? गेल्या वेळी तू आसनांच्या 
नावाखाली शवासन करीत बसलीस आणि आता हे मौनीव्रत... तू काय मोदींना 
फॉलोअप करतेस की काय? म्हणजे मोदी या वेळी ‘मन की बात’मध्ये जे बोलले 
नाहीत म्हणून तू मौनव्रत धारण केलंस की काय? वसुंधराराजे, स्मृती इराणी
विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि असे अनेक यांबाबत लोकांच्या मनात जी भावना 
असेल ती मोदींच्या मनात असेलच असं नाही ना गं... मोदी न बोलल्यामुळे 
विरोधकांचा जसा हिरमोड झालाय तसा तुझा झाला असेल तर मनात माझं नाव 
घे...अगदी तुला वाटेल इतक्या वेळा...“मोदी लोकसभा निवडणुकीवेळी धुवांधार 
बोलत होते. त्यांनी सर्वांना अच्छे दिन के सपने दिखाए, लेकिन वह सपने सच नही 
हुए और उनके सहकारी बच्चे जैसे बाते करते हैं,” असं तुला जर का म्हणायचं 
असेल तर तू मोठ्यानं बोल...मनात काहीही साठवून ठेवू नकोस...अगं, तू कितीही 
बोललीस तरी माझं हृदय मोठं आहे...बोल तू...बिनधास्त...कारण तू आता जे काय 
बोललीस त्यालाच ‘मन की बात’ म्हणतात, मैत्रणी! आता तूच मौन व्रत सोडून 
बोललीस म्हणून बरे झालं, नाही तर मीच तुला एक सल्ला देणार होतो. कसला 
काय विचारतेस? अगदी मनापासून सांगतो तलुा, तू मौन सोडूनच दे..अगदी ललित 
मोदींसारख. टी-२०च्या मैदानात ज्यांना पदलालित्य दाखवता आलं नाही ते आता 
शब्दलालित्य दाखवत आहेत. ते कुणाकुणाला भेटले यांची यादीच सांगत आहेत
कदाचित टी-२०मधील हिट विकेटही त्यांच्या लक्षात नसेल. मैत्रणी, तुला खरं सागू 
का....ललित मोदी व्यक्त होताहेत आणि नरेंद्र मोदी अव्यक्त....मौनं सर्वार्थ 
साधनम्...असं असलं तरी मोदींना कधीतरी मौन सोडावं लागेलच, पण त्यासाठी 
तुला वाट पाहावी लागेल. मैत्रणी, तू काहीही म्हण... तू असं सरकारसारखं वागत 
जाऊ नकोस...माझा इथे सरकारनामा होतो. पण मला माहीत आहे तू आता 
भडाभडा बोलणार आहेस माझ्याशी...मी तुला ओळखून आहे की... कारण तेरे मन 
की बात में हमेशा मैंही तो रहता हूँ...आणि तू मन की बात दिल में छुपाकर नही 
रक सकती...पीएम जैसी..
तुझाच मनमोदी,

