कोळसा खाणीवाटपातील भ्रष्टाचार उघड झालाय. सरकारने खोदलेला घोटाळा ‘कॅग’ने उघडा केलाय. भ्रष्टाचाराची खाण बनत चाललेल्या देशात हिमालयाच्या पर्वतरांगांना लाजवतील अशा भ्रष्टाचाराच्या पर्वतरांगा तयार झाल्या आहेत. एक एक करता त्या पर्वतरांगांची आता टोके दिसू लागलीत. एका घोटाळ्यापेक्षा दुसरा घोटाळा कसा मोठा असेल याचीच दक्षता अधिक घेतली जातेय. आता अहवालाच्या सत्यतेची चौकशी केली जाईल. परंतु चौकशीतून सत्य काय उघड होणार आणि सत्य उघडच झालं तर ते आजच्या व्यवस्थेच्या चौकटीवर किती टिकेल आणि किती टिकवले जाईल, हे काळालाही कळणार नाही. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यापेक्षा मोठी व्याप्ती असलेल्या खाणवाटप घोटाळ्यामुळे देश कालवंडलाय, एवढंच नव्हे तर आता त्यांच्यावर ‘डार्क काजळी’ पकडलीय याची कुणालाही काळजी नाहीय. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजीनामा मागण्याचं ‘काळजीवाहू राजीनामानाट्य’ घडेल, पण एक मात्र नक्की की, या सुजलाम, सुफलाम देशात भ्रष्टाचार ‘मलय’म झालाय आणि याच विषयावर पिंपळपारावर चर्चा करण्यासाठी नेहमीची मंडळी जमली. चहा पिता पिता सत्या परखडेंनी राजकारणी बाबा राजगिरेंची खोड काढली. “काय राजगिरे...काय म्हणताय... नाही म्हटलं तोंड कुठं काळं करून आलात कोळशासारखं ?”“कुठे काय...कुठे काय ?” दोन्ही पंजांनी चेहरा पुसता पुसता राजगिरे गळबळले.“आले असतील कोळशाच्या खाणीत तोंड घालून”, दादा समाजे मधेच बोलले. समाजेंच्या बोलण्यामुळे राजगिरेंनी त्यांच्याकडे डोळे वटारले आणि बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात नेहा नटवेने ओठ उघडले, “राजगिरे, राजगिरे...तुमचा कोळशाच्या खाणीत तोंड लपण्याचा अनुभव कसा होता ?” नटवेच्या प्रश्नाने आगीतून धुराचे लोळ उसळावेत तसे राजगिरेंच्या डोळ्यांतून राग उसळला.“अगं नटवे, असं सटवीसारखं बोलू नकोस. कसे झाले तरी ते आपल्या देशाची धुरा खाणीतून निघणा-या धुरासारखी खांद्यावरून वाहत आहेत”, राजा संपादके नटवेला समजावण्याच्या सूरात बोलले.“अहो संपादके, त्यात काय चुकले नटवेचं ? आज खाणीवाटपाच्या भ्रष्टाचाराचा धूर पसरतोय तो राजगिरे खाणीत गिरल्यामुळेच ना !” परखडेंनी वरखडा काढला. पण नटवेच्या प्रश्नाने अस्वस्थ झालेले राजगिरे गप्प बसतील तर कोळशाची खाण शपथ! “हे बघा, तुम्ही जे जे काय बोलताय त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, ही काळ्या कोळशावरची रेघ आहे. माझ्या नावाचा उगाच भोंगा वाजवू नका.” राजगिरे तिडकीने बोलले. “बरोबर आहे तुमचं, राजगिरे. शेवटी ती काय, ती काळ्या कोळशावरचीच रेघ आहे. भिंग वापरूनही दिसणार नाही.” दादा समाजेंनी कोळशाचा तुकडा तोडावा तसं राजगिरेंना तोडलं.