रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

मंडळे आणि विकास



प्रिय मैत्रणी,

ब-याच दिवसांनी पत्र लिहितोय. राग नसावा. लोभच असावा. काय आहे थोडं वेगळं लिहायचं होतं ना म्हणून....

कोकण म्हटलं की आठवते ती निसर्गाने नटलेली परशुरामाची भूमी. हिरव्यागार शालूने ल्यालेली भूमी. कोकणावर निसर्गाने मुक्तपणे सर्व रंगांची उधळण केली आहे. नारळी-फोफळीच्या बागांबरोबरच आता हापूसच्या बागाही दिसू लागल्या आहेत. प्रेमाने ओथंबलेला कोकणी माणूस हे कोकणाचे आणखी एक वैशिष्ट्य. पण कोकणचा हवा तसा विकास झालेला नाही. त्यामुळे कोकणात अनेक गावांमध्ये, वाड्यांमध्ये मंडळे स्थापन झाली आहेत. तस...ेच विविध समाजाची वेगळी अशी मंडळेही आहेत. ही मंडळे आपापल्या परीने गावाचा विकास करण्यास हातभार लावत असतात. अनेक वेळा राजकीय मदतीनेही गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो.

गाव तेथे मंडळ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रत्येक गावाच्या मंडळाची खास अशी परंपरा, वैशिष्ट्ये असतात. अजूनही काही गावांमध्ये नवीन मंडळांची स्थापना होते तर काही मंडळांची पुनर्स्थापना होते. तसेच बहुतांशी गावांमध्ये मुंबई आणि ग्रामीण मंडळ अशी दोन मंडळे कार्यरत असतात. संस्कृती, परंपरा जोपासल्या जातात. सरकारी योजना राबवून गावाचा विकास साधला जातो. मंडळांचा एकूण विचार करता काही मंडळे यशस्वी झालेली दिसतात तर काही मंडळे अपयशी ठरलेली दिसतात. काही मंडळांमध्ये वाद-विवाद होतात आणि ही मंडळे पुढे अडचणीत येतात. काही मंडळे उभारणी आधीच कोलमडत असतात. त्यामुळे काही गावांमध्ये विकासाची गंगा वाहतेय तर काही गावांमध्ये विकास हा कोसो दूर आहे.

काही गावांमधील मंडळे कमालीची यशस्वी झालेली आहेत. त्याला कारणेही तशीच आहेत. अशा मंडळांची बांधणी ही मजबूत अशा वैचारिक पायावर झालेली असते. अशा मंडळाच्या सभासदांमध्ये गावाप्रती विकासाचा ध्यास असतो. विकासासाठी कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता, एखाद्या निर्णयाचा पाठपुरावा करण्याचे अथक आणि प्रामाणिक प्रयत्न असतात. सर्वांना एकत्र घेऊन आणि हातात हात घालून काम करण्याची सचोटी आणि चिकाटी दिसून येते. निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणतात, अशा निंदकांना आणि विरोधकांनाही ते पुरून उरतात. त्याच्या विरोधाला उत्कृष्ट कामांनी आणि एकजुटीने ठेचून काढतात. काळाची पावले जाणून जी मंडळे वाटचाल करतात तिच मंडळे भविष्यात यशस्वी होतात. अनेक ऐतिहासिक निर्णयाचे ही मंडळे साक्षीदार ठरतात. म्हणूनच नावलौकिकाला, नावारुपाला येतात. काही मंडळे पारंपरिक, धार्मिक चालीरीतींमध्ये काळानुरूप, परिस्थितीनुरूप बदल करतात. ते बदल करणे हे ख-या अर्थाने काळसंग आणि सुसंगत असते. गावातील चाली, रुढी, परंपरा यांचा विचार करता त्यात बदल करताना अथवा काही गोष्टींना नाकारताना मंडळांना रोषाला, चुकीच्या प्रतिवादाला सामोरे जावे लागते. पण जे कार्यकर्ते विकासाच्या, प्रगतीच्या ध्यासाने झपाटलेले असतात ते कोणताही धोका पत्करायला तयार असतात. नाऊमेद न होता सातत्याने नवनवीन विचारांचा, दृष्टिकोनांचा, कल्पनांचा योग्य रीतीने आणि खुबीने वापर करताना दिसतात. सकारात्मक विचार करून पुन्हा नव्या जोमाने आणि उत्साहाने कामाला लागतात. अशा वेळी संपूर्ण गावही त्यांच्या मागे असतो. मुंबई मंडळ आणि ग्रामीण मंडळ हातात हात घालून चालतात तेव्हा गावाच्या विकासाचा गाडा चालतोच, एवढेच नव्हे तर तो धावतो. अशा वेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे श्रम तसेच घेतलेले परिश्रम यशात परावर्तित होतात. आणि एका यशस्वी मंडळासहीत विकसित गावाचे स्वप्न साकार होते.