प्रेयस 

बुधवार, २४ जून, २०१५

शिक्षणातला विनोद

प्रिय मैत्रणी
आज जाम खुशीत दिसतेय स्वारी! काय खास दिवस आहे? ‘अरे व्वा, म्हणजे तू आता ‘फादर डे’ साजरा करून चांगलाच ‘आदर’ निर्माण केलास तर... त्याची गरज होती गं... कारण आपला ‘योग डे’ अजून यायचाय ना.... ! मी काय म्हणतो मैत्रणी, आपल्याकडे डेज साजरे करण्याचे जे काय फॅड निघाले आहे त्याची शोभा होतेय असे वाटत नाही का? ‘होते ना शोभा, अगदी बरोबर बोललीस...’ जगाला आपण ‘योगा डे’ दाखवला आणि महाराष्ट्राने शिक्षणातील ताव‘डे’ पाहिले. त्यावरून जो काय गदारोळ झाला तो झाला. आता त्याची यत्ता कंची विचारण्यापासून सुरुवात झालीय. तसा महाराष्ट्रात खाते आणि त्याचा मंत्री हा त्या त्या क्षेत्रातला दिग्गज असतोच असे नाही. आजकाल ते ‘अवजड’ होऊनच बसलंय की! म्हणजे काय विचारतेस. हे बघ, आरोग्य खात्याचा मंत्री हा त्या क्षेत्रातला तज्ज्ञ असेलच असं नाही आणि पाच वर्षांनंतर श्वाश्वती नसल्यामुळे खातेवाटपाकडे लक्ष देतंय कोण? कुठेही उभे राहून त्या त्या खात्याबद्दल जोरदार भाषण ठोकता आले म्हणजे झाले. नाही तर पीएसाहेब असतातच की जोडीला!
बरं, तुला विचारायचं राहूनच गेलं बघ. तू जी काय डिग्री घेतलीस ती बोगस तर नाही ना? आणि हो असली तुझी डिग्री बोगस तर तुला तरी कसं कळणार म्हणा? संस्थाच बोगस असेल तर मग प्रश्न उरतोच कुठे उत्तर द्यायला. पण तू काहीही म्हण, परवानगी नसताना बोगस संस्थांकडे सरकार दुर्लक्ष करतंच कसं? डोळ्यांवर एवढी जाड झापडपट्टी बांधायची असते का? जाऊ दे गं... तू काळजी करू नकोस? तू मला तुझ्या असणाऱ्या पदवीसहित पसंत आहेस.
अरेच्या मैत्रणी, तू ‘शिक्षणाच्या आयचा घो’ सिनेमा पाहिलास का? नाही पाहिलास तर एकदा तरी नक्की पाहा. मला काय म्हणायचं, आता आपण जे काय EDUCATION घेत आहोत ते खऱ्या अर्थाने ‘येडूकेशन’ आहे असं मला वाटतंय...तुला नाही का वाटत तसं...वाटतं ना? काळानुरूप या ‘येडूकेशना’त थोडा बदल होत असला तरी स्पर्धा वाढवून ठेवलीच आहे की! मैत्रणी, ऐकतेस ना, नाहीतर मी शिक्षणावर बोलतोय आणि तू वामकुक्षी घ्यायचीस...गेली २० वर्षे घेतलीस शिकताना तशी...
शिक्षणात टक्केवारी व स्पर्धा आली आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाचं बाजारीकरण झालं. या बाजारीकरणाचा बळी ठरले ते विद्यार्थी...त्यातच ते सामान्य घरातील असतील तर आणखीनच हाल... जिद्द बरंच काही मिळवून देत असली तरी पैशाचं सोंग सर्वांना सर्वकाळ करता येत नाही ना! शाळेतले अनेक शिक्षकच क्लासवाले झाल्यामुळे शिक्षण वाट्यालाही लागलं, वाटायलाही लागलं आणि वाटेलाही लागलं.
समानतेची शिकवण देणारी शाळा पहिल्याच दिवशी जातीचे दाखले मागू लागल्या. शिक्षणानं समाजात समानता येण्याऐवजी विषमताच जास्त पसरताना दिसत आहे. त्याला सरकारी पातळीवरील अनास्थाही जबाबादार आहे, असं म्हटले तर मैत्रणी त्यात वाईट वाटण्यासारखं नाही. शिक्षणाच्या वर्गवारीने ‘आर्थिक जातीयवाद’ निर्माण केला आहे, एवढेच नव्हे तर तो फोफावत आहे. त्यामागे ‘महाग’ करून ठेवलेलं शिक्षण कारणीभूत आहे असं नाही का वाटत? सरकारी शाळा आणि खाजगी शाळा यातील आर्थिक आणि शैक्षणिक दर्जाची दरी स्पष्टपणे दिसतेय. आपल्याकडे शाळांचेही शैक्षणिक स्तर आहेत. मराठी शाळा, इंग्रजी शाळा, नॅशनल शाळा, इंटरनॅशनल शाळा... यांमुळे शैक्षणिक जातीयवाद आणि आर्थिक जातीयवाद उभा राहताना दिसतोय. त्यामुळे गरीब किंवा मध्यमवर्गातील विद्यार्थी इंटरनॅशनल शाळेत शिकू शकतील का? मैत्रणी, मला काय म्हणायचे की, शिक्षणात समानता तेव्हाच येईल जेव्हा सरकारी शाळांमध्ये इंटरनॅशनल स्कूलमधील सोयीसुविधा असतील आणि इंटरनॅशनल शाळेत सर्वसामान्यांचा मुलगा शिकू शकेल. त्यातच आपली शिक्षणपद्धती म्हणजे पदवीसाठी तारुण्य वेचणारी आहे. ज्या तारुण्यात काहीतरी करून दाखवण्याची रग असते ती रग, विद्यार्थ्यांमधील ऊर्जा पदवीसाठी खर्च होते. बरं, पदवी घेतल्यानंतरही तरुणांसमोर प्रश्नचिन्ह असतेच की ‘आता काय?’... शिक्षण पद्धती असे प्रश्नचिन्ह निर्माण करते हाच मोठा शिक्षणातील ‘विनोद’ आहे.
तुझाच खरा डिग्रीवाला,

प्रेयस.