“राजगिरे, तुम्ही जे काय करता ते अयोग्य आणि पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्ही सांगता एक, करता एक आणि वागता एक. त्यामुळे तुमच्यात बाकी कशात एकता नसली तरी भ्रष्टाचारात एकवाक्यता आहे. जनतेशी असे वागणं आणि त्यांची फसवणूक करणं म्हणजे जनतेचा विश्वासघात करण्यासारखं आहे. जनता सहनशील असली तरी जास्त सहन करणार नाही.” संपादकेंनी आपलं मत मधेच मांडलं. “संपादके, हे तुमच्या ‘अनाकलनीय’मध्ये छापलंय ना...मग पुन्हा तेच कशाला ऐकवता ?” नटवेने मधेच सवयीप्रमाणे नाक खुपसलं.“असू दे... असू दे...तू कशी एकच बातमी दोन वेळा वाचतेस आणि दाखवतेस तसा हा प्रकार आहे.” सत्या परखडे मधे पडले. तेवढ्यात आतापर्यंत गप्प बसलेले विचारे वैचारिक मांडू लागले, “राजगिरे, तुम्ही सर्व प्रक्रिया छुपा-छुपीसारखं कशासाठी करता ? आज देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत हे ‘युवा’ नेत्यांना कळतंय आणि तुम्हा म्हाता-यांना कळत नाही म्हणजे काय. देश भ्रष्टाचाराने पोखरला जात आहे आणि तुम्ही अधिक पोखरत आहात. देशाला वाचवायचं सोडून सर्व जण भ्रष्टाचार करण्यात मग्न आहेत.”“विचारे, तुमचं वैचारिक थांबवा बघू. मी काय म्हणतो, खाणवाटपाचे जे नियम तयार केले ते सर्वांना अमान्य झाले. त्यामुळे जास्त वेळ न घेता खाणवाटप करून टाकले. नियमही नको आणि निकषही नको. चांगल्या कामाला मुहूर्त कशाला ? नाही का !”“हेच...हेच ते. मी अगोदरपासून कोकळत होतो की, खाणवाटपात गिरलेल्या राजगिरेंचा हात आहे. सीबीआयतर्फे त्याचा तपास व्हावा. पण लक्षात घेतो कोण ? मी बडबड करतो असंच सर्वांना वाटायचं. पुराव्याशिवाय आरोप करायची सवय नाही या दादा समाजेंना, समजलात.” दादा समाजेंनी एखाद्या कसलेल्या मल्लासारखे दंड थोपटले.“अहो समाजे, या राजगिरेंना पोटात घेऊन समजवा नाहीतर पोटतिडकीने समजवा...त्यांच्या कालवंडलेल्या चेह-यावरची भ्रष्टाचाराची काजळी जाणार नाही. गेंड्यांच्या चामडीवर कधी परिणाम होणार नाही.” परखडेंनी राजगिरेंच्या धगधगत्या कोळशावर थंड पाणी ओतलं. तेवढ्यात नटवेनं मनात नटवलेल वाक्य बोलली.“म्हणजे कोळसा खाणवाटप घोटाळा झाला ही काळ्या दगडावरची रेष आहे आहे तर!” आतापर्यंत सर्व संवाद-विसंवाद ऐकत असलेले सदा सामान्ये शेवटी म्हणाले, “कोळसा कितीही उगळला तरी काळा तो काळाच आणि भ्रष्टाचारावर कितीही ‘आचार’ केला तरी भ्रष्टाचार तो भ्रष्टाचार आणि यालाच म्हणतात भ्रष्टाचाराची खाण तशी नेत्यांची नीती!”
गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१२
रविवार, १९ ऑगस्ट, २०१२
दादा, तुम्हीसुद्धा ?
