प्रतिष्ठा पणाला लागणार
वांद्रे पूर्व पोटनिवडणूक चुरशीची आणि प्रतिष्ठेची होणार याच्यात वाद नाही. शिवसेनाचा बालेकिल्ला पर्यायाने मातोश्रीच्या अंगणातही पोटनिवडणुकीचा सामना रंगणार आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे नेते नारायण राणे उतरणार असल्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरणार आहे. सध्या सर्वच पक्ष सत्ता समीकरणाच्या बेरीज-वजाबाकीमध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची घेतलेली भेट ही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची तर ठरतेच, पण अनेक राजकीय गणिते निर्माण करणारी ठरते. राष्ट्रवादीने वांद्रे पोटनिवडणुकीत उमेदवार न उतरवता राणे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे नारायण राणे यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अर्थात राष्ट्रवादीने जरी नारायण राणे यांना पाठिंबा जाहीर केला तरी राणेंसाठी ही निवडणूक सोपी जाणारी नाही. त्याचबरोबर गेल्या दोन निवडणुकांमध्ये बाळा सावंत या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर तेथे भगवा फडकण्याची शक्यता जास्त आहे. हा मतदारसंघ मातोश्रीच्या अंगणात येत असल्यामुळे शिवसेनेसाठीही ही लढत प्रतिष्ठेची आहे. त्यातच काँग्रेसकडून राणे या निवडणुकीत उतरणार असल्यामुळे शिवसेनाही राणेंना पराभूत करण्यासाठी कंबर करणार यात वाद नाही. याच दृष्टिकोनातून शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली. यात भरीस भर म्हणजे या पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतली आहे. त्यामुळे लढत रंगणार आहे ती शिवसेना विरुद्ध काँग्रेस. त्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही निवडणूक लढवण्यास काँग्रेसने नारायण राणे यांनांच का विचारणा केली तो. मात्र शिवसेनेचा पराभव करायचा या उद्देशाने निवडणुकीत उतरलेले नारायण राणे शिवसेनेला पराभूत करतात की पराभव ओढवून घेतात, हे निकालानंतर स्पष्ट होईल. वांद्रे पोटनिवडणुकीत राणे विरुद्ध शिवसेना हा रंगणारा सामना कोण जिंकतो आणि कोण कोणावर जोरदार प्रहार करतो, हे पाहणे सर्वच राजकीय पक्षांना महत्त्वाचे ठरणार आहे. कारण सत्ता समीकरणाचे डावपेच यातून पुन्हा एकदा स्पष्ट होणार आहेत.