सोमवार, १५ जून, २०१५

दर्याकिनारी एक रस्ता गं...

प्रिय मैत्रणी,
अगं, फोनवर जांभया काय देतेस? पहिल्या पावसाच्या गारव्यानं सुस्त आली की काय? आणि ही काय गुडमॉर्निंगची वेळ आहे का? म्हणजे मी गुडमॉर्निंग म्हणणार आणि तू थांब हं जरा जांभई देते म्हणत नंतर थँक्यू म्हणणार...‘काय तू गाढ झोपली होतीस? या गाढ झोपेत स्वप्न पाहात होतीस? तुला कधीपासून स्वप्न पडायला लागली. अगं, चांगली गोष्ट आहे ना माझ्यासाठी...’ म्हणजे कधी तरी सांगशील ‘अरे, प्रेयस आज तू स्वप्नात आला होतास असे म्हणून... ’ ए सांग ना, कुठलं स्वप्न पडलं होतं तुला...? ‘काsssssss?’ ‘मी तुला नव्या होणाऱ्या कोस्टल रोडवरून पावसात फिरायला घेऊन जातोय...’ अगं, मैत्रणी, नरिमन पॉइंट ते कांदिवली कोस्टल रोड हे शिवसेनेचे स्वप्न आहे गं. ते तू भाजपने हायजॅक केल्यासारखं काय करतेस. या कोस्टल रोडला मंजुरी देऊन भाजपने म्हणे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. कोस्टल रोड शिवसेनेने रात्रंदिवस चर्चा केली आणि एका रात्रीत हा रोड हायजॅक झाला असं तुला वाटतं का? तसं नाही गं, कोस्टल रोडला मंजुरी दिल्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी अभिनंदनाचे पोस्टर्स लागले आहेत. तुझ्या अभिनंदनाचे नाही गं...तू काय राजकारणी आहेस? मग कुणाचे काय विचारतेस ? पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे...काय आहे, ते त्यांचे राजकारण आहे. पालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. तेव्हा वाद काय आणि श्रेयवाद काय, तो उफाळून येणारच. पण तुझे स्वप्न मी नक्कीच पूर्ण करेन...तुला तुझ्या स्वप्नासह्त हायजॅक करायला मी एका पायावर तयार आहे. अगं, तुझ्या बापालाही कळणार नाही तुला हायजॅक केव्हा केले ते. मग बसेल बोंबळत, माझी मुलगी होती...माझी मुलगी होती...अगदी कोस्टल रोडवरून बोंबा मारल्या जात आहेत ना तशा... जाऊ दे...तसा पण हा कोस्टल रोड सर्वसामान्यांसाठी किती उपयुक्त ठरेल ते बांधल्यानंतर आपण पाहूच ... आणि मी तुला ३५ किलोमीटर लांब असलेल्या या मार्गावरून माझ्या ऑडीतून नेईन हं फिरायला....नको नको...ऑडी म्हटलं की जीव घेणारी जान्हवी आठवते गं. पण मी काय म्हणतो, त्यापूर्वी आपण वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून फ्रीमध्ये केव्हा जाता येईल ते पाहू या का? ते सर्व जाऊ दे, पण तुला स्वप पडणं हे माझ्यासाठी मात्र स्वप्नवत आहे हं. हे बघ मेत्रणी, पाऊस पडतोय. मी सफारी घेऊन येतो...नाही तर एखादी परवडली तर टॅक्सीही करू आणि दोघंही स्वप्नात कोस्टल रोडवरून जाताना एका सुरात गाऊ- ‘दर्याकिनारी एक रस्ता गो... वाद वाढत जाय!’
तुझीच स्वप्न पूर्ण करणारा,
प्रेयस