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू केलं. त्यासाठी लोकपाल बिलाचा आग्रह ही धरला. यासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. दिल्लीतील जंतरमंतरवर केलेल्या उपोषणाला प्रचंड पाठिंबा मिळाला. परंतु या वेळी दहा दिवस केलेल्या उपोषणाकडे सरकारने ढुंकूनही पाहिलं नाही. सरकारच्या थंड प्रतिसादामुळे टीम अण्णाचं उपाषण थंडावलं मात्र बंडासाठी राजकारणाच्या आखाड्यात उडी घेण्याचा निश्चय केला. देशाला पर्याय देण्याचे सूतोवाच झालं आणि जंतरमंतरवरच्या उपोषणानंतर टीम अण्णाला राजकीय मार्गाने मंतरलं. टीम अण्णाच्या या भूमिकेला संमिश्र प्रतिसाद मिळाला, पण भ्रष्टाचार हा शिष्टाचारासारखा झाल्याने पिंपळपारावरही भ्रष्टाचार, उपोषण आणि राजकारण यावर तावातावाने चर्चा झडू लागली.
बाबा राजगिरे, राजा संपादके, जागृत विचारे, सत्या परखडे, नेहा नटवे, दादा समाजे आणि सदा सामान्ये नेहमीप्रमाणे चर्चेला उपस्थित होती.
सत्या परखडे यांनी तावातावाने बोलायला सुरुवात केली "दादा समाजे, तुम्ही उपोषणाचा राजमार्ग सोडून राजकारणाचा एक्स्प्रेस पकडलात..."
"परखडे, असे उतावीळ होऊ नका. जरा शांत व्हा. तुमच्यासारखी अनेकांची स्थिती झालीय", संपादके मधेच संपादित वाक्य बोलले.
"पण, दादांनी अजून काही दिवस उपोषण केलं असतं तर.... तर .." नेहा नटवे पापण्या मिचकावत बोलली.
"...तर.. तर... काय ? " संपादके नटवेला मध्येच तोडत म्हणाले.
"...तर काय मला काही दिवस टीव्हीवर झळकायला मिळालं असतं ना..एक संधी."
"कशी काय ?" सत्या परखडे.
"परखडे, दादांचे उपोषण दाखविताना..."
"हे बरं आहे. दादांनी उपोषण करायचं आणि तुम्ही पोटभूर जेवून कोकळायचं." परखडेंनी नटवेंवर ओरखडे ओढले.
"तेवढा तरी सपोर्ट करतोच ना आम्ही." नटवे संपादकेंकडे पाहत बोलली आणि संपादकेंनी नटवेंच्या हा मध्ये हा मिसळत म्हणाले,
"एकदम बरोबर बोलली नटवे. दादा समाजे हे स्वच्छ आहेत. त्यांचे आचरणही भ्रष्ट नाही. सर्व कारभार कसा धुतलेल्या तांदळासारथा स्वच्छ. तसेच काचेप्रमाणे पारदर्शक. माझं तर ठाम मत आहे की यात बाबा राजगिरेंनी राजकारणी चलाखी करून वेगळीच खेळी केलीय आणि दादांना राजकारणात ओढलंय."
संपादकेंचं बोलणं थांबते न थांबते तोच राजगिरे जोशात बोलले,
"अहो संपादके, काय बोलताय काय ? काही तरी मर्यादा आहे की नाही तुम्हा संपादकांना ? उगाच तरी सुतावरून स्वर्ग नका गाठू. तुम्हाला काय...दुसरं काय छापायला नाही मिळालं तर राजकारण आहेच." बाबा राजगिरेंचा पारा चढला होता. डोळे गरगरा फिरवत असतानाच सत्या परखडे सत्य वदला.
"बरोबर आहे संपादकेंचं. दादांना बिल पास करण्याची आश्वासने तुम्हीच दिली होती ना. चर्चा, विचार, विनिमय करून, गोंगाट, गोंधळ घालून संसद तुम्हीच गाजविलीत ना...दादांच्या आणि टीम दादाच्या नावाने. मग त्या आश्वासनांचं काय झालं. ती भ्रष्टाचाराच्या चुलीत गेली की तुम्ही बसता त्या गल्लीतच गेलीत."