कधी कधी याच्या उलट घडताना दिसते. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने मंडळाची स्थापना करतात. परंतु काही दिवसांतच त्यांच्यामध्ये मतभेद होताना दिसतात. कोणत्याही मंडळाने चाकोरीबाहेरील, चौकटीबाहेरील विचार मांडले की प्रथम विरोध होतो तो सनातन विचार करणा-या ग्रामस्थांचा. ज्यांना ठरवून दिलेल्या चौकटीबाहेर विचार करायचा नसतो. त्यांना रुढी, परंपरा आणि धार्मिकता यांना चिकटून राहायचे असते. मुळात रुढी, परंपरा, चालीरीती आणि संस्कृती यांच्यातील वेगळेपणा, फरक कळत नाही तेथेच गाडी अडते. तेथूनच मग वैचारिक गोंधळाला सुरुवात होते. आधुनिक, वैज्ञानिक विचार आणि पारंपरिक, रुढीवादी, धार्मिक, श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्यावर आधारित विचार असलेल्या सभासदांमध्ये मतभेद होतात. त्यामुळे संघर्ष वाढतो आणि एखादे उभारते मंडळ बरखास्तीचा विचार करते. अशा वेळी त्या गावाची अवस्था ये रे माझ्या मागल्यासारखीच झालेली दिसते. त्यातच प्रत्येक जण स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. अनेक स्वार्थी लोकांना गावावर एकछत्री अमल हवा असतो. त्यांचे फावते आणि ते गावात एकी नसल्याचा फायदा उठवतात. हे लोक गावातील लोकांना अडल्यानडल्या प्रसंगी मदतीचा हात देतात. काही जण आपलं स्थान आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात. नि:स्वार्थीपणे काम करणारे सोडले तर ब-याच वेळा दयेचा आवळा देऊन कोवळाच काढला जातो. सर्वसामान्य माणसाच्या हे लगेच लक्षात येत नाही. कारण त्यांच्या अडचणींच्या वेळी मदत मिळाली यातच ते धन्यता मानतात. मग एखाद्या मंडळापेक्षा ठरावीक व्यक्ती वरचढ होते आणि मंडळाचे महत्त्व आपोआपच कमी होते. ही गोष्ट अनेक मंडळांना डोकेदुखी ठरते. याचाच फायदा घेऊन मंडळाचे अनेक नियम धाब्यावर बसविले जातात. मग सभासद अमुक एका व्यक्तीचे तुम्ही मंडळाने काय केलेत तर माझे मंडळ काय करणार ? अशी हक्काची आणि गुर्मीची भाषा करतात. शेवटी मंडळ हे मंडळ राहते आणि गाव पुन्हा होता तसाच राहतो. कारण मंडळाची सकारात्मक विचारांची आणि ठाम निर्णय घेण्याची क्षमता कमीच असते. एखादी स्वार्थी व्यक्ती जितक्या तत्परतेने असह्य माणसाला मदत करते तितक्या तत्परतेने मंडळ मदत करेलच याची शाश्वती नसते.