रविवार, ७ जून, २०१५

हायकू आणि कायकू

प्रिय मैत्रणी,
काय गं, आज काय लय भारी मूडमध्ये दिसतेस तू. नाही गं, मगापासून तीनच ओळी पुन्हा पुन: गुणगुणतेस म्हणून विचारलं. कुठल्या तरी सुंदर गाण्याचा मुखडा गातेस का तू? काय, काय म्हणालीस...? तू कविता लिहिलीस ? आता बोंबला. कशाला काय विचारतेस? तू कविता करणार म्हणजे तू कवयित्री होणार त्यामुळे मला निदान तीन ते चार भूमिका पार पाडाव्या लागणार! म्हणजे, म्हणजे काय विचारतेस? तुझ्यावर निस्सिम प्रेम केलं आता तुझ्या कवितांवरही प्रेम करावं लागणार ना...निदान नाही म्हटलं तरी कविता आवडली असं तरी म्हणावं लागणार. एकदा तुझ्या प्रेमाचा याचक झालो आता तुझ्या कवितांचा वाचक होतो. दुसरं असं की, तू जी कविता लिहिणार आहेस त्याचा फॉर्म समजावून घ्यावा लागणार. त्यासाठी मला वृत्ते, अलंकार, छंद-फंद मुक्तपणे अभ्यासावे लागणार. त्यातच तुझी कविता हृदयाला भिडणारी असू दे, प्रेम सांगणारी, वास्तव दाखवणारी, भावभावना व्यक्त करणारी, आरोप-प्रत्यारोप करणारी, निसर्गाच्या सान्निध्यात बागडणारी असू दे...अगदी अगदी कशीही असू दे...म्हणजे मुक्तछंदात मुक्तपणे फुलणारी असू दे, मी तुझ्या कवितेचा नक्कीच चाहता राहीन. कारण काय विचारतेस...कारण की कवितेतील तू माझी आहेस म्हणून. पण काहीही म्हण, मुक्तछंदात कविता करणाऱ्या कवींच्या प्रतिभांना भारी बहर येतो. मला कविता करायला जमली ना तर तुझ्यावर निदान एक काव्यसंग्रह नक्की लिहीन. कारण माझ्या कवितेची तूच प्रेरणा असशील ना...बरं ते राहू दे गं, मला सांग, आपल्या प्रेम प्रकरणाला आणि दुसऱ्यांच्या नजरेतील लफड्याला इतके दिवस झाले तेव्हा तू कधी बोलली नाहीस की एखादी कविता ऐकवली नाहीस...तुला तुझा काव्यसंग्रह प्रकाशित करायला प्रकाशक भेटला नव्हता का इतक्या दिवस? जाऊ दे गं. तू रागावू नकोस...कारण काय, कविताही आकाशाची वीज आहे, ते धरू पाहणारे त्यात होरपळतात, असे कवी केशवसुतांनी म्हटले आहे. त्यामुळे हा प्रश्न मी केला आहे. पण घाबरू नकोस, तुझ्या कवितांसाठी मी होरपळायला तयार आहे. आता तू नवनवोन्मेशशालिनीप्रज्ञाप्रतिभा संपन्न असल्यामुळे तुझ्या कविता या सुंदरच असणार आहेत. काय गं मैत्रणी, तू कोणत्या प्रकारच्या कविता लिहितेस? काsss? अगं, मी तुझ्या कवितेपायी काव्यवेडा होण्याचे ठरवले असताना तू ''हायकू'' ''कायकू'' लिखती हैं ?
तुझाच काव्यवेडा, प्रेयस



सोमवार, १ जून, २०१५

व्हॉट्सअॅप हैं ना...