"हे राजकारणी असेच असतात. आश्वासनांचा डोंगर उभा करायचा आणि मग डोंगर पोखरून उंदीर काढायचा. एखादे आश्वासन पाळायचं आणि भल्या मार्गाने जाणाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडायच्या अगदी एके -56 , एके 47 सारख्या. हा धंदाचा झालाय." संपादकेंचा आवाज वाढला होता, पण गप्प बसतील तर बाबा राजगिरे कसले.
"हे बघा परखडे आणि संपादके, आमचा भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याचा अजेंडा आहेच. पण समूळ भ्रष्टाचार निर्मूलन होणं अशक्य आहे. मात्र दादाही समूळ भ्रष्टाचाराचे उच्चाटन होण्याच्या मुद्द्यावर अडून राहिले म्हणून मग आम्ही नडून राहिलो. दादांनी राजकारणात यावे आणि निवडणुका लढवाव्यात." बाबा राजगिरे हातवारे करत आपलं भाषण थांबवणार इतक्यात परखडे उखडले,
"उपोषण हे भ्रष्टाचारावरील जालीम औषध नाही हे तुम्हाला माहीत आहे ना...मग तुम्ही कायदा का करत नाही. तुमच्या अंगात कर नाही तर मग डरता कशाला? मंजूर करा ना एकदाचे लोकपाल बिल. ते बिल नाही यशस्वी झालं तर रद्द करता येईलच ना..."
"स्वत:चे भ्रष्टाचार उघड्यावर आले तर आदर्श घोटाळ्यासारखे होईल म्हणून ते घाबरत असावेत. नाही तर काय ...लोकपाल बिल लाना मना है क्या ? " नेहा नटवे सर्व जोश एकत्र करून बोलली. नटवेच्या बोलण्याने जागृते जागृत झाले आणि त्यांचे विचार मांडायला सुरुवात केली.
"भ्रष्टाचाराच्या किडीने संपूर्ण देश पोखरला आहे. ज्या प्रकारे वाळवीने फर्निचर कुरतडावे त्याप्रमाणे भ्रष्टाचाराने देशाला कुरतडलंय. देश भ्रष्टाचाराने बरबरटलाय. बोट ठेवावं तिथं भ्रष्टाचार. पण याविरोधात टीम दादाने जे पाऊल उचललं ते योग्यच होतं, म्हणून तर देशभरातून त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला प्रतिसाद मिळाला."
"अहो, पहिल्या आंदोलनाला भरघोस प्रतिसाद मिळतोच. त्यात नवल ते काय ? " विचारेंचे विचार मधेच तोडत बाबा राजगिरे तणतणले.
"मग आधीच तरतूद असलेल्या बिलाचा कायदा बनवायला हरकत का ?" संपादक संपादले.
"हो एकदम बरोबर बोललात संपादके तुम्ही. पहिल्यांदा तुमृच्या 'अनाकलीय'चं आकलन झालं आणि मी काय म्हणतो, पहिल्या कायद्यांचा परिमाणकारक उपयोग होत नसेल तर अजून कायदे करून काय फायदे आणि काय वायदे ?" परखडेंच्या वदनी सत्य प्रकटले.
"थांबा...थांबा...थांबा...तुम्ही असं एकमेकांना विरोध करू नका. या वेळच्या आमच्या उपोषणाचे, आमच्या आंदोलनाचे बाबा राजगिरे आणि अन्य पक्षांनी दखल घेतली नाही. शेवटी उपोषणात वेळ घालवण्यापेक्षा आणि आश्वासनांच्या पूर्ततेची वाट पाहण्यापेक्षा अॅक्शन करण्याची वेळ आलीय." दादा समाजे समाजावत बोलले.
"म्हणजे दादा, सरकारने तुमची विकेट काढली का ?" नटवेच्या अनपेक्षित प्रश्नाने संपादके आणि विचारे स्तब्ध झाले तर आपल्या संवादाचे चौर्यकर्म केल्याने परखडेंनी तोंडावर हात ठेवले. पण खमकेपणा दाखविणारे दादा समाजे बाबा राजगिरेंकडे पाहात बोलले.