तसेच काही मंडळांमध्ये अंतर्गत वाद असतात किंवा अंतर्गत वाद निर्माण केले जातात. मंडळात राहून मंडळातील कच्चे दुवे पाहून मंडळात वाद कोळशासारखे पेटवीत ठेवले जातात. मंडळात राहून मंडळाचे खच्चीकरण करण्यात धन्यता वाटत असते अशा लोकांना. म्हणजे त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्यामुळे ब-याच वेळा मंडळातील सभासद अशा कारभाराला कंटाळून, वैतागून मंडळाला सोडून जातात किंवा मंडळात बसण्याचे टाळतात. आणि मंडळाची वाताहतीकडे वाटचाल सुरू होते.

अनेक ठिकाणी मंडळे दात्यात भरडली जातात. एकाच गावात दोन-तीन दिग्गजांना किंवा श्रीमंत व्यक्तींमध्ये वाद असतात. ते एकमेकांना पाण्यात पाहत असतात. अशा वेळी कोणत्या तरी एका व्यक्तीच्या हातात गावाची नस असावी असे त्याला वाटत राहते. तर दुस-या व्यक्तीला गाव आपल्या ताब्यात असावा असेही वाटते. त्यामुळे मंडळ स्वत:साठी कसे वापरता येईल याचा विचार सुरू होतो. मंडळ सक्षम नसेल किंवा छोटे असेल तर काही दिवसांतच मंडळाला त्यांचासमोर हात टेकण्याची वेळ येऊन ठेपते.

कोकणातील अनेक मंडळांत वाद होतो तो म्हणजे मुंबई मंडळ आणि ग्रामीण मंडळ यांच्यात. एकाच गावातील या दोन मंडळांमध्ये अनेक गोष्टींवरून वाद-विवाद होताना दिसतात. त्यात अधिक वाद होतात ते धार्मिकबाबी, परंपरा आणि रुढींशी संबंधित असतात. जगाने २१ वे शतक ओलांडले तरी कोकणात रुढी, परंपरा आणि धार्मिक बाबींचा पगडा तितकासा कमी झालेला नाही. तसेच ग्रामीण मंडळे नवीन विचारांचा स्वीकार करतीलच असेही नाही. आधुनिकता आणि पारंपरिकता यांच्यात सांगड घालून चालणे अतिशय अवघड बनते आणि मग पुन्हा खटके उडायला सुरुवात होते. होळी-शिमगा या सणांवरून तर अनेक मंडळांमध्ये तेड निर्माण होताना दिसते. त्यातून अनेक अनावश्यक गोष्टींवर अकांडतांडव निर्माण केले जाते आणि विकासाचा मुद्दा बाजूला राहतो. आपापसातील वैचारिक भांडणे नंतर हातघाईवर येतात, कारण वैचारिक गुलामगिरीतून कोकणी माणूस पाहिजे तेवढा बाहेर पडलेला नाही.

एकूणच काय तर कोणत्याही मंडळाने नवविचारांचा, सणांतील व्यावहारिकतेचा, श्रद्धा-अंधश्रद्धेचा, रुढी-परंपरा, आर्थिक बाबींचा तसेच राजकीय, सामाजिक धोरणांचा विचार करायला हवा. काही लोकांच्या हितासाठी, त्यातच स्वार्थासाठी मंडळे न चालविता आपल्या घरासहीत गावाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याच्याकडे मंडळांनी परिपूर्ण लक्ष दिले पाहिजे तरच मंडळे टिकतील आणि गावाचा विकास होईल. अंधश्रद्धेच्या चुलीवर भाक-या न भाजता विज्ञान, तंत्रज्ञान, आर्थिक निकषांवर मंडळांनी भाकरी भाजली पाहिजे. यातच ख-या अर्थाने यश सामावलेले आहे.


तुझाच मंडळासाठी झटणारा,

प्रेयस