प्रिय मैत्रणी,

अगं, मी तर व्हॉट्सअॅपवर  तुला कधीच गुडमॉर्निंग केलं आहे.  पण तू रिप्लाय न दिल्यामळे आता फोन केला. तू व्हॉट्सअॅप सुरू केलास ना मग त्याचा चांगला वापरही करायला शिक की...फक्त कमेंट्स पास करायला ही सेवा वापरणाऱ्यांची  काय कमतरता नाही. काहीही आणि काहीही. कधी तो टाइमपास होतो . कधी खूपच माहिती मिळते या व्हॉट्सअॅपवरून. म्हणजे तुला सांगू का, कधी कधी कुणाचा मेंदू कसा चालतो, हे समजून घ्यायचे असेल तर एकादी कमेंट्स टाकायची...मग जे काय तुटून पडतात म्हणून सांगू...जाऊ दे. मला काय म्हणायचंय तूही त्या व्हॉट्सअॅपचा चांगला वापर करायला लवकरात लवकर शिक. त्यामागे महत्त्वाचं कारण आहे हं. हे बघ, तुला बापाने अडवले आणि खोलीत कोंडून ठेवले की लगेच मला व्हॉट्सअॅप कर...मी हजर...तुझा डॅडी विचार करायच्या आत मीच घरात पोहोचेला पाहून चक्कर येऊन पडलेला असेल.  काय आहे, कोणत्याही गोष्टीचा वापर कसा करायचा, हे आपल्या विचारांवरच अवलंबून असतं ना! आता हेच बघ हैदराबादमध्ये एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावले जात होते. तिला दहावीनंतर शिकायची फारच इच्छा , पण तिच्या बापाला तिचे लग्न लावून द्यायची फारच घाई. त्यामुळे विचारात पडलेल्या या मुलीने व्हॉट्सअॅपवरून पोलिसांना माहिती दिली आणि तिचे लग्न थांबले. योग्य वेळी पोलिस दादा धाऊन आले.  तसाच एक पोलिसदादा घाटकोपरमध्ये धाऊन आला बघ. एक मुलगी हरवली असल्याचा फोटो व्हॉट्सअॅपवर फिरत होता. याचा योग्य उपयोग या पोलिसाला झाला आणि त्याने त्याच्या अपहरणकर्त्याला गजाआड केले. एक हरवलेली मुलगी आपल्या आईवडिलांच्या कुशीत शिरली. हे सर्व घडले ते व्हॉट्सअॅपमुळे. हे बघ मैत्रणी, तू घाबरू नकोस,  व्हॉट्सअॅप हैं ना...!

तुझाच व्हॉट्सअॅप वेडा,
प्रयेस

रविवार, २४ मे, २०१५

कोलांटउडी

प्रिय मैत्रणी,

अरेच्या सकाळी सकाळीच तुझा फोन..नाही नेहमी मीच फोन करतो ना...थांब हं... सूर्य उत्तरेला मावळणार का ते जरा पाहून येतो. नाही गं, तुझा फोन आल्यामुळे तुझ्या बापाचा विरोध मावळला असंच वाटलं अगदी जैतापूरप्रकरणी शिवसेनेचा विरोध मावळला ना तसंच. काय...काय म्हणतेस..हं तसं  नाही गं...तुझा राजकारणाशी काही संबंध नसला ना तरी कोकणवासीयांचा जैतापूरशी अगदी जिव्हाळ्याचा संबंध आहे बरं का! आता त्याचं काय आहे, ताजं ताजं उदाहरण म्हणून शिवसेनेचं दिलं. असे विरोध कालांतराने बोथट होतात यात काय नवीन नाही गं...पण काहीही म्हण हा, तुझ्या बापाने आपल्या प्रेमाला यलो सिग्नल दिला हेही नसे थोडके हं.. म्हणजेच काय त्यांनी थोडीतरी कोलांटउडी मारलीच की आस्ते'कदम'. मला काय वाटतं, फुकुशिमा व चेर्नोबिलला जाण्याचा सल्ला देणाऱ्यांच्या विरोधाचा भाजपने फुंकून  फुंकून फुकुशिमा केला तसा तू तुझ्या बापाचा नाही ना केलास? अगं तू नाही केलंस तर मी तरी नक्की फुंकून टाकला असता विरोध फक्त तुझ्यासाठी..काय काय...वरणभाताचं काय म्हणतेस ?  छे गं, वरणभात खायची ही काय वेळ आहे का? कोकणी लोकांना सकाळी चटणी-भाकर दिली ना तरी लय भारी न्याहरी होते. पण आता म्हणे जैतापूरप्रकरणी पर्यावरणमंत्र्यांनी केलेल्या विधानाची फारच चर्चा रंगलीय. शेतकऱ्यांनी म्हणे विरोध केला. सत्येत आल्यानंतर असं सांगणे म्हणे सोपं असतं. आता पर्यावरणमंत्र्यांना दुसरे 'वरण' नसल्यामुळे 'पर्याय' काय असा प्रश्न तुला पडला असेल तर तो डोक्यातून आताच डिलीट कर. शेवटी जे काय भाजायचं असतं, शेकवायचं असतं, खापर फोडायचं असतं त्यासाठी सर्वसामान्यांच्या नावाच्या ढालीवर फोडता येतं, नाही का माय डिअर मैत्रणी? मला माहीत आहे तुला राजकारणात काही इंटरेस्ट नाही. आपला दोघांचा इंटरेस्ट मात्र आपल्या प्रेमात आहे. आपण आपलं प्रेमजीवन अगदी यशस्वी करायचं. कितीही अडचणी आल्या तरी दुसऱ्यावर जबाबदारी टाकायची नाही शिवसेनेने जशी शेतकऱ्यांवर टाकली. पण काहीही म्हण, तुझा बाप म्हणजे जरा भारीच आहे. तुझ्यासाठी इतके दिवस मी त्यांच्या मागे मागे लागलो होतो तर त्यांनी मला झुळत ठेवलं अगदी मोदींनी शिवसेनेच्या खासदारांना जैतापूरप्रकरणी निवेदन देताना ठेवलं तसं...तुझ्या बापाचा अस्सा राग आला होता ना, पण करणार काय, सत्तेखाली हात आखडले स्वारी स्वारी तुझ्यावर प्रेम होतं ना म्हणून मी ते सर्व सहन केलं.  आणि तुला मी आजच सांगून ठेवतो हं, आपलं हे प्रेम हे अतुट आहे हे लक्षात ठेव. ते काय काही वर्षांच्या 'युती'सारखं नाही.
  तुझाच वचनबद्ध,
  प्रेयस  