"या देशाला आता नवा पर्याय हवाच आहे आणि हा पर्याय मी दिल्याशिवाय राहणार नाही. माझा शब्द आहे. प्रत्यक्ष राजकारणात न उतरता, समाजसेवा सुरू ठेवून असं राजकारण लढवेन ना त्याचं प्रात्यक्षिक बघात तुम्ही."
"दादा, दाखवाच तुम्ही तुमचं पाणी. वाद च्विंगमसारखा चघळून चघळून चोथा करण्यात आमचा कुणीही हात धरू शकणार नाही. उगाच नाही गल्ली 1 पासून गल्ली 10 पर्यंत मजल मारलीय." राजगिरे छातीवर हात आपटत बोलले.
वाद वाढत जाणार आणि काहीही साध्य होणार नाही याची जाणीव झालेले सदा सामान्ये शेवटी शांतपणे म्हणाले, "काहीही असो...भ्रष्टाचार सोडवण्याचा मार्गही आता राजकारणातून गेला !"
रविवार, ५ ऑगस्ट, २०१२
'समन्वय' तुझा नि माझा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी असा वाद निर्माण झाला. दिल्लीतील राजकारणासह राज्यातील राजकारणावरही त्याचा परिणाम झाला. अखेर अनेक वेळा बैठका घेऊन घेऊन तोडगा निघाला. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात अधिवेशन गाजण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादी वादाचाच अधिक गाजावाजा झाला. नाराजीच्या फुग्याचा बॉम्ब न होता नुसता फुसका बार ठरला आणि इकडे पिंपळपारावरच्या बैठकीत मात्र फटाके फुटू लागले.
बाबा राजगिरे, राजा संपादके, नेहा नटवे, सत्या परखडे, जागृत विचारे, दादा समाजे आणि सदा सामान्ये यांनी पिंपळपारावर ठाण मांडले....
'काय बाबा राजगिरे, तुम्ही कसलं राजकारण करता? आदी नावातच गिरे...म्हणजे गिरे तो भी टांग उपर ', सत्या परखडेंनी बाबा राजगिरेंची खोड काढली.
'काय म्हणता परखडे, अहो तुम्ही माझ्या राजकारणाबद्दल शंका उपस्थित करता...माझ्यासारखा दूरदूष्टी लाभलेला नेता संपूर्ण भारतवर्षात शोधून सापडणार नाही आणि राजकारणात तर नाहीच नाही', राजगिरेंनी छातीवर हात ठोकून ठोकून सांगितले.
'अय्या खरंच, तुमची दृष्टी छान आहे. मग दृष्ट काढू का? जरा तुमच्या दूरदृष्टीपणाबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा ना...काय वाटतं तुम्हाला तुमच्या दूरदृष्टीपणाबद्दल?', टीव्ही अँकर नेहा नटवेने हातातला पेन राजगिरेंच्या तोंडासमोर बूमसारखा धरला... एवढ्यात राज संपादके मधेच लिहिते नव्हे बोलते झाले,
'नटवे, नटवे, असा नटखट प्रश्न साहेबांना कशाला विचारलास? त्यांनी दूरदृष्टीपणाबद्द्ल सांगावे म्हणजे स्वत:हून स्वत:ची स्तुती केल्यासारखे वाटेल ना...आणि त्यांच्यासाठी दूरदृष्टीपणा हा चावून चावून चघळलेला विषय आहे.' यावर नटवे बोलायच्या अगोदर परखडेंनी ओरखडे काढायला सुरुवात केली.
'या गल्लीतील बाबांकडे कसला आलाय राजकीय दूरदृष्टीपणा. राजकारणात पडल्यावर त्यांनी जो दूरदृष्टीपणा दाखवला तो समस्त जगाने पाहिला. संपादके, तुम्हीसुद्धा दूरदृष्टीपणाबद्दल सारखे सारखे लिहून त्याला गुळगुळीतपणाचा लेप चढवलात. या राजगिरेंनी स्वत:च्या गल्लीचा विकास केला आणि बाकीच्या गल्ल्या अद्याप भकास आहेत.'
'म्हणजे मुंबई झकास आणि उर्वरित महाराष्ट्र भकास', नटवेने मधेच तोंड खुपसले.
'वा...वा...काय छान अलंकारिक वाक्य बोललीस तू, नटवे. असंच अँकरिंग केलंस ना तर टीआरपी वाढेल म्हटलं', राजा संपादके उपरोधिकपणे बोलले. बाईंनी बोलावे आणि इतरांनी मान डोलवावी तसं नटवेने संपादकेंकडे पाहत मान डोलावली. आणि आतापर्यंत शांतपणे विचार करणारे दादा समाजे जागे झाले.
'बाबा राजगिरे, तुम्ही राजकारणातील बाप माणूस.' समाजे असं म्हणताच कॉलर ताट करून मान उंचावणार इतक्यात परखडे ओरडलेच.
'समाजे, अहो काय बोलताय काय...राजगिरे राजकारणातील बाप नाही ताप आहे नुसता ताप.' परखडेंच्या ओरखड्याने राजगिरेंनी स्वत:ची धरलेली कॉलर सोडली आणि मान उंचावून बोलणार इतक्यात संपादके मध्येच संपादले,
'परखडे, तुम्ही नटवेच्या बाजूला बसलात ते बरे झाले. जरा सुंदर शब्द सुचू लागले. असो. समाजे, तुम्ही काय म्हणत होता ते सांगा.' समाजे बालू लागले...
'राजगिरे, राजकारणाची अधोगती झालीय. त्यातच तुम्ही आघाडीत बिघाडी करून तिढा निर्माण करताय. त्यामुळे राजकारण आणखी रसातळाला जायला लागलंय. तुम्ही तुमच्या आतील आवाज ऐका. ख-या अर्थाने तुमच्यात ताकद आहे. तुम्ही स्वबळावर अनेक निवडणुका लढवू शकता, पण तसं होताना दिसत नाही. याचाच अर्थ तुम्ही द्रष्टे असलात तरी ते द्रष्टेपण राजकारणासाठी उपयुक्त ठरताना दिसत नाही. आणि हो, तुम्ही ते वेळोवेळी सिद्धही केलंय. स्वत:च्या हाताने स्वत:च्या पायावर कु-हाड मारून घेण्यातच तुम्हाला जास्त हौस दिसते. तुम्ही टीकाही करता आणि ओंजळही पसरता. हे तुमच्यासारख्या कसलेल्या, मुरब्बी राजकारण्याला शोभनीय नाही. यातून वेगळा विचार समाजापर्यंत जातो...तुमच्या भाषेत सांगायचं तर मतदारांपर्यंत जातो तो म्हणजे तुम्ही बोलता एक, दाखवता दुसरं, करता तिसरंच आणि या सर्वांतून निष्पण होतं भलतंच. तुमच्या तडजोडी राजकारणाबद्दल मी आझाद मैदानात उपोषण करणार आहे, हे आत्ताच सांगून ठेवतो...' समाजे बोलतानाच नटवेने त्यांचे बोलणं अर्धवट तोडलं,
'करा, करा...समाजे तुम्ही उपोषण करा...आम्ही तुमचे उपोषण क्षणोक्षणी दाखवू.' नटवेच्या बोलण्यावर समाजे किंचितसे हसले आणि राजगिरेंकडे पाहात म्हणाले,
'राजगिरे, तुम्ही स्वबळावर लढावं असं आम्हाला वाटतं.' समाजेंचे वैचारिक संपताच परखडे बोलले,
'अहो समाजे, यांना केव्हाही आणि कितीही वेळा भुजांचे बळ दिले तरी ते स्वबळावर निवडून येणार नाहीत. त्यांना गल्ली-६मध्ये निवडून येतील की नाही याची शाश्वती नाही, मग गल्ली-२ पर्यंत काय निवडणुका लढवणार. या राजगिरेंचा इतिहास असा विश्वासघातकी आणि आत्मघातकी. कुणाचं केव्हा काय करतील आणि याचा नेम नाही.'