शुक्रवार, २२ मे, २०१५

प्रिय मैत्रणी,
सुरक्षेचे 'दान' द्या
अरेच्या, आज पहिल्याच रिंगला फोन उचललास. नाही म्हणजे जास्त वेळ फोन सुरू राहिला असता आणि तुझ्या त्या बापाने पाहिला असता तर तू घाबरली असतीस ना प्रिये...बरोबर ना.. हे बघ, आता तू अजितबात घाबरू नकोस. तुझ्या सुरक्षेसाठी मी छातीचा कोट करून उभा राहीन...अगं एवढंच नव्हे, तर तुला सुरक्षा पुरवण्याची मागणी करायला मी सवडच देणार नाही. तू तर माझ्यासाठी जीव की प्राण आहेस. त्यामुळे तू समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची नसलीस ना तरी माझ्यासाठी मात्र खूपच जीवलग आहेस, हे विसरू नकोस. काय आहे, आजकाल कमी महत्त्वाच्या पदवाल्यांना पण सुरक्षेची जरा हावच सुटलेली असते. मग ती हाव किंवा हौस भागवण्यासाठी रुसवे-फुगेव्याचे नाटक करावं लागतं. हे बघ, तुझे रुसवे, तुझे फुगवे मी झेलायला तयार आहे गं. पण तू सुरक्षेचा दानवे (दानाचा मार्ग) पदरात पाडून घ्यायला एवढा आटापिटा करू नकोस. त्याचं काय माहीत आहे, तू अजून सामान्यच आहेस गं. अतिसामान्य झालीस ना की मग मीच तुझा बॉडीगार्ड बनून फिरेन हं. अगदी झेड प्लस सुरक्षाच पुरवेन. पण लग्नाअगोदर तू असला हट्ट धरू नको. त्याचं काय आहे ना प्रिये, मला ना स्वत:चं अकारण महत्त्व वाढवणारी माणसं खूप काही ‌आवडत नाहीत. आणि मला माहीत आहे, तू स्वत:चं असं महत्त्व वाढ‌वणार नाहीस ते...कारण काय माहीत आहे, आपली जी काय जनताजनार्दन आहे ना ती काय करेल ते सांगता येत नाही. त्यामुळे तू सुरक्षा पुरवण्याचं दान बडवण्यापेक्षा शांत राहणं चांगलं नाही का? एवढंच जर तुला तुझ्या परिवारात असुरक्षित वाटत असेल तर तू खुशाल माझ्याकडे ये...मी वाटच पाहत आहे.
तुझाच झेड प्लसवाला,

प्रेयस