'एकदम परफेक्ट बोललात, परखडे तुम्ही', संपूर्ण अग्रलेखात एखादं संपादित वाक्य असावं तसं संपादके बोलले.
'राजगिरे एखादा निर्णय घेतात आणि सर्व नेत्यांना आणि त्यांच्या मित्रांनाही ते कामाला लावतात. अशीही बाबांची सवय. बाबांच्या सवयीला आमचे आबा काय करणार...म्हणजे माझे बाबा काय करणार- पण काही वळत नाही आणि वळणावरही येत नाही तसेच वळचळणीलाही येत नाही. मग आपटतात तोंडावर, तोंडघशी पडतात अगदी घशाला कोरड येईपर्यंत. आणि नंतर सुरू होतात बैठकांवर बैठका...'
'वा...संपादके, क्या बात है. तुम्ही हे जे काय अनाकलनीय बडबड केलीत तशी मला जमली तर मग मी एकदम स्टार अँकर होईन', नटवे बडबडली. पण गप्प बसतील ते संपादके कसले. अनाकलनीयचा उल्लेख करून नटवेने त्यांना डिवचलं होतं.
'नको...गं बाय माझे... तू तुझी अक्कल मधेच पाजळू नकोस. नाहीतर तुझ्या त्या बुलेटिनमध्ये बातम्या कमी आणि तुझी बडबडच अधिक दिसायची.'
'हूँ, माहितेय...माहितेय' नेहा नटवेनं नाक मुरडलं. चर्चेचा नूर पालटू नये म्हणून जागृत विचारे जागरुकपणे बोलते झाले.
'आज जग जवळ आलंय. जागतिक घडामोडींचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे आपल्या राजकीय व्यवस्थेवर परिणाम होतोय. त्यातच प्रादेशिक पक्षांचा जोर नको तितका वाढतोय. केंद्रात एका पक्षाचे सरकार आणि राज्यात दुस-या पक्षाचे सरकार. एकाच पक्षाचे सरकार सत्येवर येणं अशक्य होत चाललंय. स्थिर सरकार देण्यासाठी आता प्रादेशिक पक्षांचा टेकू घ्यावा लागतोय. आणि हो प्रादेशिक पक्षांचा टेकू घेऊन सरकार चालवणं म्हणजे एका अर्थी राष्ट्रीय पक्षांची ही अधोगतीच म्हणायला हवी. याचाच फायदा प्रादेशिक आणि छोटे छोटे पक्ष घेताना दिसतात. नाक दाबून तोंड कसे उघडायचं हे राजकारण्यांना पक्के माहीत असतं. तसेच शेपूट वळवळलं तर ते कसं ठेचायचं याचंही ज्ञान असतं. आपल्या कळपात एखादा नवीन प्राणी आला की काही दिवसांसाठी काही प्राण्यांमध्ये अस्वस्था पसरते, असा माझा अनुभव आहे. आपले महत्त्व कमी होण्याची एक अनामिक भीती असते. तेव्हा केवळ पॉवरफुल असून चालत नाही त्यासाठी पॉवरफुल वैचारिक बैठक असायला हवी. बाबा राजगिरेंचं काहीसं असंच झालेलं असावं. ' विचारेंच्या या मंथनात सर्वांनी माना डोलावल्या आणि सरतेशेवटी सदा सामान्ये बोलते झाले.
'राजगिरेंनी कितीही बंड केले आणि बैठका घेतल्या तरी त्या सर्वसामान्यांसाठी हिमनगासारख्याच वाटतात. कारण सर्वसामान्यांपर्यंत 'समन्वय' पोहोचतो बाकी सर्व गुपितं गुपितच राहतात अगदी हिमनगासारखी!.'
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)